मागच्या आठवड्यात घनसावंगीला झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात चित्रकार श्रीधर अंभोरे यांची भेट झाली. त्यांनी त्यांच्या चित्रकलेवर लिहिलेलं महावीर जोंधळे यांचं श्रीधररेषा हे पुस्तक भेट दिलं. घनसावंगी साहित्य संमेलनाचा हा मोठाच धनलाभ म्हणायचा. काही दिवसापूर्वी फेसबुकवर या पुस्तकाची जाहिरात पाहिली तेंव्हापासून जिथं गेलो तिथं हे पुस्तक शोधू लागलो. शोधून सापडत नव्हतं ते असं अचानक घनसावंगी संमेलनात साक्षात चित्रकाराकडूनच भेट मिळालं हा आनंद खूपच मोठा होता.
श्रीधर अंभोरे यांची चित्रं मला सुरुवातीपासून आवडतात. त्यांच्या चित्रांची आणि माझी पहिली भेट झाली तो योगही मोठा विलक्षण होता. मला मिळालेला आयुष्यातला पहिला पुरस्कार कोपरगावच्या भिग राहणारे ट्रस्टचा होता. त्या पुरस्काराच्या प्रमाणपत्रावर माझ्या कवितेची प्रकृती लक्षात घेऊन श्रीधर अंभोरे यांनी हातानं चित्र काढलेलं होतं. हे प्रमाणपत्रच एकूण श्रीधर अंभोरे यांनी तयार केलेलं होतं. ते मला इतकं आवडलं की तसं प्रमाणपत्र पुन्हा माझ्या पाहण्यात आलं नाही. पहिलाच पुरस्कार असल्यामुळे कित्येक वर्ष मी ते प्रमाणपत्र माझ्या घरात भिंतीवर लावून ठेवलेले होतं. इतकच नाही तर पुढं माझा पहिला ललितलेख संग्रह 'गाई घरा आल्या' प्रकाशित झाला तेव्हा त्याच्या अर्पण पत्रिकेच्या पानावरही मी हे चित्र वापरलं होतं, इतकं ते मला आवडलं होतं. मला वाटलं की इथं माझ्या एकट्याच्याच घरी राहण्याऐवजी ते पुस्तकातून अनेकांपर्यंत जावं. तेव्हापासून श्रीधर अंभोरे यांच्या रेषेनं माझं मन वेधून घेतलेलं होतं.
त्यानंतर अहमदनगर इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेची सजावट श्रीधर अंभोरे यांनी केलेली होती. तिथं त्यांची पुष्कळ चित्र पाहायला मिळाली. मुखपृष्ठावर त्यांनी रेखाटलेला पैसाचा खांब मला अजूनही जसाच्या तसा दिसतो. जालन्याचे जयराम खेडेकर आणि संजीवनी तडेगावकर यांनी श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांचा आपल्या नियतकालिकांसाठी आणि प्रकाशनांसाठी उपयोग करून घेतला, तेव्हा आणखी मोठ्या प्रमाणात त्यांची रेखाचित्र पाहायला मिळाली. अलीकडं अंभोरे दिसू लागले ते मंगळवेढ्याच्या शब्द शिवार या प्रकाशानाच्या उपक्रमांमधून. शब्द शिवार हा दिवाळी अंक आणि शब्द शिवार या प्रकाशनानं प्रकाशित केलेले कितीतरी ग्रंथ श्रीधर अंभोरे यांच्या रेषेने सजलेले आहेत.
भ. मा. परसवाळे आणि श्रीधर अंभोरे या दोघांमध्ये खूप साम्य आहे. हे दोन्ही चित्रकार मला खूप खूप आवडतात. प्रखर वास्तववादी तरी कवितेतील प्रतिमेसारखी त्यांची चित्रं तरल असतात. दलित साहित्याचा आशय स्वतःत सामावून घेणारे हे दोन समर्थ चित्रकार म्हणजे मराठी साहित्यासाला लाभलेलं लेणंच आहेत. या दोघांमध्ये फरकही आहे. अंभोरे व्यावसायिक प्रकाशकांकडं कधी गेले नाहीत. परसवाळे पुणे, मुंबईला जाऊन येतात. प्रकाशकांना भेटतात. चित्रं घेऊन संस्थांमध्ये जातात. स्वतः चित्रांची विक्री करतात. कुणी सांगितलं तर व्यक्तिचित्रही तयार करून देतात. पण अंभोरे तसं करताना दिसत नाहीत. ते कानाकोपऱ्यातल्या उपक्रमशील लोकांना भेटतात. त्यांच्यासाठी अव्यावहारिक स्वरूपाचं काम करतात.
श्रीधर अंभोरे हे मला नेहमीच चित्रकलेतले बहिणाबाई चौधरी वाटत आलेले आहेत. जशा बहिणाबाई निरक्षर होत्या तसेच श्रीधर अंभोरे हेही चित्रकलेच्या संदर्भात निरक्षरच आहेत. त्यांनी कुठेही चित्रकलेचं अधिकृत शिक्षण घेतलेलं नाही. त्यांना हात धरून कुणीही चित्रकला शिकवलेली नाही. निरक्षर असूनही बहिणाबाईंनी मराठीत जशी अजरामर कविता लिहून ठेवली तशीच चित्रकला न शिकलेल्या श्रीधर अंभोरे यांनी अजरामर चित्रं तयार करून ठेवलेली आहेत. कवितेला नेहमीच भाषेची मर्यादा असते, तशी चित्र कलेला नसते. त्यामुळे अमराठी माणूसही त्या चित्रांचा आस्वाद घेऊ शकतो.
माणसांमध्ये जसा उपेक्षित माणूस हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे, तसंच वस्तू आणि आकारामध्येही त्यांनी उपेक्षितांना शोधूनच हात लावलेला आहे. अंभोरे रंगाचा फारसा वापर करत नाहीत. जणू रंग हे चित्रातल्या श्रीमंतीचं, प्रतिष्ठेचं लक्षणच. म्हणून अंभोरे ते टाळतात की काय असं वाटतं. फक्त रेषेतूनच ते आपल्या कल्पना साकार करतात. त्यामुळे त्यांची चित्रं कमी आणि रेखाटनं जास्त आहेत. हे सगळं पुस्तकही रेखाटणांनीच सजलेलं आहे. अगदी मुखपृष्ठापासून कृष्णधवल रंगातच सजवण्यात आलेलं आहे. इतर कुठलाही रंग वापरण्यात आलेला नाही.
हे असे रेखाकार एकत्रित पाहायला उपलब्ध होणं हे चित्र रसिकांसाठी मोठं भाग्याचंच आहे. महावीर जोंधळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते पत्रकार असल्यामुळे उपेक्षितांना पुढे आणण्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर निभावलेली आहे. माझ्या उभरत्या काळात मीही त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांना हे पुस्तक करावसं वाटलं त्यामागचं कारणही श्रीधर अंभोरे यांना अधोरेखित करणं हेच आहे. त्यांनी हे काम केलं नसतं तर आणखी कुणी केलं असतं की नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे महावीर जोंधळे यांचे चित्ररसिकांवर हे उपकारच म्हणायला हवेत.
पण महावीर जोंधळे यांनी वापरलेली अलंकारिक शब्दफुलोऱ्याची भाषा अंभोरे यांच्या वास्तववादी चित्रशैलीला विसंगत वाटते. अर्थातच चित्र समीक्षेच्या परिभाषेतला मजकूर त्यांच्याकडून अपेक्षित नसला तरी मनावरच्या चित्रठशांनाच आणखी स्पष्टपणे अधोरेखित करत त्यांनी हा मजकूर लिहिला असता तर चित्र आणि मजकुराची जुगलबंदी समेवर गेली असती आणि वाचक प्रेक्षकांनी नक्कीच वाहवा अशी दाद दिली असती. या मजकुरातल्या चित्रानुभवाला चित्रकारानुभवाची जिवंत जोड मिळाली असती तर हे पुस्तक आजोड झाले असते. ही उणीव काहीशी रणधीर शिंदे यांच्या प्रस्तावनेनं भरून काढली आहे. त्यांचं लेखनही चित्रसमीक्षेच्या परिभाषेतलं नाही. पण त्यात अंभोरे यांच्या रेषेची नेमकी मर्म अधोरेखित झालेली आहेत. थोर मराठी कवी यशवंत मनोहर यांनी या ग्रंथाची केलेली पाठराखण मोठी काव्यात्म आहे. श्रीधर अंभोरे यांच्या रेषांमध्ये गुंतलेला हा कवी दाद देताना एक कविताच लिहून जातो.
हा ग्रंथ मंगळवेढ्याच्या शब्दशिवार प्रकाशनानं प्रकाशित केला आहे. त्याच्या निर्मितीत प्रकाशकाच्या बाजूनं काहीही उणीव राहिलेली नाही. चित्रांच्या अल्बमला शोभावा असा कॉफीटेबल बुकचा आकार, नॅचरल शेडचा मजबूत कागद, निर्मळ मुद्रण, इतक्या गुणांनी नटलेलं हे पुस्तक, हा ऐवज केवळ शंभर रुपयात उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी प्रकाशकाचे खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे आणि आभारही मानायला पाहिजे. चित्रांचं मुद्रण आणखी स्वच्छ आणि स्पष्ट झालं असतं तर आणखीच बहार आली असती.
इंद्रजीत घुले या माझ्या कवीमित्रानं सुरू केलेलं हे प्रकाशन म्हणजे परिवर्तनाची एक चळवळच झालेली आहे. गेल्या काही वर्षात त्यानं एकापेक्षा एक सुंदर ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातल्या या प्रकाशकाला मराठीतल्या थोर थोर लेखक कवींनी आपले ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी दिलेले आहेत, ते त्याच्यातल्या या गुणवत्तेमुळेच. हे पुस्तक उपलब्ध करण्यासाठी आपण इंद्रजीतशी संपर्क करू शकता. त्याचा दूरध्वनी क्रमांक असा आहे - ९४२३०६०११२