Showing posts with label आता केवळ न संपणारी प्रतीक्षा... : सतीश बडवे. Show all posts
Showing posts with label आता केवळ न संपणारी प्रतीक्षा... : सतीश बडवे. Show all posts

आता केवळ न संपणारी प्रतीक्षा... : सतीश बडवे

 



तो क्वचितच व्यक्त झाला शब्दांतून आणि बरेचसे रेषांमधून. तरीही खूप काही त्याच्याआत दडलेलेच राहिले. भीमबेटका, गुहा चित्रे,पिंपळपानांवरची तथागताची रेखाटने, नाकडोळे नसलेले असंख्य चेहरे, झाडांचे आकार, गायतोंडे यांच्या चित्रांचे अनोखेपण, जंगलातले अनुभव , ताडोबाचे अभयारण्य, पुस्तकांची मुखपृष्ठे, कविता, ललित, वैचारिक अशा विषयांवर तो बोलत राहिला. त्याचा अवकाश खूप विस्तीर्ण होता. झेप कल्पनेपलिकडची होती. म्हणायला तो एकटा होता पण सदैव गोतावळ्यात राहिला. आख्खा महाराष्ट्र त्याने अनेक वेळा पायाखालून घातला. त्याच्या पायाला भोवरा होता. बाराही महिने त्यांची अखंड वारी चालू असे. माझ्यासाठी तो काळासावळा विठोबाच होता. वारकरी विठ्ठल भेटीला जातात पण हा विठोबा सतत मित्रांच्या भेटीला जायचा. महाराष्ट्राच्या सर्व भागातल्या मित्रांना जोडणारा तो दुवा होता. सारी घरे त्याचीच होती. घरातली माणसे त्याचीच होती. त्यांच्यात तो सहज मिसळून जायचा. त्यांचाच व्हायचा. कोणत्याही विषयावर बोलणे ही त्यांची खासियत होती...


         श्रीधर भेटला तो सुमतीमुळे. निमित्त नगरचे साहित्य संमेलन. रंगनाथ पठारे व श्रीधर एकाचवेळी भेटावेत आणि मैत्रीचा नवा अध्याय सुरु व्हावा ही गोष्ट माझ्यासाठी अपूर्व होती. संमेलनाची स्मरणिका अनोखी बनली ती श्रीधरच्या रेखाटनांमुळे. शब्दालय आणि श्रीधरचे घट्ट नाते होते. तो नुसताच चित्रकार नव्हता. त्याच्या सर्जनशीलतेची मुळे त्याच्या आतून उमलून येणाऱ्या प्रयोगशीलतेत दडलेली होती. शब्दालयच्या पहिल्या दिवाळी अंकाची निर्मिती करताना सुमती आणि श्रीधर यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. म्हणूनच शब्दालय महाराष्ट्रभर पोचला. या दोन कलावंतांचा तो उत्कट आविष्कार होता. त्याची रेखाटने, मांडणी वैशिष्ट्यपूर्ण तर होतीच पण कलात्मक उंची या अंकाला मिळाली. श्रीधरचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच संकल्पनेला तो कधीच चिकटून राहिला नाही. नवे प्रयोग करण्यासाठी त्यांची धडपड अखंड सुरु असे. ही प्रयोगशीलता शब्दालयच्या लगोलग आलेल्या दुसऱ्या अंकात प्रकट झाली. या अंकातील लेखांची, कवितांची शीर्षके मुद्रित न करता त्याने रेखाटली. पण खरी कमाल तर नंतर होती. या अंकात आलेल्या सर्व जाहिराती श्रीधरच्या अक्षरातून उमटलेल्या आहेत. सगळ्या जाहिराती हाताने लिहून काढणे हा अजब प्रकार होता. तासनतास मानपाठ एक करुन श्रीधरने त्या केल्या. हा वेगळाच प्रयोग होता. अशा प्रयोगासाठी झोकून द्यायला तो कधीच मागे हटला नाही. त्याच्या रेषांप्रमाणेच त्याच्या अक्षरांनाही स्वतःची एक लय होती. शब्द आणि अक्षरांमधून तो सतत निनादत राहिला...


        नगरच्या दहा वर्षांच्या काळात सतत फिरण्यासाठी आम्ही बरोबरच राहायचो. आमची घरेही एकमेकांजवळ होती. संजीवनी खोजे पुरस्काराचे विविध कार्यक्रम, जागतिक मराठी साहित्य संमेलन, पक्षीमित्रांसोबतची भ्रमंती , नगरचे नाट्यसंमेलन, आकाशवाणीवरच्या मुलाखती, राज्य

नाट्य स्पर्धा या सर्व ठिकाणी आम्ही कायम सोबत राहिलो.विलास गिते, रवी सातपुते, लहू कानडे, सतीश डेरेकर, केशव भणगे, अरुण मांडे,संजय दळवी, लियाकत सय्यद,खलील मुजफ्फर, लछमन हर्दवाणी, र. बा. मंचरकर या सर्वांबरोबर भटकंती आणि भन्नाट चर्चा हेच आमचे विश्व होते. पुढे मी तत्कालीन औरंगाबादमध्ये तर नंतर श्रीधर जालन्यात. जाता येता नित्य भेटी होत राहिल्या. पानतावणे सरांच्या घरी अनेक वेळा जाऊन ज्या चर्चा व्हायच्या त्यातूनही समृद्ध अनुभव मिळाला. श्रीधरला बोलण्यासाठी कोणताच विषय वर्ज्य नव्हता. कधी कधी तर निव्वळ गप्पा मारण्यासाठी तो घरी मुक्कामाला यायचा. त्याचे अफाट वाचन, चित्रशिल्पांवरचे मला न समजणारी भिन्न मते, दिलीप बडे यांच्या बरोबरच्या मैफली या सगळ्या गोष्टी मला समृद्ध करत गेल्या...

         श्रीधर तसा संन्यास्त वृत्तीचा, फकिरी प्रवृत्तीचा आणि तरीही गोतावळ्यात रमलेला. स्वतःच्या धुंदीत तो जगला. मित्रांमध्ये रमला. तो अजातशत्रू होता. गुणदोषांसकट मित्रत्त्व त्याने निभावले. जितक्या सहजतेने तो यायचा, खुलत जायचा आणि पुन्हा भेटू म्हणून निघूनही जायचा. अगदी तसेच त्याने आत्ताही केले. श्रीधरचे गाव कोणते होते? भावाच्या घरी जालन्यात त्यांचा शेवटचा पडाव होता. घरी उत्तम टेप होती. पण हळूहळू तो निरीच्छ होत गेला. त्याला खूप सांगायचे होते. विश्वाच्या पटलावरचे अनेक रंग त्याला कागदावर उमटवायचे होते...ते सारेच आता अपूर्ण राहिले. त्याचा आतला आवाज त्याच्या चित्रांमधून उमटत राहील. त्याच्या येण्याची सवय झाली होती. आता वाट पाहिली तरी श्रीधर येणार नाही. पण मी मात्र वाट पाहतच राहीन माझ्या या सावळ्या विठोबाची...