श्रीधर अंभोरे नावाचं चित्र : डॉ.किशोर सानप

                                                       

चित्रकला, मूर्तिकला, नृत्यकला, संगीतकला, साहित्यकला, वास्तूकला, तंत्रकला, जीवनकला असं कलेचं क्षेत्र कालानुरूप विस्तारत आहे. श्रीधर अंभोरे हा असामान्य किर्तीचा भारतीय कलावंत-प्रतिभावंत चित्रकार आहे, हे लोकांना सांगायची आज गरज नाही. श्रीधर हा खरेतर कलावंत. कलावंताजवळ काहीही नसलं तरी चालतं. परंतु कलेचं मन असणारे डोळे-कान-नाक-त्वचा-जिभ ही पंचेंद्रिये असावीच लागतात. हे सर्व प्रतिभेचं भांडवल श्रीधरजवळ विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. माझे सर्व भांडवल माझ्या चित्रांचेच, ही श्रीधरची कलासक्त भूमिका आहे. प्रत्येक कलावंताची एक स्वयंप्रकाशी भूमिका असते. आम्ही विधीचे जनिते केले नव्हे, असा असतो अस्सल कलावंत.

कलावंताला जात नसते. धर्मही नसतो. कलावंताचं वास्तव्य प्रदेशाच्या अवकाशात असलं, तरी त्याची दृष्टी अणूरेणूया थोकडा कलावंत आकशाएवढा, अशीच असते. चरांचरांत विहार करून जीवसृष्टीकडे समत्व-ममत्व भावनेनं पाहणारा कलासक्त आत्मा कलावंताच्या कलेचा जीव की प्राण असतो. कलावंताच्या मनात मानुषतेचा झरा असतो. सत्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता, अहिंसा, निर्भयता, दया, क्षमा, शांती, करुणा, अपरिग्रह, भक्ती ह्या मानुष मूल्यांचा उपासक असतो कलावंत. श्रीधरही अशा अभिजात कलावंतांपैकीच एक कलावंत आहे.

श्रीधरच्याही अंतह्नकरणात महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसाच्या हृदयात हजारो वर्षांपासून वास्तव्य करणार्‍या एकेश्र्वर म्हणजेच सर्वेश्र्वर सावळ्या परब्रह्माचं-विठ्ठलाचं वास्तव्य आहे. विठ्ठल हे वारकर्‍यांचं परमदैवत. मूर्तिकलेचा अप्रतिम आविष्कार. कलेचा साधक आणि उपासकही. कुण्याही कलावंताच्या प्रतिभेला पूर्वसूरींचा अभिजात वारसा लाभलेलाच असतो. कलावंत ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या पर्यावरणाचा आणि सांस्कृतिक भाषिक अस्मितांचाही खोलवरचा परिणाम कलावंताच्या कलासक्त मनावर झालेला असतो. श्रीधरचीही जडणघडण मराठमोळ्या सांस्कृतिक आणि वैचारिक संस्कारांच्या परिमाणातूनच झालेली आहे.
श्रीधरचा जन्म अकोला जिल्ह्यातील चिखलगांव या लहानशा खेडेगावी दि. २१ मार्च १९५२ रोजी झाला. पूर्वी शाळेचे नियम लक्षात घेवून किंवा मास्तर सांगेन त्या जन्मतारखेला शाळेच्या दाखलखारीजवर मुलामुलीचं नाव चढविण्याचा जमाना होता. खेडातल्या श्रीधरच्या वडलांनी-अंबादासजींनी श्रीधरचं नाव तर सांस्कृतिक महत्ता जाणूनच ठेवलं. परंतु शाळेत मात्र मास्तरांनी २१ मार्च १९४७ ही जन्मतारीख टाकली. अंबादास खरंतर अंबाईचा भक्त. मातृपूजक. आजोबा-फकिरा होते. वृत्तीनेही ते फकिराच होते. आई-कापूरा. कापूरासारखीच ती कुटुंबातलं दुह्नख पोटात घालून मुलांना जपत जोपासत वाढवत होती. कर्पूरासारखीच बिचारी आयुष्यभर मनातल्या मनात दुुह्नखभोगाला जाळत लेकरांच्या सुखासाठीच केवळ जगली. आजी जनाबाई तर साक्षात नामयाची जनीच.

अभंगांचा मुक्त आविष्कार असलेली जनाबाई आणि विठ्ठलाशी भांडण करून विठ्ठलरखुमाईचं एकरूप अस्तित्वच जणू. आजी जनाबाईंची वृक्षपूजा हेच खरंतर श्रीधरच्या वृक्षविपुल कलासृजनाचं आत्मतत्त्व आहे. वृक्षासक्त मन श्रीधरनं जपलं आणि आजीनं त्याच्या कलासक्त बालमनावर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे संस्कार केले. जगातलं चराचराचं पर्यावरण सत्य संत तुकोबांनी सतराव्या शतकातच जगासमोर मांडलं होतं,
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमें तेथे मन क्रीडा करी ॥
कथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरू ॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥
संत तुकोबांनी कलावंताच्या संत मनानं टिपलेलं चरांचरांतल्या जिव्हाळ्याच्या नात्याचं अनोखं आणि अनन्यसाधारण रूपधर्म मांडला. कलावंताचं मग तो कोणत्याही कलेचा उपासक आणि साधक असो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असतात आणि पक्षांचा सुस्वर कलावंतांसह माणसाचं जगणं सुंदर करतात. कलावंताला एकांत हवा असतो आणि एकांतातच सृष्टीच्या सृजनाचं रहस्य उलगडू लागतं. कलासक्त मन सृष्टीच्या चरांचरांत पक्षासारखं विहरू लागलं की, अंगासह मनाला पावित्र्याचा सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. पंचेंद्रिये चराचरातील जीवन सौंदर्याचा अनुभव घेतात आणि कलावंत सृष्टीसौंदर्याशी तादाम्य पावून जीवसृष्टीचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं व्यक्त करू लागतं. कलावंताचं सृष्टी सृजनात्म मन हेच त्याचं घर असतं. आकाश मंडप आणि पृथ्वी हेच त्याच्या विहाराचं विसाव्याचं आसन असतं. मनाची रमणीय क्रीडा सुरू असते आणि देहधर्माचा उपचार गळून पडतो. वार्‍याचा नादही भक्तीची गाज बनतो. विठ्ठलरूपाशी म्हणजेच सृष्टीरूपाशी कलावंत एकरूप होतो. सृष्टीच्या दर्शनानं चित्तवृत्ती प्रसन्न होवून हरिरूपाचं-सृष्टीरूपाचं ऊर्जातत्त्व कलावंताला जगवतं. कलावंताचा मनाशी सतत संवाद सुरू असतो. कलेच्या सृजनाची सार्वत्रिक आणि सार्वकालिक कलामीमांसा तुकोबांनी या एका अभंगातून मांडली आहे. ती आजही कालसापेक्षच आहे.
सृष्टीच्या दर्शनानं जगण्याचं हाती लागलेलं सत्य, मनाच्या मुशीत उजाळा देवून निखळ जीवनसत्ये सांगण्याचा आणि व्यक्त करण्याचा कलावंताचा धर्म असतो. आपुलाचि वाद आपणाशी करीत, कलावंत कलासृजनाचं व्रतस्थ कार्य करीत असतो. संत तुकोबांनी सर्वच कलावंतांना कलेचा धर्म शब्दांतून सांगितला, तो प्रत्येक कलेच्या केंद्रस्थानी अध्याहृत असतो. श्रीधरच्याही रेषा संत तुकोबांनी सांगितलेलाच कलाधर्म व्रतस्थपणे सांगतांना दिसतात. संत तुकोबा जगातल्या सर्वच कलांच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला दिसून येईल. श्रीधरही त्याला अपवाद नाही.

श्रीधरची कौटुंबिक पार्श्र्वभूमी हीच खरेतर त्याच्यातल्या कलावंताचं मन जपणारी जोपासणारी भरणपोषण करणारी आहे. तिला खरेतर भारतीय पौराणिक आणि आधुनिक, सांस्कृतिक; बुद्ध, संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरादी पुरोगामी आणि मानवतावादी विचारांचीही भूमी लाभलेली आहे. संक्रमित आणि संमिश्र कृतिशील परंपरेच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कलावंत नजरेची जाणही त्याला आहे. श्रीधरची चित्रं, रेखाटणं त्याची साक्ष देतात. श्रीधरचे आजोबा फकिरा हे लढवय्ये होते. वखराची फास त्यांनी मोडली आणि त्याचा भाला आणि तलवार करून ते रणांगणात सैनिक बनले होते. आजी जनाबाई ही वृक्षवल्लीची पूजा करायची. श्रीधरच्या चित्रातील शस्त्र आणि झाडं, जंगल, रानवेली, पशूपक्षी, सुगरणचे खोपे आदींवरून त्याच्या मनावर बिंबलेली सांस्कृतिक महत्ता जाणवते
.
श्रीधर माणूसवेडा आहे. सतीश बडवेंनी म्हटलं की, श्रीधरच्या चित्रांत माणसांचे चेहरे दिसत नाहीत. चेहरे हरवलेली माणसं श्रीधरच्या चित्रांचा आत्मा आहे. चेहरे गमावलेली आणि सौंदर्याचं करूपपण श्रीधरच्या शोधाचा आणि चित्रांचा विषय आहे. खरं आहे. माणसांना चेहरे असतात. बालपणी मिळालेली निरागसता चेहर्‍यांतून पुढे हरवत जाते. माणसंच माणसांची वैरी होतात. श्रीधरला चेहर्‍यांची निरागसता वृक्षवल्लीत दिसते. वृक्षांच्या आकारातून तो माणसांचे चेहरे आणि जगण्याचं श्रेयस शोधू पाहातो. पण ते हाती लागत नाही. कलावंत आपल्या अनुभवाशी प्रामाणिक असला की तो सत्य आणि निर्भयतेचा शोध घेवू लागतो. पण चेहर्‍याचं सौंदर्य हरवलं ते वृृक्षांच्या आकारात तरी मिळतं काय? याचा श्रीधरचा सुरू असलेला शोध काही संपलेला नाही. तो निसर्गात आणि झाडावेलीत आणि काटाकुटात बाभूळबनात हरवलेले चेहरे आणि हरवलेल्या चेहर्‍याचं दुह्नखद जगणं शोधू पाहातो. दुह्नख आणि करुणा नेहमीच अक्षर कलाकृतींना जन्म देणार सृजनाचं तत्त्व असतं. जगातल्या सर्वच कला आणि कलावंतांना सृजनाचं हेच आदिम तत्त्व खूणावत असतं. कलेचं खरंतर दुह्नख आणि करुणा हेच सृजनशील तत्त्व आहे. श्रीधरचाही सृजनशोध याच पाऊलवाटेनं चालू आहे. दुह्नख आणि करुणेची अनाहत गाज श्रीधरच्या चित्रांतून रसिकांना अनुभवता येते.

श्रीधरला बालपणी त्याचे वडील कबिराचे दोहे ऐकवायचे. पुस्तकं वाचण्याचा नादही त्यांनीच लावला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग सामान्य माणसाची स्वगतं म्हणून स्वीकारले होते. बहुजन नायकमध्ये त्यांनी तुकोबांचे अनेक अभंग कोट केले आहेत. बाबासाहेबांनी सन्‌ १९५६ मध्ये दलित धर्मक्रांती करून आपल्या सर्व दलित बांधवांसह हिंदुधर्माचा त्याग केला. भौतिक आणि विज्ञानवादी दृष्टिकोण रूजविणारा बौद्ध धम्म स्वीकारला. स्वीकारानंतर दलित बांधवांनी हिंदुधर्माच्या घरातल्या सर्वच खाणाखूणा भिरकावून दिल्या. श्रीधरच्या घराण्यात दोनतीनशे वर्षांपासून कर्नाटकी बनावटीचा गोमटेश्र्वरसदृश्य नंदी आणि शंख होता. नंदीकडे श्रीधर बालपणापासून कलासक्तपणे बघायचा. आजीनं झाडांची बांधलेली पूजा बघायचा. शंख तर तो सांभाळू शकला नाही. परंतु नंदी मात्र त्यानं वडलांना नदीत विसर्जित करू दिला नाही. आजही नंदीचं ते कर्नाटकी सावळं लेणं त्यानं आपल्या संग्रहालयात जपून ठेवलेलं आहे. भाला, तलवार, झाडं, वेली, झाडांची मूळं, पशूपक्षांची रूपं, बैल, नंदी अशी मुक्या प्राण्यांची कारुण्यचित्रे श्रीधरच्या कलेचा विषय का बनली ?  त्याचं रहस्य श्रीधरच्या मनावर बालपणी बिंबलेल्या आई-वडील-आजी-आजोबा यांच्या सांस्कृतिक आणि कलासक्त जगण्यावागण्यातून उलगडत जातं.

कलावंताला कलेच्याही मर्यादा नसतात. कला ही खरेतर जगातल्या सौंदर्याची पूजक असते. कलावंताला प्रतिभेचा तिसरा डोळा असतो. प्रतिभेच्या तिसर्‍या डोळ्यांतून टिपलेल्या आणि मनाच्या मुशीत पाजळून हाती आलेल्या अनुभवसत्याचा कलासक्त आविष्कार करीत असतो तो कलावंत. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात खूप कलावंत कलेची साधना करून, कलात्मक अपत्यांना जन्म देण्याच्या तयारीत गुंतलेले असतात. परंतु अस्सल कलावंताचं अपत्य आणि साधनासक्त कलावंताचं अपत्य यात अंतर पडतंच. ते चटकन लक्षातही येतं. म्हणूनच कलेच्या प्रत्येक क्षेत्रात अभिजात जातिवंत प्रतिभावंत कलावंत आपल्या कलेची छाप जगावर उमटवून आपल्या कलाविष्काराला चिरंतन अक्षर अजरामर रूप देतात. श्रीधरची रेखाटनं, चित्रं, आदिम अनियतकालिकात रेषांचे त्याने केलेले प्रयोग, पोस्टात नोकरी करून नगरच्या वास्तव्यात त्यानं केलेलं जिवंत चित्रांचं रूपडं; केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध जगाला भुरळ पाडणारं आहे. श्रीधरला सन्‌ १९८३ मध्येच त्याच्या कलाविषयक योगदानाचं चिज करणारं फाय फाऊंडेशन, इचलकरंजीचा मोठा प्रतिष्ठेचा सन्मानही मिळाला. पदम्‌श्री विखे पाटील पुरस्कारासह अनेक मानसन्मान श्रीधरला त्याच्या कलेसाठी मिळाले.
श्रीधर हा सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा विषय असतो. विजय तेंडुलकरांनी दिंडी या मालिकेत श्रीधरचं कलावंतपण उभं केलं. पुल, रावसाहेब कसबे, रामदास फुटाणे, डॉ. मंचरकर, श्रीकृष्ण राऊत, जयराम खेडेकर, संजिवनी तडेगावकर, लोकनाथ यशवंत, रमेशचंद्र कांबळे, शिवा इंगोले, सुखदेव ढाणके, अशी दिग्गज कलावंत मंडळी श्रीधरचं भरभरून कौतुक करणारी आहे.

श्रीधर हा माणूसवेडा माणूस. सर्वच क्षेत्रातील आणि सर्वच गावातील मोठा मित्र परिवार त्याच्या जगण्याचं केंद्र बनलेला आहे. श्रीधर हे खरंतर एक अनाकलनीय चित्र आहे. अनेकांना या चित्राचं कोडं उलगडत नाही. श्रीधर आता स्वेच्छानिवृत्ती घेवून गावोगाव हिंडत असतो. त्याच्या पायाला भोवरा आहे. तो कधीच एका गावात नसतो. तो कधीही कुठेही आणि कोणत्याही गावात असू शकतो. मित्रांसाठी द्रवणार्‍या हृदयाचा तो स्वामी आहे. माणसं जोडण्याचा आणि मित्रांना जोडत जगण्याची त्याला मोठी हौस आहे. कुणालाही काही मागत नाही. कुणालाही काहीही देण्यास तो नेहमीच तयार असतो. श्रीधर स्वतह्न रूचकर स्वादिष्ट स्वयंपाक करून मित्रांना जेवू घालतो. सतत मित्रांना दिलासा आणि धीर देणारा माणूस, आत कुठेतरी स्वतह्नला शोधत असतो. स्वशोधाची ही प्रक्रिया खरेतर प्रत्येकासाठीच जीवघेणी असते. श्रीधरसाठी तर ती कलेचं माध्यम बनते. कलेच्या सृजनासाठी दुह्नखवेणा सहन करण्याची क्षमताही श्रीधरमध्ये अफाटच आहे.

श्रीधरनं लग्न केलं नाही. सतीशनं लिहिलं की कुण्या प्रेयसीनं त्याला नकार दिला. तो नकार पचवूनही बहुदा भरपूर वर्ष झाली. तो आता पासष्टीत आहे. परंतु चिरतारुण्य त्याच्या चेहर्‍यावर दिसतं. तो सदैव प्रसन्न. हसतमुख. प्रफुल्लित. उत्साही. अमृततुल्यच असतो. जिथं जातो तिथं अमृताच्या बिया पेरत जातो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तसं श्रीधरचं कलासक्त मन त्याच्या पंचेद्रियांसह अनुभव टिपत असतं. तोच अनुभवाचा ओतप्रोत चेहरा दृश्यरूपात आपल्याला दिसतो प्रसन्न, परंतु त्याची सर्वच चित्रे आर्त दुह्नखजलाचा धबधबाच वाटतात. श्रीधरचा खरा चेहरा केवळ त्याच्या चित्रांतूनच प्रकटतो. म्हणूनच श्रीधर खुद्द एक रेखाटन आहे. श्रीधर हे एक अनाकलनीय परंतु तीव्र दुह्नखकारुण्याचं रंगद्रव्य आहे. ते केवळ त्याच्या रेषांच्या आकारातूनच व्यक्त होतं. जसं दिसतं तसं नसतंच कलावंताचं मन आणि जगणंही. कलावंताचं जगणं असतं त्याच्यातल्या मातृत्वाचं सृजन. सृजनअपत्ये... श्रीधर नावाच्या चित्राचा शोध, असा त्याच्या आत्मचित्रांतूनच घ्यावा लागतो...
_____________________________________________
डॉ. किशोर सानप
कमला नेहरू शाळेजवळ, रामनगर, वर्धा-४४२००१ दूरध्वनी ९४२२८९४२०५, ९३२६८८०५२३
________________________________________________