मुकेपण सोडताना : डॉ. संजीवनी तडेगावकर

                                      

आठ-दहा वर्षापुर्वी एके दिवशी दिवेलागणीच्या वेळी कविवर्य जयराम खेडेकर चित्रकार श्रीधर अंभोरेंना घेऊन माझ्या घरी  आले. परिचय झाल्यानंतर गप्पांची मैफल रंगत गेली; पण अंभोरे फार काही खुलले नाहीत. कदाचित ते माझा, माझ्या आंतरिक खोलीचा  आणि एकंदरीत घराचा अंदाज घेत असावेत. मीही थोडी संकोचले. प्राथमिक गप्पांच्या मर्यादा सांभाळित राहिले. नंतरच्या काळात अनेकदा  भेटी घडत गेल्या, मैफिली रंगत गेल्या आणि अंभोरे पाकळी-पाकळीतून उलगडत गेले. निस्सीम आनंददायी चर्चा होताना स्त्री-पुरुषांच्या  भेदाच्या मर्यादाही संपल्या. अनेक अनुभवलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या मुद्यांवर तत्त्वापर्यंत पोहोचणार्‍या मतांच्या खाडाखोडी होत  राहिल्या.
परवा चित्रकारितेतील समग्र योगदानासाठी त्यांना जालना येथील सन्मानाचा अजिंठा राज्य पुरस्कार एका देखण्या  समारंभात ज्येष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत प्रदान  केल्यानंतर श्रीधर अंभोरे मनोगतातून व्यक्त होत असताना माझ्या शेजारी बसलेले टोपेसाहेब मला अंभोरेंबद्दल प्रश्न विचारत होते. त्यांनी  विचारलं, हे कुठं राहतात?
मी : अहमदनगरला
ते : कुठल्या व्यवसायात आहेत?
मी : पोस्टात नोकरील होते, स्वेच्छानिवृत्ती घेतली.
ते : मुलं किती आहेत ? काय करतात?
मी : लग्नचं केलं नाही.
ते : का?
मी : नकार.
ते प्रथम आश्चर्यचकित झाले आणि नंतर गंभीर होऊन अंभोरेंचं मनोगत ऐकू लागले. मी मात्र बसल्या जागीच अनुभवलेल्या,  समजून घेण्याचा प्रयत्न केलेल्या अंभोरे नावाच्या वेदनामय गावातून भटकताना पुरती शिणून गेले. खरं तर मला अनेक प्रश्न त्यांच्या  संदर्भात होते; पण ते दुखावले जाऊ नयेत म्हणून कधी विचारले नाहीत. पुढं बोलण्याच्या ओघात सहज सगळं कळत गेलं आणि मी  अस्वस्थ होत गेले.


ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या घरात जन्मलेल्या कलावंतांच्या नशिबी जे भोग येतात ते भोगत, अपमानाचे उपेक्षेचे,  अवहेलनेचे चटके सहन क रीत लहानाचा मोठा झालेला हा कलावंत. आपलं सामान्यपण सांभाळून सौंदर्याची आस धरून चांगुलपण जपत  नोकरीनिमित्त अकोल्यापासून अहमदनगरपर्यंत पोहोचलेला धडपडणारा तरुण. कंठात बासरीची धून आणि ओठात हिरवं ओलं गाणं घेऊन  पांढर्‍या वस्त्रावर मनातल्या इंद्रधनूचा नित्यनव्या रंगात कशिदा काढण्याचं वेड जपणारा कलावंत... पोस्टातल्या रटाळ ठिकाणी आपल्या  कलात्मक दृष्टीनं चैतन्य निर्माण करू पाहणारा एके दिवशी आसर्‍याच्या शोधात नगरच्या गल्लीतून फिरत असताना एका दारापुढं  अचानक उभं राहतो, आणि तारुण्यसुलभ भावनेनं वेडावून जातो. पाहतच राहतो... बराच वेळ... तिथं एका दारात एक सुंदर तरुणी उभी  होती. कितीतरी वेळ हा मुलगा आपल्याकडं पाहतोय म्हटल्यावर तिनं नजरेनच जाब विचारला. नंतर योगायोगानं तिच्या घराजवळच  खोली मिळणं आणि तिचं सारखं-सारखं दर्शन होणं, कुठल्यातरी निमित्तानं सतत संपर्कात येणं, या सगळ्यातून कळत-नकळत एकतर्फी  प्रेमाची लागण न झाली तरच नवल. तारुण्यसुलभ स्वप्न पाहणं, आरशाशी मैत्री होणं, वाट पाहणं, हुरहुर वाटणं ती वाढत जाणं, असं  काहीसं सुरू झालं. अशातच एकदा रूम पार्टनरनं मुलीसमोर सहजच लग्नाचा प्रस्ताव ठेवला अन्‌ तिनं तो झिडकारून नाकारला. झालं ! या  प्रसंगाचा परिणाम संवेदनशील मनावर असा काही झाला की पुढं अंभोरे आजीवन अविवाहित राहिले. केवढा हा निग्रह. केवढी साधी  वाटणारी गोष्ट; पण परिणाम किती खोल... हे ऐकून तर मी चक्रावूनच गेले.
                                        

पुढच्या आयुष्यात त्यांनी स्वत:ला पूर्णत: कामात नि छंदात बुडवून घेतलं. ‘दिंडी’ आणि ‘आदिम’ चे काही अंक मी पाहिले  आहेत. किती प्रचंड मेहनत आहे त्यात. सुवाच्य हस्ताक्षरांत लिहिलेले, प्रत्येक पानावर अधे-मधे रेखाटनांनी नुस्ते बोलके झालेले, नीटनेटके,  वाचनीय असे. संपादक सदाशिव अमरापूरकर असले तरी सर्व झाक अंभोरेंची. काय कष्ट पडत असतील हे सर्व करताना. नोकरी सांभाळून  रात्रीचा दिवस करून सर्व अभाव असताना केलेलं हे काम. त्यामुळंच तर अंकाला लोकप्रियता भरपूर मिळाली.
कधी कार्यक्रमाला जाता-येता आम्ही मुद्दाम अहमदनगरला त्यांच्या घरी चहासाठी थांबतो. साधं, नेटकं, स्वच्छ घर पाहिलं की  असं वाटत नाही की या घरात घ्बाईङ नाही. सगळं कसं जागच्या जागी. एका स्त्रीच्या विनम्र आग्रहानंच ते येणार्‍याचं आतिथ्य करीत  असतात. त्यांचे कपडे तर इतके स्वच्छ आणि नीटनेटके असतात की घरात बायको असणार्‍या इतर कुठल्याही नवर्‍याचे नसतील.
घराचं घरपण जपताना वापरायच्या अनेक युक्त्या त्यांना माहीत आहेत. अनेक मित्रांच्या बायकांना ते अनेक पदार्थ आवडीनं  एखाद्या घ्सुगरणीङ सारखे शिकवत असतात. स्त्रियांचे स्वभाव, आवडी-निवडी, विक पॉइंट आणि दुसर्‍या मनाचा उसमारा त्यांच्या ओळखीचा  आहे. हे सगळं समजून घेताना त्यांच्या स्वभावात एक मृदूपण येतं. एकदा न राहून मी त्यांना विचारलं होतं. एवढ्या सगळ्या मित्रांचे  भिन्न स्वभाव, विचित्र सवयी आणि तरी तुमचं पटतं कसं? तेव्हा किंचित हसून ते म्हणाले होते. त्याचं काय आहे... प्रत्येक गटाचे, तटाचे,  स्वभावाचे, विचारसरणीचे अनेक लोकांचे अनेक अनुभव आल्यानंतर कोणामध्ये काय उत्तम आहे. कोणाला काय चालतं आणि काय चालत  नाही. याचं तंत्र सांभाळलं की झालं ! शिवाय एखाद्याच्या अनेक गोष्टी वाईट आहेत; पण एक अतिउत्तम तर त्या एका गोष्टीसाठी दुसरीकडं  कानाडोळा करून आपल्याला हवं तेवढं स्वीकारायचं, जमून जातं मग सगळं. बापरे ! मला वाटतं, खूपच अवघड आहे हे ! पण अंभोरेंना ते  जमलंय, त्यामुळं कुठलाही खडखडाट न करता एवढे मित्र ते सांभाळतात.
माझ्या सर्वच पुस्तकांसाठी मोठ्या आनंदानं त्यां नी चित्र आणि रेखाटनं दिली. इतकंच काय घ्फुटवेङ आणि ‘अरुंद दारातून  बाहेर पडताना’या पुस्तकांच्या वेळी दिवसभर प्रिंटिंगमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून काम केलं. निर्मितीमध्ये नवनवे प्रयोग केले. पुस्तकाचे  प्रकाशक असलेले जयराम खेडेकर यांचं निर्मितीसाठी असलेलं प्रचंड वेड आणि अंभोरेंची कलात्मकञ्ृष्टी या दोघांच्या अनुभवातूनच  पुस्तकांना देखणेपण मिळालं. पुढं ज्याचं कौतुक अख्ख्या मराठी वाचकांनी केलं. जवळ-जवळ सर्वजण माझ्या अगोदर या दोघांना  पुस्तकाबद्दल बोललेले असायचे. मित्र म्हणून एकदा स्वीकारल्यानंतर त्याला जपताना कुठलं गणित मांडत बसायचं नाही. हे सूत्र  त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. असंच एकदा त्यांच्या घरी कुंडीतील लोभसवाण्या रोपाला मी हात लावून घ्छान आहेङ असं म्हणत  होते. तर परत निघताना त्यांनी ती कुंडीच माझ्या हातात ठेवली. मी खूप ओशाळले. फिरून कधी त्यांच्या कुठल्या वस्तूला हात लावून  घ्छान आहेङ असं म्हणण्याचं धाडस मी केलं नाही.
                                             

एकदा नव्या पुस्तकासाठी काही रेखाटनं लागत होती; पण अंभोरे आजारी होते. उपचार चालू होते. मी काहीच बोलले नाही.  बरेच दिवस, महिने उलटले. मला मनातून वाईट वाटत होतं, आता त्यांचे चित्र घेता येणार नाही म्हणून ! पण एक दिवस असेच माझ्या  घरी आले असता इकडच्या तिकडच्या गप्पात, नवं काय लिहिलं? असं त्यांनी विचारलं. मी नव्या पुस्तकाबद्दल बोलले; पण काही मागण्याचं  धाडस केलं नाही. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते पुन्हा आले. हातातील पिशवीतून एक पुस्तक बाहेर काढलं, त्या पुस्तकाच्या पानापानातून  एक-एक चित्र, रेखाटन बाहेर काढू लागले. त्यात माझं काढलेलं एक रेखाटनंही होतं. मी पाहतच राहिले. कधी केलं हे सारं? असं  विचारल्यावर म्हणाले या दोन दिवसांत. माझे डोळे भरून आले. भरल्या नजरेनं मी अंभोरेंकडे पाहत राहिले. सांगूनही न कळल्याचं सोंग  घेणार्‍या या दुनियेत न सांगता कळणारा नितळ मनाचा माणूस माझ्यासमोर उभा होता.
ते जालन्यात आले की खेडेकर सरांच्या आणि त्यांच्या जवळ-जवळ रोजच भेटी होतात, खेडेकर सरांच्या घराजवळच  अंभोरेंच्या भावाचं घर असल्यामुळं, त्यामुळं माझ्याकडं येताना नेहमी दोघं मिळूनच येतात. एकदा असेच ते दोघं आलेले. माझं नुकतच  स्त्रियांच्या कवितेवर पीएच. डी. चं काम झालेलं. पुरुष स्त्रियांना कसा त्रास देतात. कुठल्याही देशातील सिस्टम कशी पुरुषसत्ताक आहे. प्रत्येक  क्षेत्रात कसं हेतुपुरस्सर स्त्रियांकडे दुर्लक्ष करण्याचं, त्यांना उपेक्षित ठेवण्याचं काम होतं? अनादि काळापासून कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक  कालखंडात स्त्रियांची स्थिती कशी खालावत गेली. वगैरे, वगैरे. तो विषय पुरता माझ्यात भिनला होता. त्यादरम्यान कुठलाही पुरुष पाहिला  मला त्याचा खूप राग येई. मी त्या पुरुषाला युगानुयुगापासून स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा जाब विचारी. त्यादरम्यान माझ्या आलेल्या  बर्‍याच जणांना त्यास बळी पडावं लागलं होतं आणि अशात हे दोघं माझ्याकडं आलेले. चहापाणी झालं आणि मी मूळ विषयावर सुरू  झाले. अंभोरे म्हणायचे अहो तसं नाही. मी म्हणायची, काय तसं नाही. मीरा पहा,  द्रौपदी, सीता, अहिल्या, राधा, जिजामाता, अहिल्याबाई  होळकर, सावित्रीबाई फुले. कुठलीही स्त्री पाहा. किती वेदना, कुणी दिल्या त्यांना ? काय चुकलं त्यांचं?  अंभोरे मला समजावून सांगू पाहायचे  आणि माझे प्रश्न उपस्थित व्हायचे. कितीतरी वेळ हे चाललं होतं. अंभोरे वैतागुन गेले. काही समजुन घेण्याची माझी अजिबात मानसिकता  नव्हती. खेडेकर सर आणि पंडितराव तडेगांवकर हे दोघं नुसते गप्प राहून पाहत होते. त्यांना अलीकडे हे माझं नेहमीचंच झालं होतं. मला  हे असं अचान क काय झालं अंभोरेंना कळेना. ते त्रस्त होऊन निघुन गेले. मी शांत झाले. पंडितराव अजूनही माझ्याकडं पाहतच होते.  आता मला वाईट वाटू लागलं. ज्या माणसानं लग्नच केलं नाही. बाईला तर सोडा मुंगीलासुद्घा कधी त्रास दिला नाही. चिमण्यांना  चारापाणी ठेवून त्यांच्यासाठी दिवसभर खिडकी उघडी ठेवून त्यांची वाट पाहणार्‍या, स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍यालाच  रागाच्या भरात मी जाब विचारत होते, असे अनेक गमतीशीर प्रसंग घडत होते.
एकदा ते मला म्हणाले, तुम्हाला टोमॅटो जॅम शिकवितो. मी खुश झाले. जॅमसाठी मी सगळी तयारी करून ठेवली आणि   गावाकडून त्या दिवशी अचानक सासू-सासरे व इतर पाहुणी मंडळी आली. झालं ! एका पुरुषानं सुनेला सर्वांसमोर जॅम शिकवावा हा विचार  त्यांना पचेल का? या विचारानंच जॅम शिकणं मी कॅन्सल केलं व इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं. घ्काय हो,  तुम्ही एवढं फिरता तुम्हाला अनेक मित्र आहेत, तशा मैत्रिणीही असतील, कोण आहेत त्या?ङ मुळात स्त्री-पुरूष मैत्रीबद्दल तुम्हाला काय  वाटतं?
खूप विचार करून आणि आठवून त्यांनी सांगितलं, दूरची मैत्रीण अरुणा ढेरे आणि जवळची सुमती लांडे, तिसरं नाव मात्र  त्यांना सांगता आलं नाही. अरुणा ढेरेंसोबत फार दिवसांपूर्वी पत्रव्यवहार (तुरळक) झाला होता आणि कधी-तरी भेटीगाठी, गप्पा. सुमती  मात्र नगरच्या जवळ राहायला. शिवाय कवी-प्रकाशिका, त्यामुळं कामाच्या निमित्तानं भेट व्हायची. तिची विचारसरणी, प्रचंड मेहनत घेण्याची  तयारी, संघर्षमय आयुष्य यातून उभं राहताना एक स्त्री धडपडतीय हे सगळं पाहून तिच्याबद्दलचा आदर वाढत गेला. विचार जुळले आणि  आजपर्यंत मैत्री टिकून राहिली. मुळात स्त्री-पुरुष मैत्रीकडं बघण्याचा समाजाचा ञ्ृष्टिकोन पहिल्यापासूनच फार काही स्वच्छ नाही. त्याला  कारणंही असतील; पण समज-गैरसमज पुरुषांच्या मैत्रीपेक्षा स्त्रियाची मैत्री फार त्रासदायक ठरते. निखळ मैत्रीतही तिरकस नजरा-कुत्सित  हसणे आणि लागट टोमणे शांतपणे स्वीकारावे लागतात. त्याला इलाज नसतो. मुळात स्त्रियांशी मैत्री आणि तीही सत्तरच्या दशकात जरा  अवघडच होतं. त्यामानानं आजचं चित्रं आशादायी आहे. नव्या विचाराचं लोक स्वागत करताना दिसतात. असं सांगत असतानाच मित्रांच्या  घरी पहिल्यांदा गेल्यावर बायकोची प्रतिक्रिया किंवा घरातील वयस्क माणसांच्या नजरा, हावभाव याचं वर्णन करावं ते फक्त अंभोरेंनीच.  बालपणी न्याहाळलेल्या गमतीशीर अनुभवात तपकिरी ओढणार्‍या आजी-आत्या आणि गावातील बायकांच्या गप्पा व वर्‍हाडी बोलीसह  अशा बारीक झटक्यात-मुरक्यात अंभोरे सादर करतात की थक्क व्हायला होतं, खेड्याचं अभावयुक्त जिवंत चित्र सांगताना  मिश्किलीसोबतच, लोक कसे जगतात? याचं जिवंत चित्र आपल्या डोळ्यापुढं उभं राहतं. ते अनुभव मोठे गमतीशीर असतात. शब्द  उच्चारणातील नाट्य, लालित्यपूर्ण हालचाली, प्रसंग खुलवणारी भाषिक शैली, प्रसंगानुरूप बदलवणार्‍या लकबी हे पाहताना धीरगंभीर होऊन,  अलिप्तपणे थोड्या वेळापूर्वी खुर्चित बसलेला माणूस तो हाच का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. नगरला सुरुवातीच्या मुक्कामात ते  एका मुस्लिम कुटुंबात राहत असत. अंभोरेंचा नि त्या म्हातारीचा असा काही सूर जुळला होता की, सोबत जेव्हा केव्हा ती खुराचे सूप  करीत असे तेव्हा वाटीभर सूप अंभोरेंसाठी बाजूला काढून ठेवी. दिवसभर वाट पाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर घरी पोहोचणार्‍या  अंभोरेंना आवाज देऊन पिण्यास देई. दिन भर किधर घुमता रे, माट्टमेल्ला रात को जल्दी आने को क्या रोग आया । हाय s अल्ला s  क्या रे आज कल के छोकरे माँ ! असं म्हणत, खाणा खाया क्या? नहीं तो खा ! असं म्हणणार्‍ या नानीबद्दल ममत्वानं गहिवरून बोलणारे  अंभोरे मी पाहिले आहेत.
एकदा बोलता-बोलता बाजूलाच ठेवलेली आणि नुकतीच विकत घेतलेली साडी दाखवली, आणि सुरू झालं त्यांचं कपड्यावर  भाष्य, साड्यांचे रंग, पोत, काठ, पदर, व्यासपीठीय साड्या, घरगुती साड्या, लग्न समारंभातील साड्या, कोणत्या, कुठं, कशा चांगल्या  दिसतात. कोणत्या स्त्रियांना साड्या चांगल्या दिसतात. चांगले दिसण्यात प्रसंगानुरूप साड्या कशा चांगला सेन्स असणार्‍या स्त्रिया कोणत्या,  साड्या कुठं चांगल्या मिळतात, त्या कशा निवडाव्यात वगैरे. ते इतकं भरभरून सांगत होते की क्षणभर मला वाटलं. यांनी लग्न केलं  असतं तर त्यांच्या बायकोला किती छान-छान साड्या नेसायला मिळाल्या असत्या. त्यामुळं गंमत म्हणून मी त्यांना विचारलं, ती एक  सोडली तर उभ्या आयुष्यात तुम्हाला कुठल्याच स्त्रीचा मोह झाला नाही का?
यावर खळखळून हसत ते म्हणाले; त्याला काय म्हणता येईल मला माहीत नाही; पण काही गोष्टी मात्र आवडल्या होत्या.  त्यातील एक म्हणजे मढीला खूप मोठी जत्रा भरते. तिथं अवघ्या भारतवर्षातून आदिवासी, भटके, अनेक जाती-धर्मांचे लोक येतात. तिथं  त्यांच्या पंचायती बसतात. भांडण-तंटे मिळतात, लग्न ठरतात, होतात. कलावंतीय हौस म्हणून मी एकदा तिथं गेलो. ब्रश, पेन्सिल, कागद,  कॅमेरा असं सगळं शबनममध्ये होतं. सगळीकडं अतिशय नयनरम्य दृश्य दिसत होते. मी वेड्यासारखा नुसते फोटो काढत होतो.  आजूबाजूला सगळी बोचकी आणि बाजूला ती एकटी बसलेली. एवढी सुंदर, निरागस, विलोभनीय की बस्स तिचा साज-बाज सगळं कसं  गावरान; पण तिचं तिला शोभणारं. मी तिथे पटापट फोटो काढत होतो. तेवढ्यात तिचे नातेवाईक तिथं आले. त्यांनी माझी बखोटी पकडून  मला मारायला सुरूवात केली. रेखाटनं फाडली, कॅमेर्‍यातील रीळ काढून तोडून टाकली. शबनमसह सगळं जाळून टाकलं आणि शिव्यासोबत  मारत असताना तिथं त्यांच्यातला एक लीडर टाईप माणूस आला. त्यानं मला सोडवलं. जाऊ द्या पत्रकार असेल म्हणून सोडून दिलं. माझी  अवस्था प्रचंड दयनीय झाली; पण परिणाम असा झाला की त्या पोरीनं माझ्यातल्या कलावंताला वेड लावलं. तिचा चेहरा मला सारखा  दिसु लागला. बसता, उठता, खाता, पिता मी तिची अनेक रेखाटनं केली. खरं तर माझ्या चित्रांना कधी चेहरा नसतो; पण नकळत आलंच  तर त्या चेहर्‍याचं होतं आणि दुसरा असाच गमतीशीर प्रसंग माझं कलावंतीय वेडेपण मला अनेक ठिकाणी भटकायला लावतं. एकदा  असंच काही कामानिमित्त केरळला जायला मिळालं. मी भारताच्या अनेक भागात गेलो; पण केरळमध्ये जे अप्रतिम सौंदर्य मी पाहिलं तसं  अजून तरी कुठं दिसलं नाही. तिथल्या स्त्रिया उंचपुर्‍या, ठसठसीत बांध्याच्या, काळ्या-सावळ्याच; पण सतेज कांतीच्या, टपोर्‍या बोलक्या  डोळ्याच्या, गुडघ्यापर्यंत लांब काळ्याभोर केसांच्या जणू सळसळतं चैतन्य, प्रत्येकीच्या डोळ्यात काजळ नि केसांत गच्च अबोली फुलांच्या  वेण्या. त्यांना पाहण्यासाठी मी दिवसभर वेड्यासारखा फिरत असे. भल्या सकाळी समुद्रकिनार्‍यावर अबोली आणि मोगर्‍याच्या फुलांचे  विक्रीसाठी मांडलेली मोठ-मोठ्ठे ढीग. अस्सं मनोहारी दृश्य दिसायचं ना ते ! मुदत संपली तरी ती वाढवून मी तिथं तीन-चार दिवस  भटकत होतो, त्या स्त्रियांना बघत, त्यांच्या सौंदर्याचा, निसर्गाच्या या कलाकृतीचा निखळ आनंद घेण्याच्या वृत्तीची प्रामाणिक कबुली द्यायला  ते विसरत नाहीत.

                                          

चांगली चित्रशैली म्हणजे काय? चित्रं कसं पाहावं? चित्रकाराचं वाचन कसं असावं? चित्रकाराच्या शैलीवर धर्माचा, जातीचा,  जडणघडणीचा, परिसराचा, संस्कृतीचा, विचारसरणीचा परिणाम होतो का? या सगळ्यांबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं. यावर सम जावून  सांगताना आदिम चित्रइतिहास ते कोणार्क मंदिर, वेरूळ-अजिंठ्याच्या लेण्यातील चित्र, शिल्प प्रकार, शिवपुराण आदीचा बारकाव्यानिशी  चित्राचा महत्वपूर्ण इतिहास सांगताना, न्यूड चित्र, नैतिक-अनैतिक, विचारप्रणाली, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक स्थिती, चित्राची भाषा, रंग,  प्रकार, चित्रावर काळातील जीवनशैलीचा परिणाम, मानवी ताणतणावाचा परिणाम, स्त्री-पुरुष संबंध, त्यातील निरागसता, निकोपपण, चित्राकडं  पाहण्याची, समजून घेण्याची दृष्टी, त्यातलं पावित्र्य, अभिजातपण. इ. भारतीय चित्रकार व त्यांची शैली हळदणकर, राजा रवी वर्मा-ते  अजिंठ्यातील प्रकाश तांबटकर त्यांच्यापासून ते पिकासो, वैनगॉग पॉली यांची शैली. चित्रातील रेषा, रंग, आकार आणि अवकाशामुळं  चित्रातल्या वस्तूंना, व्यक्तींना कसं महत्त्व येतं. चित्राला वस्तूपासून मुक्त करण्याचं नकारात्मक श्रेय जसं पिकासोला जातं;  पण चित्रातील  संपूर्ण चौकटीतील लयपूर्ण अनुसंधान एकाग्रतेनं शोधण्यात प्रक्रियेची परिणती व्हायला हवी होती. हे काम पिकासोनं केलं नाही. ते  वॅनगॉगनं पूर्ण केलं. चौकटीतील अवकाशात रंगाची मुक्त क्रीडा घडत  असताना त्याला अवरोध न करता निसर्गातील आकारघटितांचे  दधिक विश्लेषण मूलग्राही वृत्तीनं समजून घेतलं पाहिजे. सर्जनकाळी मनातील बौद्घिक प्रक्रियांना विराम देऊन अंत:करणातील उपजत प्रेरणेने  मुक्ताविष्कार साधला पाहिजे. कारण निर्मितीच्या वेळी बौद्घिक यंत्रणा कधी-कधी अडगळ ठरते. निसर्गातील वास्तुविश्र्वासाचा शोध फक्त  रंग, रेषांच्या बाजूनं न घेता कलावंतांच्या सर्जनशील जाणिवेतून घेता आला पाहिजे. त्यामुळे चित्र कोरडं- शुष्क वाटत नाही तर त्याला  मानवी भावजीवनाचा ओलावा येतो. जीवनरसातून कलाकृतीत ऊर्जा निर्माण होते. त्यामुळं कलाकृतीचा आशय जीवनातूनच शोधायचा.  त्यामुळं कलाकृतीत त्याचं सौम्य येणारच.
अशी चर्चा रंगात गेली की चार-पाच तास कसे जातात. कळतसुद्घा नाहीत. चर्चा नेहमीच विषयाच्या तळाशी घेऊन जायची.  कधी-कधी इतकं नवं ऐकायला मिळायचं की माझी दमछाक व्हायची. कधी धर्मावर तर कधी अध्यात्मावर, कधी गमतीजमती तर कधी  जगण्या-मरणावर ! एकदा मी म्हटलं, तुम्ही मृत्यू पाहिलाय का? मरण येतं म्हणजे नेमकं काय होतं? कसा जातो जीव? त्यावर मृत्यू  म्हणजे शरीर क्षीण होत जाणे, श्र्वास घेण्याची गती मंदावणे आणि शेवटी श्र्वास घेता येईल इतकीही शक्ती न उरणे, म्हणजे जीव जाणे.  किती अवघड प्रश्नावर केवढ सापं उत्तर.
कधी साधा-सोपा-गरीब वाटणारा माणूस खोडकर आहे असं कुणाला सांगूनही पटणार नाही; पण अनेक वेळा आपल्या गर्द  काळ्या रंगाचा आणि पांढर्‍याशुभ्र कडक इस्त्रीच्या कपड्याचा फायदा उठवत आंध्रचे माजी आमदार म्हणून अनेकदा सरकारी मेजवान्या  झोडल्यात तर कधी कॅनड, बॅनग्ड बोलून पॉपलेट मासे फस्त केलेत.
कधी-कधी अंभोरे सरांबद्दल विचार करताना मला उगाच असं वाटतं. बरं झालं यांनी लग्न केलं नाही, कदाचित त्यामुळं खूप  मर्यादा आल्या असत्या त्यांच्यातील कलावंतावर. मुलखावेगळी भटकंती, अनुभवाचं समृद्घ आयुष्य, प्रेमळ मित्रपरिवार किती मजा आहे  यांची; पण अलीकडं त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी पाहता असं वाटतं, कुणी तरी पाहिजे होतं ह्यांना बांधून ठेवणारं, काळजी घेणारं, आपण  सर्व मित्र आपापल्या घरात व्यापात गुंतलेले नि हा माणूस कुणाला त्रास होणार नाही याची आजन्म काळजी वाहणारा. गौरवग्रंथाच्या  निर्मितीचा विचार जेव्हा खेडेकर सरांजवळ बोलून दाखवला तेव्हा त्यांनी तात्काळ ती जबाबदारी स्वीकारली. श्रीधर अंभोरेंवर प्रेम  करणार्‍या मित्रांना जेव्हा फोन लावले, तेव्हा सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वत:बाबत बोलण्यासाठी  अंभोरें नी जरी मौनव्रत धरलं  असलं तरी आम्हाला या निमित्तानं मुकेपणा सोडता आलं याचा आनंद आहेच.
श्रीधर अंभोरे नावाचा माणूस नेमका कसा आहे? याची जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीनं त्यांची समीक्षा  करीत असतो. समंजस, प्रगल्भ, व्यासंगी, प्रसंगी खट्याळ, खोडकर अशा वेगवेगळ्या भूमिकांत अंभोरे सतत भेटत आले आहेत.
माणसानं कुठल्या आई-वडिलांच्या पोटी कुठल्या जातीत, धर्मात, देशात जन्मावं याचं स्वातंत्र्य त्याला कधीच नसतं; पण  जन्माला आल्यानंतर त्यानं कसं जगावं, काय करावं, काय करू नये याचं स्वातंत्र्य मात्र कमी-अधिक प्रमाणात त्याला मिळवता येतं.  अंभोरेंच्या बाबतीतही तेच झालं. दलित समाजात, प्रतिकूल परिस्थितीत जन्माला येऊनही त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. जातीचे  फायदे घेतले नाही किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी कधी त्याचा वापर केला नाही, तर उलट आयुष्यभर नेहमी सर्वसमावेशक भूमिका  घेऊन सर्वव्यापी होण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्यांना त्यात यशही मिळालं. महाराष्ट्रभर विखुरलेल्या सर्व जाती-धर्मांचा नि कला  प्रकारातील त्यांचा मित्र परिवार पाहिल्यावर हे सहज लक्षात येतं.
चित्रशैलीच्या बाबतीतदेखील आपल्या अभावाच्या जागांना प्रभावशील बनवून त्यांच्या कुंचल्यानं बाभळीसारख्या काटेरी  झाडाला त्यांनी मोरपिसाचं वैभव प्राप्त करून दिलं. अपार कष्ट, दु:ख, दैन्य, दारिद्र्य याची वेदना चितारताना चेहरा हरवलेली, राब राब राबून  रापलेली माणसं पाहिली की काळजात चर्र होतं. त्यांच्या चित्रांना समजून घ्यायला गेलं तर दु:खानं थिजायला होतं. तसं पाहिलं तर  अंभोरेंकडे स्टुडिओ नाही. मोठमोठ्ठी रंगीत, देखणी, पेंटिंग्ज नाहीत; पण तरी अंभोरे महाराष्ट्राच्या कलाप्रांतात सर्वपरिचित व प्रसिद्घ आहेत.  ‘दिंडी’, “आदिम’, ‘हंस”, ‘अस्मितादर्श’, ‘ऊर्मी’, ‘अनुष्टुभ’, ‘सर्वधारा’...
यासारख्या मराठीतील महत्त्वपूर्ण नियतकालिकांतून आणि अनेक मित्रांच्या पुस्तकावरील मुखपृष्ठ व आतील रेखाटनांतून  अंभोरेंच्या चित्रांनी पुस्तकांना देखणेपण, नेटकेपण, आशयसंपन्न केलं आहे.
जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, डॉ. राजन गवस, रंगनाथ पठारे, डॉ. गंगाधर पानतावणे, रामदास फुटाणे, जयराम खेडेकर,  राजन खान, निळु फुले, सदाशिव अमरापुरकर, अरुणा ढेरे, सुमती लांडे, सतीश बडवे, या मराठीतील प्रतिष्ठित मान्यवरांपासून ते नव्या  पिढीतील अगदी कुठल्यातरी कानाकोपर्‍यातील नवोदितांपर्यंत त्यांचा दोस्ताना पाहिल्यावर माणूस प्रेमी, माणुसकेंद्री व्यक्तिमत्व आहे, असं  वाटल्यावाचून राहत नाही. आपल्या आनंदाच्या, सुखाच्या प्रसंगी हमखास सहभागी होऊन मोकळी दाद देणारा तर दु:खाच्या वेळी ओल्या  नजरेनं दुरूनंच मूक दिलासा देणारा हळव्या मनानं समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणारा मन जगणारा प्रगल्भ कलावंत म्हणून  अंभोरे सतत भेटत आले आहेत.