रेघोट्या ______ श्रीधर अंभोरे

                                 Preview

घराच्या संबोर बाभूयबन होतं. माह्या जलमा अगुदरचं. किती वर्साचं होतं कुनास ठावूक. भलतंच दाट. मान्सायच्या जाडीवानी  त्यची खोडं डोयात दाटत. पावसयात तं मंग बाभूयबन कायेरखुटूक व्हये. खोडं लयच काये काये दिसत. रातच्या अंधारानी भेव वाटे. पन  झाडाच्या डांगा मोठ्या साबूत दिसत. हिर्वा हिर्वा रंग डोयात भरे अन्‌ मनात झिरपे. खोडाच्या कायाखुटूक रंगातून नजर सरकत सरकत  डांगी डांगीतून जाये. मोठी गंमत वाटे मले. एकटक मी बाभूयबनाकळे पायेत जावो. गावात वारं वायधन घुसलं की, आमच्या घरावरून थेट  बाभूयबनात फिरे. आंगात आलेल्या बायामान्सावानी सारं बाभूयबन हाले डोले. भलकसंच्या भलकसंच दिसे. मंग माह्यावाली माय नायतर  बय मले घरात जाले सांगे. पन मले त्या हातपाय आपटल्यावानी करणार्‍या डांगा लय आवळत. मी घरातून भायीर येवो. दारात मोठा गोटा  व्हता. त्यावर उभा र्‍हावो. अन्‌ पावो. झिपर्‍या झालेल्या केसावानी डांगा दिसत. मेस्कामाय, मरीमायसंबोर घुमनार्‍या बाया बाभूयबनात हाहेत  वाटे. भेव. मंग खोलखोल जाये. राती झोपलो की सार्‍या बाभूयबनातल्या डांगा डोयात झोके घेत.
पावसाया आला की गावात ढोरं लय मरत. लोकं ‘ढोरमर्‍यापूक नायतर म्हारपूक’ म्हनत. रस्त्यात भलकसाच गाटा व्हये.  मान्सालयले चालता येत नसे. पाय घसरून पडत. वर्तल्ल्या वेटायात ढोर मेलं की वढत वढत माह्यावाल्या दारातून नेत. त्याच्या आवाजानं  बय, नायतर माय, नायतर बाप घराच्या भायीर ये. अन्‌ इचारे, ‘कोनाच्या घरचन व्हय गड्या?’ वढत वढत ढोर थेट बाभूयबनात नेत.  त्याच्या मांगं मांगं कुत्रेबी जात. अभयात अगोदरच गिधाड, ढोक, घारी, इमानावानी घेर्‍या घेत. बाभुयबनात हळ्याची वस्ती लय व्हती.  असलं ढोर पाह्यल की बाभूयबनात सारा गोंधय व्हये. पाखराची जतराच भरे. बाभुयबन हालल्यावानी दिसे. ढोर काप्याले बसलं की  कापनाराचे मोठे हाल होत. ढोक हा पक्षी आंगावरच ये. अभायातून कळपच्या कळप मातीवर उतरे. पोराटोराले, कुत्र्यालेबी जुमानत नवते.  कापनारा जोर खावून शा दे. हातवारे करे. हळे पटकन बाभुयावर जाऊन बसत. शेवटी सर्वालेच मास खायचं असल्यानं जेवळं येईल तेवळं  घेत. अशा वेळी मोठा गलका उळे. सारं बाभूयबन थरथरे. मी लहान असल्यानं दारातून बाभुयबनाकळं नुस्तं पावो. ते भेदरल्यावानी दिसे.  मले ढोकायची लय भेव वाटे. मासाचं टोपलं डोक्यावर घेऊन मानूस आला की ढोर कापल्याजागी जरा वेळ कलकलाट व्हये. सारं सामसूम  झालं की बाभुयबन साधूवानी वाटे. उन्हाया आला की, बाभुयबनाची सिरीमंती वाळून जाये. सार्‍या बाभुया भोंगया भोंगया दिसत. एकेक  बाभुय पिशाबाईवानी दिसे. खोडं हेकोळे तेकोळे दिसत. मंग सार्‍या अभायभर काड्याच काड्या. रेघोट्यावानी. कुठी कुठी बारीक बारीक पानं  दिसत. उन्हायात बाभुयबनात लय करून भेव नवतं वाटत आम्ही लहान पोट्टे काटक्या-कुटक्या जमा कर्‍याले जात जावो. बाभुईच्या  खालून शेंड्याकळं पाह्यलं की अभाय अभाय बाभूयात दिसे. बाभुयाच्या अंगावर पाखरं बसली की, एक, दोन, तीन मोजताबी येत. पाखरं  भुर्रsss उळले की बाभुयबन ताजंतावानं वाटे. मंग पाखरं नसले की पानंबी कायेरखुटूक दिसत. जरासकबी वारं आलं तरी डांगा अभायावर  पोथारल्यावानी करत. घराची भीत माय पोथारायची तशा. हे असं पाह्यलं की, माह्यावालं मन हरकिजे. ल्हान ल्हान डांगाकळे पाह्यलं की  माही नदर आपोआप माह्यावाल्या बोटायकळे जाये. मले मोठी गंमत वाटे. माह्यावाले बोटंबी काड्यावानीच दिसत कायेरखुटूक. मंग माय-बय  जथीचा भांडेकुंडे घासे; तथून मी कोयसा उचलो. डोयात फि रत र्‍हायलेल्या डांग मंग भितीवर उमटत अन्‌ मंग भितभर रेघोट्याच  रेघोट्या. काया काया खुटूक.
                                       
भीत खराब केली म्हून मायनं, बयनं मले लय वक्ती हानलं. सुलाभाबी म्हणे, ‘फुयजी, सिरधरले शाईत घाला ना, ल्हानचुकली  पाटी द्या आनून. मंग काह्यले भीत खराब करतीन.’ माय म्हने ‘अवं सुले, त्याले बाभुयानं झपाटलंना बाई!’ पाटी आनली, पाटीचा रंग  काया. कोयस्याचा रंग काया अन्‌ बाभूयबनाचाबी रंग कायाच. अन्‌ माह्या मनात काया रंगाचं अभायच साचत गेलं. नगरहून माह्यावाल्या  गावी गेलो की, नदर आपसूक बाभुयबनाकळे जाते. आता तथीसा कायीच नाही. बापानं दारात भिता घातल्यात. आवार झालं. ज्या  गोट्यावर उभा र्‍हावो; तो गोटा न्हानीत नेला. आंघूय करायच्या वक्ती बस्याले. बाभुयबनाच्या रोखानं घरं होऊन र्‍हायलीत. तिकळं पाह्यलं  की भयान वाटतं. कायतरी हारपल्यावानी र्‍हावून र्‍हावून वाटतं... आख्खच्या आख्ख बाभूयबन डोयात उभं र्‍हायतं. त्यानं मले वाढवलं,  रमवलं, गमवलं, खेववलं अन्‌ रेघोट्याचं दान देलं. कस इसरता येईल त्याले.
आता मोठा झालो. गावोगावी जातो येतो. पन माह्यावाल्या गावच्या बाभुयबनावानी बाभूयबन दिसत नायी. मान्सावानी मानूस  तरी कुठीसा हाये. बाभूयबनाची हेतू येते. मंग मी कागदभर नुसत्या रेघोट्याच रेघोट्या वढत र्‍हायतो. हिर्व्या काया रंगाचं पांघरून आंगावर  घेऊन सुफी फकीरावानी बाभुयबन माया रेघोट्यात आशीर्वाद भरत र्‍हायते.

Comments

  1. वऱ्हाडी भाषा ही श्रीधर अंभोरेंची मातृबोली.जागतिक स्तरावर पोचूनही आपली बोली न विसरण्याची माणुसकी त्यांनी जपली.

    भोगलेला एकंदरीत काळ वाचतांना पाणावलेले हृदय व्यक्त करता येत नाही. कसे जिवंत राहिले याचं आश्चर्य वाटतं..
    सविनय प्रणाम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुकेपण सोडताना _________डॉ. संजीवनी तडेगावकर