स्टुडिओ नसलेला चित्रकार : सतीश बडवे



                               


सर्व बाजूंनी विचार करून माणसाचं जगणं रेषांमधून उमटवणारा श्रीधर अंभोरे नावाचा माणूस तसा मुलखावेगळा. पण केवळ माणसंच नाहीत तर जंगलांवर,झाडांवर, पशुपक्ष्यांवर चिंतन करीत स्वत:चं जगणं अधिक समृद्ध बनवणारा आणि त्यांनाही रेषांमधून साकार करणारा श्रीधर म्हणजे जातिवंत साधुत्वाचा आविष्कारच म्हणायला हवा. फकिरी वृत्ती हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग. पण श्रीधरच्या छोटेखानी घरातली टापटिप नजरेत भरणारी. अखंड ब्रह्मचर्य त्यानं कधी स्वीकारायचं ठरवलं हे माहीत नाही, पण त्याच्या मनातली संन्यस्त वृत्ती बहुधा लहानपणापासूनच असावी. हे सारं वास्तव असलं तरी श्रीधर तसा माणसांच्या गराड्यात रमणारा. गराड्यात असूनही अलिप्त राहणारा. काहीसा एकान्तप्रेमी, घरभर वाचनसंस्कृतीच्या खुणा विखुरलेल्या. बहुधा असं एकही नियतकालिक नसावं, की जे श्रीधरच्या घरात सापडू नये. केव्हाही जा- चर्चा होणार ती वाङ्‌मयाबद्दलची. सोबतीला त्यानंच बनवलेला चहा. कुठल्या तरी रानावनातनं आणलेल्या मुळ्या टाकून केलेला. तो तसा उत्तम बावर्ची. त्याच्या हातची भाजी लाजबाब. सामिष आहार बनवण्यातला त्याचा हातखंडा असाच अपूर्व. मला नेहमीच प्रश्न पडतो की, हा माणूस रेषांकडे वळला कसा? कोणत्या रेघोट्या त्याच्या मनात रेंगाळत असतील? त्याच्या रेषांच्या वक्रतेतून व्यक्त होणारी भावना एकेरी असणं शक्यच नाही. माणूस म्हणून जगणं, माणूस भोवताली बघणं, माणूस म्हणून माणसाचा विचार करणं, निसर्ग आणि माणसाचा संवाद घडवणं हे काम तो आपल्या चित्रांमधून अगदी सहजासहजी करतो. तो त्याचा सहजधर्म आहे. या सहजधर्मी माणसाला ही बहुमिती रेषा कुठे गवसली असेल? तथागताच्या नि:संग होण्याचा वसा श्रीधरनं मिळवला खरा, पण रेषेपासून तो आजही अलिप्त होऊ शकलेला नाही. मग याला नि:संग कसं म्हणायचं?
                        ८३-८४ मध्ये नगरचे लोक पुलंना भेटायला जात. गप्पात विषय निघायचा; पुल विचारायचेतुम्ही नगरचे, मग नगरच्या अंभोरेंना ओळखता का?पण नगरच्या अनेकांना तेव्हा श्रीधर अंभोरे नावाचा चित्रकार माहीतच नव्हता. लोकांची चित्रकाराची कल्पना भिन्न होती. अंभोरे नावाचा चित्रकार फार मोठा असणार.त्याची अनेक पोर्ट्रेट असणार. भलामोठा स्टुडिओ असणार. लोक शोधत पोचायचे ते नगरच्या कापडबाजारातील पोस्ट ऑफिसात. सिटी पोस्ट ऑफीस हा श्रीधरचा पत्ता. कारकुनी ते पोस्टमास्तर हा त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास.
            अलीकडे श्रीधरने मुदतपूर्व सेवानिवृत्ती स्वीकारुन तिथूनही संन्यास घेतला आहे. आज श्रीधर कुठे असेल याची खात्री देता येत नाही. कारण भटकंतीची त्याची प्रचंड ओढ त्याला स्वस्थ कशी बसू देणार ? महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात तो कुठेही असू शकतो. कारण या संन्याशाचा (मित्र) परिवार खूप मोठा आहे. स्टुडिओ नसलेला हा चित्रकार 'प्रत्यक्ष' वास्तवातल्या स्टुडिओत कुठंही असू शकतो. याच्या स्टुडिओच्या कल्पनाच अशा जगावेगळ्या आहेत. तो मूळातच चौकटीत बंदिस्त राहू शकणार्‍यांमधला नाही. चौकटी तर त्याने केव्हाच्याच तोडलेल्या आणि आपल्या वर्तुळाचा परीघही रुंद केलेला.
            रामदास फुटाण्यांनी 'ऋतुराज' नावाचं एक मंडळ स्थापन केलं होतं. एका कार्यक्रमाला विजय तेंडुलकर आले होते. कार्यक्रमात तेंडुलकरांच्या हस्ते श्रीधरचा सत्कार झाला. 'चेहरे' नावाचा स्लाइड शो 'फाय फाऊंडेशन' मिळालं म्हणून त्यांनी सादर केला. त्यानिमित्तानं तेंडुलकर नगरला आले होते. श्रीधर पोस्टाच्या क्वार्टरमध्ये राहायचा. तेंडुलकर तिथेही गेले. त्यांनीच विचारलं स्टुडिओ असावा असे वाटत नाही का ?‘ नाही वाटलं कधी’, एवढंच श्रीधरचं उत्तर. चित्रकार म्हटला की, स्टुडिओ असणारच याला तडा देणारा असा हा श्रीधर...  त्याच्या मते, माझा स्टुडिओ माझ्या डोळ्यासमोर, आकाश, झाडं, डोंगरे, दर्‍या, अरण्य, जंगलात हिंडणं, साधुंची भेट घेणं हा त्याचा स्टुडिओ. या सार्‍यांना अनुभवणं. ही श्रीधरची व्यासंगाची थिअरी. म्हणून त्याचे चित्रांचे प्रयोगही वेगळे. आरंभीच्या काळात या प्रयोगांनाही कुणी बरं म्हटलं नाही. पण श्रीधरचं हे वेगळेपण ओळखणारे काही जण निघालेच. डॉ.गंगाधर पानतावणे यांनी काही तांत्रिक गोष्टी सांगितल्या. औरंगाबादेतील चित्राच्या साहित्याची माहिती दिली. ड्राइंग पेपर, पेंटिंग्ज, रेखाटनं याविषयी काही सांगितलं. ' हंस ' च्या अंतरकरांनीही सल्ले दिले. श्रीधरची कितीतरी चित्रं ‘अस्मितादर्श’, 'हंसया नियकालिकांनी छापली. श्रीधरला त्यातून बळ मिळत गेलं.
            श्रीधरच्या चित्रात वेदनेचं एक अनोखं रूप आहे. त्याच्या कोणत्याही चित्राला चेहरा नाही. हा चेहरा हरवलेला आहे. त्याची कहाणी ही अशीच अनोखी... श्रीधर विदर्भातला. त्याचं गाव चिखलगाव (ता.अकोला). पण श्रीधरचं गाव कोणतं हा प्रश्न कधीच महत्वाचा नव्हता. आजही नाही. कोणतंही गावं श्रीधरचं असू शकतं. पण त्याचं बालपण विदर्भात गेलेलं. मुळगावकरांची चित्र लहानपणीच त्यानं बघितली होती. त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्नही केला होता. श्रीधर जिथं राहायचा तिथं एक जमीनदार होता. बक्कळ जमीन असलेला. त्याच्या शेतात स्त्रिया निंदायला जायच्या. त्याने श्रीधरला सांगितलं की, माझ्या वडिलांचं पोट्रेट बनवून दे. श्रीधरनं पोट्रेट बनवलं. ते नेऊन द्यायला तो गेला तेव्हा लक्षात आलं की, हा मालक त्या स्त्रियांचा उपभोग घेतो. हे कळताच श्रीधरच्या मनात घृणा उत्पन्न झाली. त्यानं मालकाची घाणेरडी वृत्ती बघून पोट्रेट फाडून टाकलं. सुंदर चेहर्‍यांची चीड मनात उगवून आली. सुंदरता कुरूपही असते याचा अनुभव आला. सुंदरतेच्या कल्पनेविषयी चीड निर्माण झाली. सुंदर चेहर्‍यांचे विरूप दर्शन त्याला घायाळ करून गेले. सुंदरतेच्या कल्पनेविषयी अढी निर्माण झाली... हा एकच क्षण असा होता की, त्याच्या चित्रातला चेहरा हरवला, पुसला गेला. चेहरा नसलेली माणसं हातातनं उतरू लागली. श्रीधरमधला चित्रकार इथल्या व्यवस्थेने घडवला. कुरूप व्यवस्थेनं सुंदरता ही कुरूप असते याचा अनुभव दिला.
            अशा अनुभवातनं श्रीधर घडत गेला. आपण चित्रकार आहोत याची जाणीव त्याला नव्हतीच. काहीशी अ‍ॅबनॉर्मल अशी ही अवस्था होती. अ‍ॅनॉटॉमी पर्फेक्ट हवी याची जाणीव त्याला कधी झाली नाही. कितीतरी चांगली रेखाटने श्रीधरने फाडून टाकली... त्याला भुरळ घातली ती व्हॅनगॉगच्या चित्रांनी. कुणा प्रेयसीनं नाकारलेला हा चित्रकार. स्त्रीपासून मिळणारे दु:ख, तिचा नकार. ती वेदना व्हॅनगॉगच्या चित्रातून उमटली. त्याला रंगांची जोड होती. व्हॅनगॉगच्या चित्रातला सूर्यफुलांचा पिवळा रंग असाच अंगावर येणारा. वेदनेचं एक रूप व्यक्त करणारा. श्रीधरची वेदनाही तशीच. व्यवस्थेनं त्याला नाकारलं होतं. परिस्थितीनं गांजलं होतं. त्यातूनच श्रीधरमधला चित्रकार घडला. श्रीधरची वेदना रेषेतून उमटली. रंगविहीन, चेहरा नसलेली रेषा... त्या रेषेतून साकारलेली चित्रं श्रीधरनं कागदावर उतरवली. त्याची चित्रं सरसकट वाचता येणारी. पण बघणार्‍याला अंतर्मुख करणारी. वेदनेची बोच त्याच्या चित्रांतून साकारते. श्रीधरच्या चित्रांतली रेषा मौनाला व्यक्त करणारी. मनभर हैदोस घालणारी.
            श्रीधरच्या दृष्टीनं चेहरे फार कमी लोकांना आहेत. गांधी, आंबेडकर यांना स्वत:चा चेहरा आहे. पण बाकीच्यांचे काय? चेहरा, नाक, डोळे, हे फक्त शरीराचे आकार. सामान्यांना चेहरा असतो कोठे? माणूस तसा इम्बॅलन्स ! तो खराही असतो आणि खोटाही. माणसात एकवाक्यता असत नाही, हे श्रीधरनं अनुभवलं. हे त्याचं जाणवणं त्याच्या चित्रातनं उमटलं. म्हणून तर त्याच्या चित्रातनं चेहरा हरवला. अगदी हद्दपार झाला. खरे तर सरावाने चेहरे काढता येतात. ते त्याला शक्यही होतं ; पण बहुधा त्यानं ते टाळलं असावं. त्याला चेहराच नकोसा वाटला असावा. त्याच्या मनातला चेहरा सुबक, सुंदर कधीच नव्हता. तो होता वाकडातिकडा, बेढब. जंगलातली झाडंही असतात वाकडी आणि माणसंही तशीच...
            वाचनाचं अफाट वेड असलेला श्रीधर पण त्यांच्या चित्राच्या कल्पना वेगळया. कोळशानं चित्र रेखाटणारी छोटी  पोरं हा त्याच्या कुतूहलाचा विषय होता. एकदोन वर्षाची पोरं भिंतीवर कोळशानं रेघोट्या ओढतात आणि त्यातूनच  तयार होतं चित्र हा श्रीधरचा विश्वास. या चित्रांचे अर्थ त्याने समजावून घेतले. साहित्याची भाषा शब्दांची असते.  पण हे शब्दही रेषांच्या आकारातून तयार होतात. शब्दलेखन ही चित्रांचीच  चिन्हव्यवस्था असते असं श्रीधरच मत.  माणसाच्या जन्माच्या क्षणापासून त्याचे नाते जुळते ते स्वरांशी. जन्मल्याबरोबर रडणे हा त्याचा पहिला स्वर. नंतरची भाषा हावभावाची . या विकासाच्या काळात निसर्गातले विविध आवाज तो ऐकतो. या ऐकण्याला आकार देण्यातून चित्रकलेचा जन्म झाला असावा, हे श्रीधरचं तत्त्वज्ञान. लहान मुले घरातल्या भिंती रंगवून ठेवतात, ती त्यांची चित्रांची भाषा असते. मुलं रेषांची भाषा बोलत असतात. ती त्यांची निर्मितीप्रक्रिया असते. लहानगा जीव भिंती खराब करतो म्हणून आईबाप भिंती पुन्हा रंगवतात आणि लहानग्यांच्या  निर्मितीवर पाणी फेरले जाते, याचे दु:ख श्रीधरला होते. श्रीधर हा असा वेगळ्या मुशीतला.... वेगळा विचार करणारा.... विदर्भातल्या त्याच्या घरासमोर बाभूळबन होंत. भलतंच दाट होतं ते. बाभळीच्या पानांचा हिरवा रंग त्याच्या डोळ्यात भरायचा. मनात दाटायचा. वावटळ सुटली की बाभळीच्या फांद्या एकमेकांवर आदळायच्या. झिप-या झालेल्या केसासारख्या दिसणा-या फांद्याची हालचाल त्याच्या मनात घर करायची. मेस्कामाय, मरीमायच्या समोर घुमणार्‍या बाया या बाभूळबनात आहेत असं वाटायंच त्याला. त्यांची भीती मनात खोलवर रुतायची. झोपल्यावरही बाभळीच्या फांद्या डोळ्यात फेर धरायच्या..... पावसाळ्याच्या दिवसात ढोर मेलं की, दारावरून त्याला ओढत बाभूळबनात नेलं जायचं. त्यांच्या मागे मग कुत्री जात. आभाळात गिधाडं, घारी घिरट्या घालायच्या. पाखरांची जत्रा भरलेली असायची. बाभुळबन मग हललेलं दिसायचं. मेलेल्या ढोराचं मांस खाण्यासाठी गलका झाल्यानं बाभूळबन थरथरुन जायचं. सारं सामसूम झाल्यावर बाभूळबन साधूसारखं वाटायंच. उन्हाळ्याच्या दिवसात बाभूळबनाची श्रीमंती संपायची . पान झडलेली असायची . बाभळीची खोडं उघडीवाघडी दिसायची. बाभळीवर बसलेली पाखरं मोजता यायची. श्रीधरच्या बालपणात हे सारं दृश्य त्याच्या नजरेनं साठवून ठेवलं. माय जिथं भांडी घासायची तिथूनच श्रीधर कोळसा उचलायचा. डोळ्यात फिरणार्‍या बाभळीच्या रेघोट्या....काळ्या काळ्या आईचा मारही खाल्ला त्यासाठी. कुणी सांगायचं त्या मायला की, श्रीधरला शाळेत घाला. लहानशी पाटी आणून द्या मग तो कशाला भिंत खराब करेल? पण मायचं म्हणणं अजिबातच खोंट नव्हत. बाभळीनं त्याला पुरतं झपाटल होतं. वाळलेली बाभळीची झाडं ,त्यांच्या उघड्याबोडक्या फांद्या,त्यांचे चित्रविचित्र आकार श्रीधरच्या मनात कोरले गेले होते. त्यातल्या कितीतरी रेषांना श्रीधरनं आपल्या चित्रातनं साकार केलं. या बाभूळबनानं त्याला रेषांचे कितीतरी आकार दिले... त्याची रेषाही तशीच थरथरणारी, आक्रमक आणि प्रवाहीसुद्धा. पुढे वाचनाच्या परिणामातून ती अधिक गडद झाली असेल; पण लहानपणातच ही रेषा त्याच्या हाताला चिकटली ती कायमची. त्यात परिपक्वता येत गेली. रेषेवरची हुकुमत कायम  झाली. ही रेषा त्याच्यापासून हलली नाही.ती झुलत राहिली. इतरांना झुलवत राहिली. श्रीधर या रेषेमध्ये आकंठ बुडून गेला...
‘आदिम’ अनियतकालिक हा श्रीधरच्या कल्पकतेचा आविष्कार होता. त्याच्या नेणिवेतले कितीतरी उन्मेष‘आदिम’ मधून प्रकटले. ‘आदिम’ साठी श्रीधरनं जीवाचं रान केलं. सायक्लोस्टाईलवरची रेखाटनं हा ‘आदिम’ मधला श्रीधरचा ऐतिहासिक पहिला प्रयोग मानावा लागेल. पोस्टातल्या खर्डेघाशीबरोबरच  वाचनाच्या वेडाने झपाटलेल्या श्रीधरने व्यासंग सतत वाढता ठेवला. हा त्याचा व्यासंगच ‘आदिम’च्या कामाला उपयोगी आला.‘आदिम’मुळे श्रीधरचा अनेकांशी संबंध आला. सर्व क्षेत्रातल्या, कलेतल्या लोकांकडे ‘आदिम’ जात असे. साहजिकच त्याची चित्रे या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचली. ब्लॉकऐवजी स्टेन्सिलने चित्रं काढून प्रिंटिंग करायचे हा प्रयोग श्रीधरने सुरू केला. त्यानंतरच महाराष्ट्रात चित्रांसह आणि रेखाटनांसह नियतकालिके सुरू झाली. वाङ्‌मयीन नियतकालिकांसाठी चित्रे काढायला श्रीधरचा हात कधी आखडला नाही. प्रसंगी त्या नियतकालिकाच्या दर्जाचाही विचार त्याने कधी केला नाही. सामाजिक बांधिलकीचा विचार त्याच्या दृष्टीने कायम महत्त्वाचा होता.वेगवेगळ्या थरातली माणसे ‘आदिम’ मधूनच जोडली गेली. अगदी अलीकडे प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील पुरस्काराने श्रीधरला सन्मानित केलं, तेव्हा ‘आदिम’ च्या परिवाराला अंत:करणातनं भरून आलं. त्याच्या दीर्घ कालावधीतल्या कामाचं झालेलं ते कौतुक होतं. एका प्रयोगशील चित्रकाराला मिळालेली ती दाद होती...

                                                     


            श्रीधरने मनीऑर्डरची पावती फाडण्याच्या पट्टीचा आधार घेऊन रेखाटने तयार केली होती. पोस्टाच्या रुक्ष जगातही श्रीधरने स्वत:तला कलावंत मरू दिला नाही. चित्र हा त्याचा श्वास होता आणि आजही तसेच आहे. पण त्याच्या चित्रांचा वेग आता मंदावला आहे. ‘आदिम’ च्या दिवसांमधला श्रीधर झपाटलेलाच होता. त्याच्या अनिर्बंध भटकंतीने त्याला कितीतरी आकार पुरवले. मनात खोलवर रुतलेलं बाभूळवन, मेळघाट-ताडोबाच्या जंगलातलं आणि  विविध ठिकाणच्या अभयारण्यातलं मुक्त भटकणं, जंगलातल्या जगण्याला डोळ्यात साठवणं यातून निसर्गातला झाडांचा फॉर्म श्रीधरनं चित्रात आणला. झाडांचे अनंत आकार त्याने रेषेतून साकारले. निबच्या पेननं वहीच्या शेवटच्या पानावर हेच आकार कधीकाळी त्याने उमटवले होते. पुढे त्याच्यात परिपक्वता येत गेली. निर्मिती आणि निसर्गाचा संबंध तसा पुरातन. सारेच धर्मसंस्थापक, साधू जंगलात जाऊन चिंतन करणारे. श्रीधरही त्यांच्यासारखाच अशाच भटकंतीत.आलमेलकरांची चित्रंही श्रीधरच्या बघण्यात आली. आदिवासींची सौंदर्यवादी चित्रं होती ती. त्यांनी संकलित केलेली गीतंही वाचण्यात आली. मध्यप्रदेशातल्या ‘भीमबेटका’ च्या गुहांमध्ये जाऊन आदिमानवाची रेखाटनं श्रीधरने बघितली. चाळीसगावच्या केकी मूस यांचीही भेट घेतली. अशा कितीतरी गोष्टी. या सार्‍यातून व्यासंग वाढला. श्रीधरच्या आशयगर्भ रेषांना त्यामुळेच अर्थपूर्णता लाभली. चित्राच्या गाभ्यातली ही अर्थपूर्णता ‘आदिम’ मधून आणि अन्य नियतकालिकांमधून उमटत गेली...
            ‘आदिम’ च्या माध्यमातून श्रीधरची चित्रे अनेकांपर्यंत जाऊ शकली. त्याच्या रेषांच्या वेगळ्या आकारांमुळे त्यांच्या चित्राविषयी अनेकांची अनेक मते होती. काहींना त्याची चित्रे निगेटिव्ह वाटली. पण अनेक दिग्गजांनी ही चित्रे उचलली. भालचंद्ग नेमाडे हे आदिमचे पहिले वर्गणीदार. श्रीधरची चित्रे बघून त्यांनी वर्गणीची मनीऑर्डर श्रीधरला पाठवली. त्याचे कौतुक केले. प्रोत्साहन दिले. स्टुडिओ नसलेल्या श्रीधरने मग मागे वळून बघितलेच नाही. १९८३ ला फाय फाऊंडेशनचे पारिपोषिक श्रीधरला जाहीर झाले. चाकोरीबाहेरचे काम  करणार्‍या व्यक्तीला त्याच्या कामातील वेगळेपणासाठी मिळणारे हे पारितोषिक. श्रीधरला मिळालेली ही भक्कम पोचपावती होती. आर.के.लक्ष्मण यांनाही याच वर्षी पारितोषिक मिळाले होते. महाराष्ट्राच्या चित्रकारांना हे पारितोषिक मिळण्यास इथूनच प्रारंभ झाला. त्यावेळी श्रीधर हा सर्वात कमी वयाचा चित्रकार होता. श्रीधरच्या कलानिर्मितीला मिळालेली ही केवळ पोचपावती नव्हती. आपण जे करतो ते योग्यच आहे, हा दिलासा त्याला लाभला. काम करण्याची उमेद वाढली. श्रीधरच्या आत आत असणारी ऊर्मी बळावली. १९८७ ला विजय तेंडुलकरांची ‘दिंडी’ सिरियल मुंबई दूरदर्शनने प्रसारित केली होती. त्यातला एक एपिसोड श्रीधरवर चित्रित झाला होता. तेंडुलकर खास त्यासाठी नगरला दोन दिवसांच्या मुक्कामाला आले होते...
            श्रीधरचं क्षेत्र विस्तारलं गेलं. आदिमच्या निमित्तानं श्रीधरमधला कवीही जागा झाला होता. त्याने कविता फार लिहिली नाही. पण त्याचं कवीमन चित्रातून उमटत गेलं. रेषांची लय अधिक गहिरी होत गेली. वेगळेपण जपणार्‍या नियतकालिकातून श्रीधरने रेखाटने केली. ‘अस्मितादर्श’ ‘हंस’, ‘प्रतिष्ठान, ‘युगवाणी’, ‘अनुष्टभ’,यातून श्रीधरची  कितीतरी रेखाटनं शोधता येतात. महाराष्ट शासनाचं दिवाळी अंकाचं पारितोषिक मिळवणार्‍या ‘शब्दालय’ च्या पहिल्या अंकाची मांडणी व रेखाटने श्रीधरचीच होती. हजारो रेखाटनं रेखाटणार्‍या श्रीधरची अपरिग्रहाची वृत्ती मात्र कायम राहिली. श्रीधरही सर्वस्वाचा त्याग करणार्‍या साधुसारखाच. स्वत:चीच चित्रे आणि रेखाटने जवळ नसलेला हा चित्रकार. कधी आवडली नाहीत म्हणून चित्रे फाडली. जी रेखाटने केली ती कुणासाठी तरी देऊन टाकली. म्हणजे मग हा पुन्हा मोकळा...
भटकंती करायला...

            चित्रकार खरे तर माणसात न मिसळणारा. स्वत:च्या मस्तीत डुंबणारा. रंगरेषांमध्ये हरवून जाणारा. पण श्रीधरच्या बाबतीत असं घडलं नाही. या संन्याशाचं लेकुरवाळं रूपही अनोखंच. संगीतातला राग असो, तबल्याचा ठेका असो, उंच उमटलेली लकेर असो, श्रीधरच्या मनात स्वर सतत रुंजी घालतात. कधीकाळी तो संगीतही शिकला. मैफिलींमधून रागदारीं आणि सुरावटही त्याने आपलीशी केली. अनेक कवींना जोडत कविताही अंतरंगात भिनवली. कवितांचे कार्यक्रम असो, एखादे संमेलन असो, नाहीतर कुणा मित्राच्या घरचं लग्नकार्य असो. श्रीधर असायलाच हवा असा सार्‍याच मित्रांचा आग्रह असतो. सार्‍या जातीधर्मात याचे मित्र विखुरलेले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगणारा हा चित्रकार. मित्रांच्या घरात तो केवळ मित्र असतो. स्वत:तला चित्रकार तो खोलवर कुठंतरी दडवून ठेवतो. वैदर्भीय ढंगातल्या त्याच्या गप्पा ऐकल्यावर समजते की, त्याची निरीक्षणं किती सूक्ष्म आहेत. माणसं वाचणारा हा चित्रकार. आपल्या मित्रांच्या घरात तो तसा ‘श्रीधरकाका’नाहीतर ‘अंभोरेकाका’म्हणून परिचित आहे. मित्रांपेक्षा मित्रांची मुलंमुली त्याच्या येण्याची वाट अधिक पाहतात. हा त्यांच्या चौकशा अधिक करतो. त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करतो. आठवण ठेवून कुणाला काय आवडते ते आणून देतो. याचं हे रूप मोठं लोभस आहे. कारण इथं तो चित्रकार नसतो. तो गर्दीतला कुणीतरी एक असतो. सामान्य माणसाच्या सामान्य गोष्टी त्याच्याबाबत खूपदा खर्‍या होतात. पांढरे स्वच्छ धुऊन इस्त्री केलेले कपडे घालणं याला आवडतं. पण खूप ठरवूनही त्याच्या पांढर्‍या कपड्यांवर जेवताना काहीतरी सांडतं. मग चेष्टेचा विषय म्हणून त्यावर गप्पा रंगतात. नगरच्या रस्त्यावर हा स्कूटर हातात घेऊन लोटताना दिसतो, तेव्हा लक्षात येतं की, हा पेट्रोल भरायला विसरलाय. मित्रांच्या घरातलं स्वयंपाकघर याची वाट पाहात असतं. हा तमाम मित्रांच्या घरात सार्‍याच वहिनींबरोबर विविध पदार्थांच्या रेसिपींवर गप्पा मारतो.‘अंभोरेकाकाबरोबरतुम्ही बाहेर पार्टीला जात असाल तर हरकत नाही’असं विधान याच्या प्रत्येक मित्राच्या बायकोचं असू शकतं. हा आपल्या नवर्‍याबरोबर असेल तर कुठलंच काळजीचं कारण नाही, असं याचं घराघरात खास वजन आहे. हा नेमका कोणत्या पातळीवर जगतो? हा याच्या मित्रांना पडलेला प्रश्न. कारण मित्रांसाठी तो मित्र असतो. मुलांसाठी काका असतो. मग हा चित्रकार केव्हा असतो? याला एकदा जाहीर बोलायला भाग पाडायचं म्हणून विद्यापीठाच्या एका रिफ्रेशर कोर्समध्ये बोलवलं. काही केल्या हा तयार होईना. फक्त अर्धा तास बोल. उरलेल्या वेळेत चित्रं दाखवू, चर्चा करू असं म्हणत याला कसंबसं घोड्यावर बसवलं. हा आला आणि मी वक्ता नाही. असं सांगत तीन तास बोलण्यात रंगला. व्याख्यान संपल्यावर ‘आता मी वक्ताही झालोय’म्हणत मिळालेल्या मानधनाचं सेलिब्रेशन मित्रांबरोबर करून मोकळा झाला. वक्ता म्हणून थेट विद्यापीठातच व्याख्यान देणारा हा... याला जगावेगळा नाही म्हणायचं तर काय?
            आरपार छेदणार्‍या रेषा, त्यांचे गहन, गहिरे रूप आणि त्यातनं प्रकटणारी वेदना यांना झेलत श्रीधर वाट चालतोय. खूप खाजगीत कधीतरी तो सांगतो बुद्ध, कबीर, आंबेडकर, गांधी, विनोबा यांच्या वाचनातून लक्षात येतं की, हे सारे ‘स्वयं’चा शोध घेताहेत. या सार्‍यांच्या विचारांचा प्रवाह माझ्या मनातून वाहतोय. मग लक्षात येतं की याला स्टुडिओ का नाही? आपला भोवताल हाच आपला स्टुडिओ असं मानणारा हा श्रीधर आहे. तो घरात असेल, जंगलात असेल, विपश्यनेत असेल, स्वयंपाकघरात असेल, मुलांच्या घोळक्यात असेल, पुस्तकांच्या मुखपृष्ठात असेल, पुस्तकांच्या वाचनात असेल, कुठल्याशा कार्यक्रमाच्या सजावटीत असेल नाहीतर रेखाटने रेखाटत बसलेला असेल... हा स्टुडिओच्या बाहेर कधीच नसतो. हा सदैव स्टुडिओतच असतो... याचा‘स्वयं’चा शोध चालू असतो. जे आत आहे तेच बाहेर आणि जे बाहेर आहे तेच आत... श्रीधर किती समजला हे सांगता येणार नाही. तो अनेकांना अनेक पद्धतीनं भावलाय. एक खरं तो कुठंही भेटो. तो जिथंही असतो तिथंच स्टुडिओ असतो तरीही हा मात्र स्टुडिओ नसलेला चित्रकार!
_______________________________

हंस’दिवाळी २०१० वरून साभार
_________________________