अजिंठ्याचं आदिम शिल्प : शशिकांत शिंदे




चित्रकलेचं कुठलंही पारंपारिक शिक्षण न घेतलेला हा अवलिया चित्रकार. घरात चित्रकलेची कुठली परंपरा होती तर तसंही काही नाही. लहानपणापासून घरासमोरचं बाभूळबन मनात रुतून बसलेलं. वेगवेगळ्या ऋतूतलं त्याचं विलोभनीय सौंदर्य अनुभवलेलं. मनात ते इतकं घट्ट रुजलं की पुढे त्याचंच चित्रकलेचं झाड झालं नी आयुष्यभर देहाला कवटाळून बसलं. त्याची मूळं दूर तिकडे विदर्भातली. परंतु झाडाची जोपासना झाली ती अहमदनगर शहरात. ते इथे चांगलंच फोफावलं. आता त्याचा वृक्ष झालाय. अनेक सन्मान, अनेक पुरस्कार मिळूनही तो अविचल आहे. त्याची मिजास नाही की वृत्तीत मस्तवालपणा नाही. इथून तिथून माणूसपण जपणाऱ्या त्या झाडाचं नाव आहे श्रीधर अंभोरे. कुणासाठी ते नुसतेच श्रीधर आहेत तर कुणासाठी शिरूभाऊ, तर कुणासाठी शिऱ्या, कुणासाठी अंभोरे तर कुणासाठी अंभोऱ्या.

   ऐंशीचं दशक त्यांच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलं. पोस्टातील नोकरी सांभाळून ते रेखाटनं करीत होते. 'आदिम' नावाचं लघु नियतकालीक काढीत होते. काही दर्जेदार दिवाळी अंकांची मांडणी आणि सजावटही करीत होते. घरगुती, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांचा एक वेगळा ट्रेंड त्यांनी निर्माण केला. अशीच एक सुंदर पत्रिका पुलंच्या हाती लागली. पुलंनी जाहीर कार्यक्रमात तिचा उल्लेख केला आणि चित्रकाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. असा तो धामधुमीचा काळ होता. सोबत कविसंमेलनं आणि साहित्यिक चर्चासत्रांचाही तो काळ होता. आणि या सगळ्या चळवळीचे अंभोरे शिलेदार होते. कुठल्याही कार्यक्रमाच्या मध्यवर्ती ते असायचे. 'आदिम'साठी त्यांनी खूप प्रयोग केले. तो सगळा तपशिल जर नीट समजून घेतला तर मुद्रणकलेच्या क्षेत्रात ज्यांना संशोधनपर काही काम करायचय आणि काही सिद्धान्त मांडायचाय त्यांच्यासाठी ते फार मोलाचं आहे. 'आदिम'मधून लिहिणाऱ्या मंडळींचा एक वेगळाच दबदबा त्या काळाने कोरून ठेवलेला आहे. 'आदिम'ने नगरच्या साहित्यविश्वाला नवी ओळख दिली, प्रतिष्ठा दिली. कितीतरी कविंना लिहितं केलं. संजीवनी खोजे, सुमती लांडे, लहू कानडे, प्रकाश घोडके, टी. एन. परदेशी, चंद्रकांत पालवे, विलास गीते, प्रा. सुधाकर कुऱ्हाडे  या मंडळींनी आपली स्वतंत्र मुद्रा नंतर उमटवली. हे सगळेच आदिमच्याच प्रवाहातले प्रवासी. आणि त्यांचे नावाडी होते श्रीधर अंभोरे.

   अंभोरे या सगळ्यात असूनही तेवढेच अलिप्त होते. त्यांच्या रेषेसारखे. त्यांची रेषा त्यांना सापडलेली होती. ते तिला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळीत होते. अकोला जिल्ह्यातल्या बाभुळगाव पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मध्यप्रदेशातल्या भिमबेटक्याला वळसा घालून, मध्ये निर्मनुष्य अरण्य तुडवत इथे नगर शहरात येऊन थांबला. मध्ये कितीतरी थांबे होते. कितीतरी प्रलोभनं होती. परंतु ते तसूभरही ढळले नाहीत. त्यांना रेषा निसटू द्यायची नव्हती. काळाबरोबर वाहण्याचा त्यांचा स्वभाव नाही. काळाचं नुकसान न करता त्याच्यावर चढाई करायला त्यांना आवडतं. चित्रकलेच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कामासाठी त्यांना इचलकरंजी इथून दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरचा 'फाय फौंडेशन अवार्ड' हा पुरस्कार एकोणीसशे चौऱ्यांशीमध्येच मिळाला. पुरस्कार अतिशय नम्रपणे स्विकारून त्याचं चिन्ह त्यांनी कोपऱ्यात उभं करून ठेऊन दिलं. येणाऱ्या जाणाऱ्याला अतिशय निगर्वीपणे, अलिप्ततेने त्याविषयी सांगत राहिले. ते गुंतत नाहीत, गुंतवून घेत नाहीत. त्यामुळे भल्याभल्यांना जे साध्य झालेलं नाही ते त्यांना साध्य झालेलं आहे. फकिरी वृत्ती असल्यामुळे काही साठवून ठेवण्याची गरज पडत नाही. अविवाहित राहिल्यामुळे बाकीचे कितीतरी प्रश्न आपोआप निकालात निघतात.

    अंभोरे जेवढ्या सहजपणे रेखाटन करतात तेवढ्याच सहजपणे ते गातातही सुंदर. त्यांचं वाचन अफाट आहे. जीवनाला मुळातच समजून घेतलेलं असल्यामुळे त्यांच्या रेखाटनांचे विषयही जीवाला ओढ लावणारे आहेत. त्यांनी गरीबी अनुभवलेली आहे. उच्चनिचतेचा फटका त्यांना बसलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या रेखाटनांना चेहरे नाहीत. डोक्यावर ओझं आणि पाठीला लेकरू बांधून पोटासाठी वणवणनाऱ्या स्त्रिया हा त्यांच्या चित्रांचा आस्थेचा विषय आहे. मौज, मस्ती, जल्लोष, आनंद त्यांच्या चित्रातून डोकावेलच असं नाही परंतु वेदनेच्या पाठीमागून येणारी करुणा, प्रेम, माया, ममता ही बुद्धाची, येशूची जीवनप्रणाली त्यांनी अंगिकारलेली आहे.

   महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर त्यांच्या रेखाटनांचे चाहते आहेत. सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडूलकरांनाही त्यांची चित्र आवडायची. त्यावेळी तेंडूलकर दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवरून 'दिंडी' नावाने एक कार्यक्रम चालवायचे. त्या दिंडीतून त्यांनी अंभोरेंनाही फिरवून आणलं. त्या काळात अंभोरे घराघरात जाऊन पोहोचले. त्या दरम्यान तेंडूलकर नगरमधेच येऊन राहिले आणि सगळं शुटींग त्यांनी इथेच केलं. आज त्या फिल्मचा छोटासा तुकडाही अंभोरेंकडे सापडत नाही. फाय फौंडेशन अवार्ड असो की तेंडूलकरांनी केलेली फिल्म; अंभोरेंनी त्याचं कधीच भांडवल केलं नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा इव्हेंट करणारा काळही इथे थबकतो. त्याला ते खूप  विसंगत वाटतं. असं घडू शकतं! यावर त्याचा तिळमात्रही विश्वास बसत नाही. परंतु ते घडलेलं असतं, घडत असतं आणि घडणार असतं.

   अंभोरे आता छानसं निवृत्तीचं आयुष्य जगताहेत. परंतु त्यांच्या पायाला भोवरा बांधलेला असल्यामुळे ते कधीच एका ठिकाणी सापडत नाहीत. आज इथं तर उद्या तिथं सारखे भटकताहेत. रेखाटनं करताहेत. अलीकडे कितीतरी दर्जेदार पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी साकारलेली आहेत. मागेच ते जालना इथून दिल्या जाणाऱ्या 'अजिंठा' पुरस्काराने सन्मानित झाले. त्या दिवशी ते जे बोलले ते काळजावर कोरून ठेवावं इतकं सुंदर होतं. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला. चित्राची भाषा सांगितली. इतिहास सांगितला. लहान लेकरू खडू, पेन्सिलीने घरातल्या भिंती खराब करीत असेल तर ते त्याला जाणीवपूर्वक करू द्या. त्याला थांबवू नका. न जाणो तिथूनच कुठूनतरी त्याला त्याची रेषा गवसेल. असा प्रेमळ आणि मोलाचा सल्लाही दिला. त्या लहान मुलाचा हात अंभोरेंनी आजही सोडलेला नाही. तो अवखळपणा, प्रांजळपणा, विश्वास त्यामुळे त्यांच्यात अजूनही टिकून आहे.

   अंभोरेंकडे, त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं की मला ते एखाद्या आदिम महामानवासारखे वाटतात. अजिंठ्यातील एखादं शिल्प पाय फुटून इथवर चालत आलं की काय असा भास होतो. तो भास नसतोच मुळी. ते आहेत खरोखरच अजिंठ्याच्या आदिम शिल्पासारखे. प्रेमळ, सुंदर, हवेहवेसे वाटणारे.

..................................................

दै. दिव्य मराठी / दि. १६ ऑक्टोबर २०१२

//  शशिकांत शिंदे  //

  (९८६०९०९१७९)