●चिखलगावच्या चित्रकाराची सातासमुद्रापलीकडे झेप●

 



दै. देशोन्नती / दि. २० फेब्रु. २०१९ / अकोला...

संपादकाचे मनःपूर्वक आभार

..........................................


●चिखलगावच्या चित्रकाराची सातासमुद्रापलीकडे झेप●

...........................

◆न्यूयॉर्कच्या चित्रपट महोत्सवात चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन◆

...........................

अकोला -तालुक्यातील चिखलगावचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी सातासमुद्रापलीकडे झेप घेतली आहे.

अमेरिकेतील बर्नार्ड कॉलेज (कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क) येथे दि. २३ व २४ फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या दलित चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवात भरणाऱ्या चित्रप्रदर्शनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या  निवडक चित्रांचा समावेश  झाला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, बोस्टन स्टडी ग्रुप व आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, आंबेडकर बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवास निर्माता, दिग्दर्शक पी. रंजित, नागराज मंजुळे, अभिनेत्री निहारिका सिंग, डॉ. डेव्हिड ब्लाँडेल, बोमकु मुरली, जयंत चेरीयन, सुबोध नागदिवे, रामपिला राव यांच्यासह चित्रपट व इतर माध्यमातील जाणकार उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात दलित कलावंतानी निर्माण केलेले दलितांच्या जगण्यातील दाहकता व त्यांच्या आत्मसन्मानासाठी धरलेला आग्रह दाखवण्यात आलेल्या चित्रपट, फोटो व चित्रांचा समावेश आहे.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील चिखलगावचे मूळ रहिवासी असलेल्या

श्रीधर अंभोरे यांनी महाराष्ट्रातील अनेक वाङ्मयीन नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबऱ्यांचे मुखपृष्ठ त्यांनी साकारले आहेत. फाय फौडेशन पुरस्काराने गौरविलेले  चित्रकार श्रीधर अंभोरे हे सामाजिक आशयाची चित्र निर्मिती करीत आहेत. 

झाडे, प्राणी, पशू, पक्षी, दगड असे फॉर्म वापरून स्वत:ची स्वतंत्र चित्रशैली त्यांनी निर्माण केली आहे. आपल्या विविध चित्रातून मानवी स्वभाव, विकृती, दुर्गुण तसेच पीडित व शोषित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषित माणसांचे चेहरे त्यांनी आपल्या चित्रातून रेखाटले आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विविध प्रवाहाच्या   विचारपीठांची त्यांनी प्रतिकात्मक सजावट केली आहे. 

प्रख्यात नाटककार

विजय तेंडुलकरांनी दूरदर्शन वर दिंडी शीर्षकाची  मालिका केली होती. प्रत्येक भागात मराठीतील एका ख्यातकीर्त व्यक्तीमत्त्वाची ते ओळख करून देत असत. या मालिकेच्या एका भागात  विजय तेंडुलकर यांनी अंभोरे यांची चित्रकार म्हणून मुलाखत घेतली होती.