श्रीधरदादांची अन माही भेट भरतपूरले झाली. तवा मी भरतपूरले रायत जावो. श्रीधरदादाचे जवळचे सोयरे तथीसा रायतात. चिखलगावपासून भरतपूर हा अक्रा किलोमीटर अशीन. माये बी चिखलगावले सोयरे हाइतं. वयख झाल्यावर त्याईनं मले सांगीतलं की ते बी माये सोयरच हायतं.
मले लय खुशी झाली. पन त्याच्याईपक्सा आजचं हे सोयरपन व्हयेल हाये ते लय मोटं हाये. असा इच्यार केला की अभिमानानं शाती फुगते. म्या श्रीधरदादाबद्दल लिव्नं म्हणजे पाखरायले पानी घ्युन जायासर्कीच गोठ आहे. तरी मले लिवा लागते. श्रीधरदानच भरतपुर्ले सांगल्ल व्हतं. ‘लिव्हता हात थांबू द्याचा नाई’ म्हणून हे सुरू हाय टेकेटेके.
श्रीधरदादा आजकाल आकोल्याले आले की मले फोन कर्तातच. माया कानात तोच दसरा, तोच सन. मायाजोळ हिरोहोंडा गाळी व्हती. तिच्यावर बसून आमी मारे हिंडो. पन ते मायी गाळी यस्टी स्टॅण्डवरून चोट्यायानं लांबोली. आजुन्नाई सापळली. आता माया मोठ्या पोरीची स्कुटी घेतो कईकई तिच्यावर हिंडतो अठून तठरोक दोघइझंनं. मंग घरी याले लाग्लो की जयहिंद चौकात थांबा लागतं. लेक्राईसाठी ते तठीसा काईतर्मा इकत घेतात. भिस्कुट घेत्लं तं त्याची मेक्रींग डेट पायतात. तरबूस घ्याचं अस्लं तं ते साव्हलीतलंच अस्लं पायजे. ते नवं हायब्रीट जातीच ना पायजे. जुन्या तरबुसासार्क हिर्वगार पायजे. पट्ट्यापट्ट्याचं ना पायजे. चॉकलेट-कॅडबर्याईचे तं त्यायले बेज्या नावं पाठ हायत. इतकी मालुमात या बॉले हाय का आपून हपसक व्हून जातो. याच्याऊन महे आमच्या घुसरचे कवी ना. ही. गोपनारायण याइच्या दोन ओळी आठोल्या.
गेली माय दलिंद्री गेली वं / माया भिमानं ठोकत नेली वं
तं मंग आमी आमच्या आश्रय नग्रातल्या कोट कॉलनीत आलो की मंग तं पुसूच नोका. सारं घर त्यायच्या शब्दा-सहवासानं डच्च भरून जाते.
आमची मोठी पोर्गी विप्लवीशी त्यायचं लय पट्टे. ते तिले सायंसबद्दल काय काय सांगतात, त्यायचं त्यायलेच माईत. प्रशस्तीशी ते सयपाकाच्या गोठी कर्तात. अन संदर्भशी बोलताखेपी ते त्याच्या इत्केच व्हतात. माया बायकोले त्यायनं घोळाची भाजी शिकोली. जथी जे पायजे तेच कसं वाप्रावं, तितकच कसं वाप्राव. हे तिच्या ध्यानात आनुन देल्लं. घराची साप-सपाई, कुठीसा कोयाचं जायं नस्लं पायजे, कोपरे कापरे झाल्ले पायजात. सामानाची हालवाहलव सदाई करावं. अशा बारीक चिरीक गोठीतई ते रमतात. आम्च्या सार्क्याइच्या संसाराले आकार देतात. अने सांग्तातई असं का बायका नवर्याचं ना आईक्तीन पन या बाबाचं म्हन्न त्यायले पटकन पट्टे, अन आमचं मातर ‘धाऊ धाऊ मेला अन् पुरभी नाई ज्येवला. असंच चाल्ते.’
श्रीधरदादासंग आपुन असलो की बोल्याचा ठेका त्यायचा. आपुन निर्रा आयकावं. देवाव हुमकारे. समज्ल नाई तं इच्याराव जरासक. नाइत चाला पुळेह. काऊन का आपल्याले माईत हाय जो आयकेना कया तो हिंडे भया भया? असा हा भारी मानूस. कबाडल्ल. त्याया टकुरीत काय काय ठुते त्याचं त्यालेच माइत. पन काइई इच्यारा तो सांग्तेच. इतक्या मोठ्या मोठ्या लोकाईशी त्याचा जीव जोळून परिचय हाय. पन कवासा हा असा का तो तसा हा कईच सांगत नाई. पन तसं नशीन कायsss अं ! पन असं घ्घेनं ना देनं अन कंदिल लावून नेनंङ या मान्साले पटत नाई. काय सांगाव अन् काय ना सांगाव हे त्यानं खुद ठरवेल हाय. हा त्यानं जे जे खुद ठरवेल हाय तो हाये खरा श्रीधरदादा. मनानं ढन्न. तो सदाई नाई दिसत. एखांद्या व्यक्ती डकावतई अशीन. पन आपुन पायेलोक तो झन्न पयत निंगतेई.
अकोल्यातुन फिर्ताखेपी लय मजा येते. हिंगण्याजोळच्या कॉर्टरजोळून जाताखेपी सांग्तात की तठी ते रोज जात. त्यायचा दोस्त व्हता तठी-इकळे रमेश नग्ररात वाल्मिकी नग्राच्या आंगं त्याचा यक दोस्त. जयहिंद नग्रातल्या बेप्टा, हरिहरपेठीतल्या झोप्ळ्या, आकोट स्टँडवर्ची त्यायची शाळा, दिवेकर आखाळ्या जोळचे रस्ते, रनपिसे नग्रातल्या जुन्या वळखी, आकोट फाईल, शेलार फैल, जुन्या यस्टीस्टँडजोळच्या सामटा, हमरस्त्यातले भेटनारे कैफ चिलेपाले, अशी यक बेपट नाई जे त्यायले ठौक नाई. बदल झाला तं त्यायच्या डोयात भर्ते.
यकडाव श्रीधरदादा आले. मी वाडेगावले व्हतो. म्या मंग प्रजानंद उपर्वटले फोन केला. उपर्वटतं मंग साठ अन तीन इसा सारक्याच. दा-बारा आकोल्यातले नवोदित साहित्यिक त्यायनं जमा केले. एकनाथ वानखेडेच्या यस्टीच्या क्वॉर्टरात सारे बसले. तवरोक मी बी पोचलो. श्रीधरदाचा धबधबा झाला सुरू. चांग्ला घंटा, दीड-घंटा. पाऊनचारच झाला. संगित, चित्रकला, साहित्य, दिवाळी अंक, समाजकारण, राजकारण, व्यवस्थापन... विशयाची गिन्तीच नाई. निर्रा आयकतच राहा व्वाटे. ते बोलुनई थकत ना. पन टाईमई ना थांबे. झाल पळून लय वखत झाल्ता. अमाले मंग उठाच लाग्लं.
नई नई वयख व्हती. तवा मालं पुस्तक घ्घ्धम्मसंगितीङङ सुगावानं छाप्याले घेल्लं. त्याचं मुखपृष्ठ श्रीधरदादाचंच. सुगावाले पुस्तक द्यावं हे त्याईनच सूचवलं. वाघ सरांजोळ शब्दई वापर्ला. व्हता व्हता ते नगरऊन आले. चित्र आन्लं. त्याची शिडी आन्ली. पुस्तक प्रसिद्घ झालं. दीक्षाभुमीवरबी गेलं. लोकाईले दिस्लं तं लोक सोळतच ना. हे सारी कलाकारी श्रीधरदाच्या चित्रकारी बोटाईची.
आमचा सदाई कल्ला राए. भगवंत तायडे तं डायरेकच म्हनत का श्रीधरदादा आपल्या हिशावर येत नात. मंग त्याबास्ता आमी अकोल्याले घ्आंबेडकरी साहित्य मेळावाङ भरोला. भीमजयंतीले. २००९ साली. डॉ. वसंत शेंडे, अध्यक्ष व्हते, डॉ. गंगाधर पानतावने उद्घाटक त्यावक्ती श्रीधराची मदत लयच झाली. पोश्टर, फ्लेक्स, निमंत्रण पत्रीका प्रचार पत्रीका, सारं कलात्मक काम श्रीधरदानचं करून देलं. स्मृतीचिन्हा ते तं लोकईन लय, वानोलं. त्यावर बाबासायबाच्या सहीचं चित्रंग हाय. पहिल्याडावच हे अक्कल लोकायले बेज्याच पटली. ऋषीकेश कांबळे सर नं त्या स्मृतिचिन्हाइची आपल्या भाष्णातून स्तुती केली.
असा हा मानूस त्याच्या भौतालचा सारा जमानिमा उजीळं-वाजीळं दाख्वाले निंगेल हाये. आमालेबी मुटभर चाया भेटाव असा आम्चा स्वार्थ हायं. त्यातच आमाले हरीक हायं. उकिळळ्याची रया पालट्टे ते अशी. बाकी. काई नाई.