काही वर्षांपूर्वी नाटककार, विजय तेंडुलकर व्याख्यानाच्या निमित्ताने अहमदनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी चित्रकार श्रीधर अंभोरेची आवर्जून भेट घेतली. आणि तीन दिवस नगरमध्ये थांबून श्रीधरची दीर्घ मुलाखत घेतली. आणि दिंडी या दुरदर्शन मालिकेत ती प्रसारीत केली.
पु.ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, कवी आरती प्रभू व बा.सी. मर्ढेकर यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम करत. हाच एक प्रयोग अहमदनगरमध्ये होतो. त्या कार्यक्रमाची पत्रिका डिझाईन श्रीधरने केली होती. पडदा उघडल्याबरोबर पु.ल.नी मनापासून पत्रिकेचं कौतुक केलं.
चित्रकार श्रीधर अंभोरे या चित्रकाराच्या आयुष्यातल्या या ठळक घटना. अशा घटना नंतर खूपदा घडत गेल्या. रंग-रेषांची अभिजात लय श्रीधर जन्मासोबत घेऊन आला आहे. त्याचं घर मातीचं होतं. भिंतीवर कोळशाने चित्रे रंगू लागली. एक अदभूत अविष्कार लहानपणीच त्याला गवसला. बाभूळ हाच चित्रातला गुरू. बाभळाचं नंतर मानवी प्रतिकृतीमध्ये रूपांतर झालं. चित्रात आवेग आला, नाद आला. लयतत्व आलं. बुद्ध, दगड, झाडे, पानं, पक्षी, सारी निसर्गरूपं चित्रात आली. चित्रं काही सांगू लागली. श्रीधरला भटकण्याचा नाद त्यातून ताडोबा, मळेघाट, नवेगाव, बांध, मध्यप्रदेशातील जंगल, भीमबेटका, नर्मदा नदी फिरला. सौंदर्य आणि अनेक आकार चित्रात यायला लागले. यामागे विचार होता, नवसर्जन होतं. श्रीधरने रेषेंचे अनेक प्रयोग केले. त्याच्यामते कुठलीही रेषा ही संदिग्ध अनुभूती देते आणि अंतर्मुख करते. सौंदर्य आणि अनेक अर्थांच्या वहनाचं काम रेषा करते आणि त्यातून आनंद मिळतो.
रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलय, रंगेरषांचे अंतिम ध्येय एका सुसंगत परिपूर्णतेचा शोध घेणे असते. चित्रातून विश्वार्थ झरत असतो. तेच म्हणणं श्रीधरच्या चित्रसंचिताला लागू होतं. स्त्रीचं जगणं, स्त्रीची विविध रूपे, स्त्रियांचा सोशीकपणा, तिचे समाजातील स्थान चित्रातून तो अलगदपणे रेखाटतो. बुद्धाची अनेक रूपे, दु:ख वेदना, समाजातील सर्वच प्रकारच्या माणसाचं जगणं, रेषेतून गहिरेपणाने, उत्कटपणे कागदावर आकार घेऊन येते. या सर्वांच्या तळाशी चिंतन आहे, चित्रसाधना आहे, ही वेदनेची रेषा आहे.
श्रीधरने अहमदनगरहून आदिम, दिंडी ही अनियतकालिके प्रकाशित केली. त्यातून रेखाटनांचे, चित्रांचे अनेक प्रयोग केले. सायक्लोस्टाईल प्रती निघत. त्याचं साहित्यविश्वात चांगलं स्वागत झालं. त्यानंतर श्रीधरची हंस, अस्मितादर्श, अनुष्टुभ, राजस, युगवाणी अशा अनेक नियतकालिकांमध्ये सातत्याने चित्र प्रकाशित होत असतात. एक स्वतंत्र शैली आणि सशक्त प्रतिभेचा कलावंत म्हणून तो आपली ओळख टिकवून आहे.
सुख-दु:खाच्या गडद, गहिर्या जाणिवा, माणसाची मातीशी असलेली घट्ट नाळ आणि निसर्गाच्या खांद्यावरचा हात ही चित्रकार म्हणून श्रीधरची बांधीलकी आहे.
भटकंतीतून जगाकडे पाहणे म्हणजे खर्या अर्थाने स्वत:ला समजून घेणे. ही प्रक्रीया आपोआप कलाविष्कारात निथळत जाते आणि कलावंत, चित्रकाराचं अस्सलत्त्व अधोरेखीत करते. तेच श्रीधर आयुष्यभर करतो आहे. रानातला पक्ष्यांचा कल्लोळ त्याच्याशी संवाद साधतो आणि अख्ख रान श्रीधर कागदावर रेखाटत जातो. बाभूळबनात श्रीधर पुन्हा पुन्हा हरवत जातो.
- राजू देसले