काळाच्या दगडावरची रेघ : श्रीधर अंभोरे : श्रीकृष्ण राऊत,

                                     

                                                                प्रिय श्रीधर अंभोरे,

मे १९८३ ला तुझ्या रेखाचित्रांना मिळालं फाय फौंडेशनचं पारितोषिक पाच हजार रुपयांचं. हे ऐकून-वाचुन आज माझं मन  प्रसन्न झालं आहे. वार्‍यापेक्षाही हलकं... अगदी तरल मनात आत... आत... खोल... खोल... अंतर्मनाच्याही पार पल्याड कुठंतरी हळुवार  उमलत आहेत एका अलौकिक हर्षकमळाच्या पाकळ्या. ह्या उमलण्याची मोरपंखी संवेदना जाणवत आहे मला तीव्रपणे, ह्या आनंदलाटा, ही  सुखद भरती, हा हर्षकल्लोळ...! अभिनंदन ह्या तोकड्या शब्दांच्या इवल्याशा ओंजळीत सामावणारे नाही. सामावणे केवळ अशक्यच!  जगातल्या संपूर्ण भाषा आणि तमाम लिपींनाही शक्य् ा नाही माझी ही सविकल्प समाधी शब्दबद्घ करणं... मी अनुभवीत आहे एक  शब्दातीत स्पंदन हृदयाचा गाभारा झंकारित करणारा एक नादमय हिंदोळा... शब्दांच्या मिळीला लख्ख आव्हान करणारा काव्यमय पारा.  जो निसटू पाहतो आहे क्षणोक्षणी आणि मी... जिवाच्या आकांतानं करतोय प्रयत्न त्या काव्यमय पार्‍याला अलगद धरण्याचा... अलगद  कवटाळण्याचा... अध्धर उचलण्याचा...
रूपाला आग लागलेल्या अभिजात सौंदर्यवतीच्या सौंदर्याची द्यावी दाद तिच्या हातबोटांची पटापट चुंबनं घेऊन, तशी द्यावीशी  वाटते मला दाद... आज... तुझा निग्रोसारख्या काळ्याशार बोटांची, घ्यावीशी वाटतात चुंबनं पटापट... कदाचित... कदाचित... तीही माझ्या  मनाचं वाटणं व्यक्त करू पाहणारी असेल एक देखणी तर्‍हा..
तुझ्या जीवघेण्या रेषा तर केव्हाच गोंदून घेतल्या आहेत मी माझ्या डोळ्यावर आणि ओवाळून टाकला आहे जीव तुझ्या  रेखाचित्रांवरून, तुझ्या मैत्रीवरून व तुझ्यावरूनही त्रिवार ! अशा विलक्षण नात्यानं 'माझ्या ' झालेल्या तुझ्या अफलातून रेषांची कदर केली  आहे फाय फौंडनने. पाच हजारांचं पारितोषिक देऊन.
डॉ. जयंत नारळीकर, आर. के. लक्ष्मण, जी. ए. कुलकर्णी यांच्यासोबतच तुझाही गौरव करणार्‍या फाय फौंडेशननं तुझ्या  गौरवाला दिली एक झळाळती किनार, एक लखलखती झालर, एक वेगळं डायमेन्शन...! हे तर सगळे आपापल्या क्षेत्रातले घ्बापङ आणि  तुझ्या सुकुमार रेषांची नव्हाळी... आताशा कुठं 'मॅच्युअर्ड ' झालेली. तुझ्या तारुण्याच्या आणि तुझ्या रेषांच्या यौवनाच्या उंबरठ्यावर असं  घ्मापङ शिगोशिग भरून ठेवणार्‍या फाय फौंडेशनचं मी करतोय मन:पूर्वक अभिनंदन आणि देतोय शतश: धन्यवाद फाय फौंडेशनला.
ग्रेसच्या शब्दांची सोबत करण्याची तुझ्या रेषांची इच्छा पूर्ण केली तरुण भारतातल्या ' मितवा ' नं. माझ्या कवितांसाठी तू  काढलेल्या त्या रेखाचित्रांनी मला दिलेल्या तुझ्या इच्छापूर्तीचा आनंद अनुभवतानाही मी झालो होतो असाच हलका, तरल, हळवा.
कवींना भेटायला याव्यात कल्पना, शब्द तशाच येत असतील तुला भेटायला रेषा... विविध आकार लयबद्घ करीत लवचिकपणे  आणि घनगर्द मेघातून नर्तन करीत यावी वीज तशा असतील उमटत तुझ्या बोटांतून कागदावर... शाईतून जळत... उजळत...
अकोला जिल्ह्यातील चिखलगावला तुझ्या जन्मगावी... अंबादास अंभोरे-तुझे बाप... बापाच्या हातात दोर... कधी सरळ... कधी  लयदार... मधात ढोर... अलीकडे सगळं बळ एकवटून ढोराला लोटणारा तुझा इवलासा जीव आणि एक क्षण मंतरलेला, भारावलेला, तुझ्या  रोमरोमी भिनलेला. अख्खे अस्तित्व व्यापून टाकणारा, तुझ्या डोळ्यापुढं अस्पष्ट होत गेला पलीकडचा बाप आणि पुसट होत गेले  अलीकडचे ढोरही... तुझ्या घनगर्द बुबुळांवर विजेचे भयभयाटी नर्तन करणारा फक्त दोर ठळकपणे... कधी सरळ... कधी लयदार... कधी  सरळ ! दोर राहिलाच नाही. तो झाला अभिव्यक्तीचं एक रूप. एक रेषा. तुझ्या बोटांना एक अपूर्व कंप, एक नवथर थरथर, एक नवजात  अप्रूप ! याचक्षणी झाली तुला रेषा प्रसन्न-कधी सरळ, कधी लयदार...
एक वेगळाच कॅमेरा झाला तुझ्या डोळ्यात फिट. आखरातल्या निष्पर्ण बाभूळबनातील एकमेकात गुंतलेल्या काळ्याभोर  असंख्य काड्या स्वत:चे आकार ठसवीत शिरल्या तुझ्या डोळ्यात कायमच्या. बसल्या रुतून. निगेटिव्ह बनून. कधी त्या उमटायच्या  पॉझिटिव्ह होऊन शाळेच्या पांढर्‍या शुभ्र भिंतीवर कोळशानं तर कधी उमटायच्या काळ्या डांबरी सडकेवर लेखणीच्या तुकड्यानं. जशी ही  अभिव्यक्ती होती अटळ, अपरिहार्य, अविभाज्य, बाहेरून कुणाची जबरदस्ती नव्हती तुझ्यावर-तू चित्रं काढावीस म्हणून. तुझा छंद  जोपासण्याची नव्हती कुणाची इच्छा आणि ऐपतही. ही होती फक्त तुझी निखळ अंत:प्रेरणा, व्यक्त होण्यासाठी बेचैन  करणारी  उमटण्यासाठी अस्वस्थ करणारी.
अशीच एकदा चिखलगावात लागलेली आग. अजूनही जळते तुझ्या डोळ्यात एक निगेटिव्ह बनून. आग विझवण्यासाठी घागरी  घेऊन जाणार्‍या बाया... त्यांच्याही देहांचे घट आणि लयदार घाट उमटतात त्या निगेटिव्हमधून लयबद्घ आकार घेत. देहांचे घट आणि  मातीच्या घागरी एकमेकात मिसळून... ‘अस्मितादर्श’च्या पानावर... एक अप्रतिम रेखाचित्र होऊन.
डॉ. पानतावणे सरांनी सर्वप्रथम तुला दुकानात नेऊन दिली करून ओळख... आर्टपेपरची शाईची... विविध पेनांची आणि  रंगांचीही. नंतर रंगांशी खेळून पाहिलंस तू काही दिवस; पण रंग लागले नाहीत तुला धार्जिणे, जमला नाही तुझा सुर त्यांच्याशी आणि  खुणावत राहिल्या तुला रेषा नवनव्या तर्‍हेनं. कात टाकून नजर ठहरू न देणार्‍या नागिणीसारख्या पुन: पुन्हा...
बसस्थानकावर दहाच्या पुढं सर्व बसेस निघुन गेल्यावर जसा भोगी मिळाला तशी रात्र काढीत... आरामात देह अंथरणार्‍या  प्रवाशांचे आकारही बनतात. तुझ्या डोळ्यात निगेटिव्हज... आणि त्यांच्या हातापायांची वळणं... देहाची लय...अंगभूत वेदनांची जाणवते  तुला. मग त्या वेदनेचा वेध घेणार्‍या रेषा उमटवितात कागदार थकलेले भाग, तिच्या अंगावरची कोमलता व्यक्त करतात फुलं अशावेळी  तुझं रेखाचित्र इतकं काव्यमय होऊन गेलेलं असतं की, वाटतं रेषांनी संवाद करू पाहणारी ही एक कविताच आहे.
जगण्याचे संदर्भ, आकार, स्पर्श, वळणं, निद्रा, सौंदर्य... आपण जे अनुभवतो, जगतो ते सर्व तुझ्या रेषा पकडू शकतात सहज.  तुझ्या रेषा म्हणजे आमच्या अवतीभोवतीच्या संपूर्ण जीवनाचा बिलोरी आरसा, प्रतिबिंबं, माणसांची, झाडांची, चिमण्यांची, पाखरांची, फुलांची,  पानांची, मंगळसूत्राशी खेळत चुटुचुटु दुध पिणार्‍या तान्हुल्यांची. हीच आहेत तुझ्या चित्रकलेची विद्यालयं, महाविद्यालयं आणि विद्यापीठंही.
अहमदनगरच्या पोस्टाच्या काऊंटरवरही आल्या एखाद्यावेळी भेटायला रेषा तर आता टाळणं नाही तुझ्या हातात आणि  हातात असलेला पगार पुस्तकं विकत घेण्यात आणि चक्रमुद्रित घ्आदिमङ चे छापील दिवाळी अंक काढण्यात लावतोस तू सत्कारणी.  मिळवतोस दूर, दूर परदेशातही जिवाभावाचे मित्र, मैत्रिणी. अशी तुझी जगावेगळी कमाई ! तुझ्या रेखाचित्रांतील झाडांवर, पानांवर, फुलांवर,  दगडांवर आणि माणसांवरही येऊन बसणार्‍या इवल्या-इवल्याशा चिमण्या तुझ्या चित्रांना करून टाकतात सजीव, ह्या चिमण्या म्हणजे तर  चैतन्य तुझ्या चित्रांचे, प्राण तुझ्या रेषांचा. किती इमानदार असतात चिमण्या ! तू जेवतोस त्यांना ताटात घेऊन आणि त्या तुझ्या चित्रात  ओततात जीव स्वत:च्या इवल्याशा अस्तित्वानं.
तुझ्या रेखाचित्रांतील माणसांना नसतात चेहरे; पण अवतीभोवती डोळसपणे पाहिलं की दिसतात आम्हाला तुझ्या  रेखाचित्रातील माणसं जगताना, हिंडताना, झोपताना, तुझ्या रेखाचित्रांवर लिहिताना अर्थातच सुस्पष्टपणे ठाऊक आहे मला माझ्या जाणिवेचं  सामर्थ्य आणि मर्यादाही. त्या दोहोंवरही पारखून आणि कस लावूनच मी घ्वेगळेपणङ मागंपुढं ओळखलंही जाईल अंभोरेशैली म्हणून  आणि काळाच्या दगडावर उमटेल एक ठसठसीत रेघ... तेव्हा येणार्‍या पिढ्या सांगतील एकमेकांना त्या रेषेचं नाव-श्रीधर अंभोरे !