श्रीधर अंभोरे रेषांचा जादूगार : चंद्रकांत पालवे

                                                       

चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या रेखाटनांनी गेली ३५ वर्षे चित्र-रसिकांना वेड लावले आहे. त्यांच्या रेखाटनांमधील अमूर्त  शैलीतील भावस्वप्ने, वास्तवाचे एक जिवंत जागते वैभव उभे करते. वयाच्या तिशीमध्ये श्रीधर अंभोरे यांना घ्फाय फाऊंडेशनङ सारखा  राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. निवड समितीतील एक सदस्य श्री पु. ल. देशपांडे यांनी त्यावेळी श्रीधर अंभोरे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली  आहे.
श्रीधर अंभोरे यांच्या रेखाटनांत, बर्‍याचदा तर्‍हेच्या माणसांच्या जगण्याच्या स्थिती, ज्या वेगाने व प्रभावाने (Speed and  force) चितारल्या जातात त्या पाहिल्यानंतर माणसाला जन्माजात मिळालेल्या दु:खांचे, संकटाचे क्षणदेखील त्यांनी ज्या फोर्सने रेखाटले  आहेत, त्यामध्ये आपण स्वत:ला हरवून बसतो. त्यांच्या चित्रात सहसा व्यक्तींना ठळकपणे चेहरा-मोहरा नसतो. आजची व्यक्ती एवढ्या  प्रचंड धकाधकीने व्यक्तिगत चेहराच हरवून बसली आहे; असे त्यांच्या चित्रातून जाणवते. ग्रामीण भागातील दु:ख, दैन्य, दारिद्र्य त्यांच्या  रेषांमधून जेव्हा प्रगट होते तेव्हा हृदयाला पीळ पडतो. त्यांच्या चित्रातील घ्अवकाशङ तर रेषांच्या भवतालच्या स्थितीने सुन्न करून  टाकणारा आहे.
श्रीधर अंभोरे यांना जंगल, रानावनात हिंडण्याचा छंद आहे. त्यांच्या रेषांमधून उमटणारी झाडांची लयबद्घ दुनिया जेवढी गूढ,  विलोभनीय तेवढीच निर्गम, हिंस्त्र जाणवते. त्यांच्या क ाही चित्रांत ओबडधोबड दगडांचेच चित्रण आढळते. ते पाहिल्यानंतर जगण्याच्या  आदिम कळा, या दगडातदेखील जाणवतात. दगड वाहून नेणार्‍या, खुंट्यांच्या बैलगाड्या किंवा झुली पांघरून सजविलेल्या बैलगाड्या व  बैलांचे दिखावदार वळणे त्यांच्या काही चित्रांतून जेव्हा दिसते, तेव्हा ग्रामीण भागात राहणार्‍या प्रत्येक माणसास अंभोरे स्वत:च्या मनातले  चित्रकार वाटतात.
श्रीधर अंभोरे गेली अनेक वर्षे चित्रात काळ्या शाईचाच फक्त वापर करीत आहेत. त्यांची बरीचशी रेखाटने ही काळ्या  रंगातील आहेत. त्यांनी बहुरंगी चित्रे काढली नाहीत असे नाही; परंतु ते रमतात फक्त काळ्या रेषांच्या रेखाटनात. अंधार हा सार्वभौम आहे  व जगण्याच्या सर्व सच्च्या कृतींचे प्रतिनिधित्व काळा रंग करतो, असे त्यांना वाटते. अंभोरे यांच्या चित्रातली सृष्टी ही केवळ उघड्या  डोळ्यांनी दिसणार्‍या दृष्ट्यांसारखी नाही तर ते मुळात कवी हृदयाचे असल्याने त्यांनी कल्पनेतील भावसृष्टीही त्यांच्या चित्रातून स्पष्ट  होते. त्यांनी रेखाटलेला सूर्य किंवा झाड किंवा माणूस हा त्यातील सर्व आदिम वेदनांसह ते उभा करतात. मूळ जगण्याशी सुसंगत तरीही  वेदनेच्या आगळ्यावेगळ्या प्रांतात त्यांची चित्रे रसिकांना घेऊन जातात.
मध्यंतरी श्रीधर अंभोरे यांनी घ्गणपतीचीङ काही चित्रे रेखाटली होती. मूळ पारंपारिक गणेशाची जी चित्रे उपलब्ध आहेत,  त्यापेक्षा खूप वेगळी अशी चित्रे श्रीधर अंभोरे यांनी रेखाटली.
एकोणीसशी ऐंशीच्या दरम्यान, श्रीधर अंभोरे यांनी स्वत: चालविलेल्या ‘दिंडी’, ‘आदिम’ या नियतकालिकांतून तसेच  ‘अस्मितादर्श’, ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’ इ. नियतकालिकांतून श्रीधर अंभोरे यांची चित्रे प्रसिद्घ झाली आहेत. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे  श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांनी चिरंतन झाली आहेत. गंगाधर पानतावणे विजय तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाचे, सहवासाचे ऋण ते मानतात.  विजय तेंडुलकरांनी श्रीधर अंभोरे यांच्या चित्रासाठी एक डॉक्यूमेंट्री फिल्मही दिग्दर्शित करून मुंबई दूरदर्शनने ती अनेकदा दाखविली आहे.
श्रीधर अंभोरे यांची रेखाटने पाहिल्यानंतर त्यावर भाष्य करीत बसण्यापेक्षा या आगळ्यावेगळ्या चित्रांच्या जगात आपण  मनसोक्त फिरून यावे, असेच प्रत्येक रसिक म्हणेल.