वेदनेचा वेध घेणाराचित्रकार : सुभाष डाके

                                                
अहमदनगरचे चित्रकार व कवी श्रीधर अंभोरे यांना फाय फाऊंडेशनचे पाच हजाराचे पारितोषिक नुकतेच मिळाले आहे.  प्रसिद्घीच्या झोतापासून दूर राहणार्‍या एका चित्रकाराची ही ओळख...
राष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या फाय फाऊंडेशनचे पारितोषिक अहमदनगर शहरातील होतकरू आणि उदयोन्मुख कलावंत श्रीधर  अंभोरे यांना मिळाल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. ही बाब मुळात नगर शहराच्याच गौरवाची बाब म्हणावी लागेल. केवळ शहरातच  नव्हे, तर जिल्ह्यातही अशा तर्‍हेचा बहुमान अद्याप कोणास मिळालेला नाही.
नाटककार विजय तेंडुलकर अगदी नुकतेच नगरला आले तेव्हा अंभोरे यांच्या सहवासात बराच वेळ रमले. त्यांच्या काही  कलाकृती त्यांनी बरोबर नेल्या. ते म्हणाले, ही रेखाटने म्हणजे एक प्रकारच्या सचित्र कविताच होत. अंभोरे यांची कविता रेषांच्या  माध्यमातून व्यक्त होते आणि आपल्याशी संवाद साधते.
श्रीधर अंभोरे तरल शैलीतून उच्च कलाविष्कार साधणारे अमूर्त रेखाटनकार मानले जातात. तथापि, ते केवळ रेखाटनकार  नाहीत, तर ते एक उत्कृष्ट कवी, समर्थ लेखक आणि घ्आदिमङ या ख्यातनाम अनियतकालिकाचे कार्यकारी संपादकही आहेत.  ‘आदिम’च्या स्थापनेपासून त्यांनी आपले प्रतिभाशाली व्यक्तिमत्व घ्आदिमङ मध्ये झोकून दिले आहे आणि परिश्रम, चिकाटी व निष्ठेच्या  बळावर त्यांनी ‘आदिम’ला आकार, आशय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. या बाबतीत प्रा. वसंत दीक्षित यांच्या कुशल मार्गदर्शनाचा  व नट-नाटककार सदाशिव अमरापूरकर यांच्या कृतिशील सहकार्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
आता घ्आदिमङ हे केवळ नवोदितांच्या कसदार साहित्याचे व्यासपीठ राहिले नसून तो कला, साहित्य व संस्कृतीच्या  अभिवृष्टीस वाहिलेला ग्रुप तयार झाला आहे. अंभोरे यांच्या सिद्घहस्त रेखाटनांतील तरल व सूक्ष्म छटा ‘आदिम’चे बलस्थान बनले आहे  व या रेखाटनांनी अनेक साहित्यिक व रसिकांना खिळवून ठेवले आहे. प्रसिद्घीच्या झोतापासून दूर राहणारे, माणुसकीची सदैव जाणीव  ठेवणारे व विनम्र व्यक्तिमत्व असलेले श्रीधर अंभोरे मित्रांच्या घोळक्यात राहूनही एकाकीपणे कलोपासना करीत असतात. एरवी भिडस्त  वाटणारे अंभोरे आदिममधील साहित्य निवडीच्या बाबतीत फार स्पष्ट व परखड असतात. तसेच एरवी मितभाषी वाटणारे अंभोरे  कविसंमेलनात किंवा जाहीर साहित्यिक कार्यक्रमात खूप खुलतात व त्यांच्या रसिकतेला उधाण येते. योग्य शब्दांत दाद देण्याची तर कधी  मार्मिक व त्यांच्या रसिकतेला उधाण येते. योग्य ठिकाणी योग्य शब्दांत दाद देण्याची तर कधी मार्मिक शब्दांत कोटी करण्याची त्यांची  समयसूचकता वाखाणण्याजोगी आहे. अंबाजोगाई येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांच्या पुढाकाराने स्वतंत्रपणे झालेल्या  काव्यवाचनाने खळबळ उडवून दिली होती. नगर शहरात व शहराबाहेर त्यांनी अनेक छोटी-मोठी कविसंमेलने भरविली आहेत.
‘आदिम’‘अनुष्टुभ’, ‘अस्मितादर्श’ यासारख्या दर्जेदार मासिकांची मुखपृष्ठे त्यांच्या रेखाटनांनी यापूर्वी सजली आहेत.  ‘युवास्पंदन’ च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ खूप गाजले ! याव्यतिरिक्त ‘राजस’, ‘हंस’, ‘पारिजात’, ‘जुई’, ‘श्रमिकविचार’, ‘युगवाणी’,  ‘तरुण भारत’ (नागपूर), ‘ग्रामीण कथाकथन’, ‘स्मरणिका’ इत्यादी अनेक नियतकालिकांमधून त्यांची रेखाटने प्रसिद्घ झाली आहेत. दहा  ते पंधरा कवितासंग्रहांवर त्यांची मुखपृष्ठे आहेत. गेल्या महिन्यातच त्यांची रेखाटनासंबंधी दूरदर्शनवर मुलाखत झाली. त्याचवेळी त्यांच्या  मोहक शैलीतील अमूर्त रेखाटनांची जादू सर्वांना समजली. तोपर्यंत प्रसिद्घी पराङमुख माणूस पडद्याआडच होता.
त्यांच्या रेखाटनांमधील व्यक्तींना चेहरे नसतात; पण चेहर्‍यांचे अस्तित्व जाणवते. डोळा नसतो; पण दृष्टी असते आणि दृष्टीसमोर दिशा असते. निसर्गचित्रात आकाश नसते; पण पक्षी असतात व पक्ष्यांच्या गतीतून आकाशाचे अस्तित्व जाणवते. अवघे एक पान  झाडाचे आत्मचरित्र सांगून जाते. ही संपूर्ण किमया त्यांच्या तरल रेषा घडवतात. एखाद्या कवितेला नादमाधुर्य असावे तशी त्यांच्या रेषांना  लयबद्घता असते. त्यातून अनेक प्रकारचे गूढ उलगडत जातात. केवळ लय आणि तरलता एवढीच त्यांच्या रेषांची वैशिष्ट्ये नसून रेषांमधून  अभिव्यक्त होणारा आशय आणि आर्तता मनाला भिडणारी असते. आपण मध्यमवर्गीयांनी सूर्याची घ्तेजस्वी प्रतिभाङ गृहीत धरलेली असते;  परंतु विद्रोही कवितेतील पेटलेल्या सूर्याची प्रतिभा अंभोरे यांच्या रेखाटनात पाहावी ! त्यांच्या रेषा कृतार्थ कधीही नसतात. त्या नेहमी  उपेक्षित समाजसमूहाची वेदना टिपण्यासाठी तृषार्त बनलेल्या असतात. सामाजिक आशय घेऊन येणारी ही आवृत्ती हाच त्यांच्या रेखाटनांचा  स्थायीभाव आहे ! त्यामुळेच ‘अनुष्टुभ’, ‘अस्मितादर्श’सारख्या अग्रगण्य नियतकालिकांत त्यांच्या रेखाटनांना नेहमी प्राधान्य मिळते.
त्यांचा मूळ पिंड कवीचा आहे. त्यामुळे त्यांच्या रेषांत काव्यमयता येतेच ! परंतु हा कवी स्वप्नात रमणारा नसून काव्याचा  ध्यास घेणारा असल्यामुळे रेषा अधिक प्रगल्भ वाटतात. या रेषा चित्रमय न राहता मंत्रमय बनतात. सामाजिक जाणिवांचा वसा घेतला  असल्यामुळे व्यक्तिसमुहाचे चित्र समाजचित्रांचा आरसा बनते.
सामाजिक बांधिलकीच्या संदर्भात अंभोरे म्हणतात, अशी बांधिलकी समाजाची म्हणून यायला नको, तर कलेच्या  आविष्काराचा भाग म्हणून यायला हवी. कलावंत हा व्यक्ती व माणूस असा दोन पातळीवर जगत असतो. त्यांच्यातील माणूस जितका  संवेदनक्षम असेल तितकी कलेतील सामाजिक जाणीव संपन्न होत जाते. जीवनदृष्टी मानवतावादी असेल तर कलानिर्मितीला सामाजिक  आशयाची व्यापक खोली आपोआप मिळते. हेतुत: वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. अंभोरे यांची रेखाटने एवढी स्पर्शून का जातात याचे  उत्तर त्यांच्या वरील विचारसरणीत सापडते.
त्यांनी जे जीवन जवळून पाहिले आणि अनुभवले आहे त्याचेच दर्शन त्यांच्या रेषांमधून घडत असल्यामुळे चित्रिनिर्मिती  कसदार वाटते. त्यांनी आदिवासी समाजाचा जवळून अभ्यास केला आहे. त्यासाठी प्रसंगी शारीरिक क्लेश सहन केले आहेत. एकदा तर  आदिवासींची छायाचित्रे टिपताना त्यांच्या जिवावर बेतले होते. दलित, शोषित व उपेक्षित वर्गाचे चित्रण त्यांच्या रेषा नेहमी घडवतात.  दुग्धपान करणारे मूल असो किंवा उशाशी चप्पल घेऊन झोपणारी शांत स्त्री, त्यातून एका आदिवासी मातेच्या जीवनाचा स्तर पाहायला  मिळतो. बैलगाडी ओढणारे बैल रेषाबद्घ झाले असतील तर ते संबंध शेतमजूर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतीक म्हणूनच प्रत्ययास  येतील.
अंभोरे यांच्या कलेचा त्यांच्या जगण्याशी मेळ बसलेला आहे. हा जीवनानुभव त्यांची रेखाटने जिवंत व रसरशीत बनवतो.  उदाहरणार्थ, त्यांच्या रेखाटनांत आपल्याला चिमण्या किंवा छोटी-छोटी पाखरे भेटतात. ती फार लोभसवाणी वाटतात. अंभोरे यांच्या घरी  गेलात तर त्यांच्या घराच्या खिडकीत चिमण्या येण्याची ते वाट पाहत बसलेले आढळतील. त्यासाठी ते तांदळाच्या दाण्यांची किंवा  अन्नपदार्थांची पखरणही करतील. त्यांच्या घरातील कॉटखाली कदाचित अडगळ आढळेल. त्या अडगळीचा आपण तिरस्कार करायला  जाऊ; पण तसा तिरस्कार करून चालणार नाही. कारण त्या अडगळीत एखादी मांजर व्यालेली आढळेल आणि काही दिवसांतच तिच्या  पिलांचा विरह सहन करावा लागणार म्हणून अंभोरे अस्वस्थ पाहायला मिळतील. अंभोरे यांनी चित्रकलेचे शिक्षण कुठल्याही शाळेत  घेतलेले नाही. त्यांनी स्वयंभूपणे ही कला आत्मसात केली आहे. स्वत:च स्वत:ची शैली घडवली आहे. त्यावर कुणाचा अनुकरणात्मक ठसा  वा संस्कार उमटलेला नसल्यामुळे रेखाटनांचा घाट स्वतंत्र वाटतो. मुक्तछंदातील कवितेचे व्यक्तिमत्व जसे संपूर्ण विकसित वाटते तसे  त्यांच्या रेखाटनांचे आहे. अहमदनगरमधील सिटी पोस्टातील आपली नोकरी सांभाळून हा हौशी कलावंत पुढे जात आहे. कुठल्याही  विश्र्वविद्यालयात शिक्षण न घेतलेला हा व्रतस्थ कलावंत शून्यातून विश्र्व उभारू पाहत आहे. रसिकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सदैव  असतील.

____________________________________________________________________