दगडावरची रेघ : टी. एन. परदेशी

                                              
श्रीधर अंभोरे हे वलयांकित नाव आहे. मध्यम उंची, तालीम करून कमावल्यागत वाटावा असा जरा गुटगुटीत बांधा, गोल  हसरा चेहरा व चांगला काळाभोर वर्ण असलेल्या देहास श्रीधर अंभोरे यापुरते अन्य नाव शोभते ना ! या देहास गोरा-गव्हाळ वर्णही  शोभला नसता. त्यांच्या वर्णास ब्लॅक-ब्युटीचा गुण लाभलेला असल्याने तो श्रीधर अंभोरे या नावास्तवे कसा एकरूप होऊन राहिला आहे.
कलावंतांची बोटे नाजूक, निमुळती व जरा लांबसर असतात या पारंपारिक समजुतीस अंभोरे यांच्या बोटांनी छेद दिला आहे.  त्यांचा हात कामगाराच्या हातासारखा ओबडधोबड आहे. हा हात पाथरवटाचा नाही; परंतु त्याच कुळातील पाषाणातून काव्य निर्माण  करणार्‍या शिल्पकाराच्या हाताशी नाते सांगणारा आहे. येथे प्रस्तर पाषाण-शिळेऐवजी कागद आहे व छिन्नी-हातोडीऐवजी पेन-पेन्सिल  आहे.
अंभोरेंची बोटं कागदावर करामत करतात. ती एकदा चालू लागली की, कागदावर अल्लड, अवखळ, हसर्‍या, दुखर्‍या, कुंवार,  गर्भार, उडणार्‍या लपणार्‍या, गाणार्‍या, नाचणार्‍या, हंबरणार्‍या, गरजणार्‍या, धो-धो कोसळणार्‍या व रिमझिम बरसणार्‍या शीळ घालणार्‍या,  चीत्कारणार्‍या, दहाडणार्‍या, लावणीच्या तालावर आणि मृदंग-टाळांच्या ठेक्यावर नर्तन करणार्‍या रेषांचे विभ्रम व विलास सुरू होतात.  अंभोरे यांच्या बोटांमधून पाझरणार्‍या रेषांचा हा रास पाहण्याची व अनुभवण्याची गोष्ट आहे. या बोटांना सृजनाचे वरदान आहे. वरदानांना  अनेकदा शाप उ:शापाचे संदर्भ असतात. श्रीधरने जन्मजात जातीच्या संदर्भातले शाप भोगले.
अंभोरे सातव्या इयत्तेत होते तेव्हाचा भोगवटा... गावात कोणा मालदारानं आणलेल्या हनुमंताच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम  होता. त्यानिमित्त जिलेबीचं जेवण होतं. पन्नास वर्षापुर्वीचं ते अभावग्रस्त जिरायती खेडं. सुग्रास व गोडधोडाचं अन्न कधीतरी सटीसहामाशी  मिळायचं. धार्मिक कार्यक्रम असल्यानं लोकांमध्ये उत्साह होता. शिणीच्या सवंगड्याबरोबर अंभोरेही पंगतीत जाऊन बसले. अशा महत्त्वाच्या  पंगतीत, सोन्याच्या डाग-अलंकार, कुंकवाच्या गंधात बुडवून टिळा लावण्याची प्रथा होती. टिळा लावणारानं शाळकरी अंभारेंनाही टिळा  लावला. सोन्याचा तो आयुष्यातला पहिला स्पर्श. अंभोरेंना आनंदाचं भरत आलं. पत्रावळी आल्या. पक्वान्नं वाढली गेली. घ्घ्बोला  पुंडलिक...ङङ चा गजर झाला. आता पहिला घास घ्यायचा तितक्यात, दलिताचं पारे सवर्णांच्या मांडीला मांडी लावून पंगतीत बसल्याचं  कोणीतरी पाहिलं ! त्यानं आरडा-ओरड केला. घ्घ्पत्रावळ उचल आणि तिकडे लांब जाऊन बैस...ङङ आश्चर्य व तिरस्कार यांनी भरलेल्या  नजरांचे अनेकविध चेहरे ! अंभोरे भरल्या पंगतीतून उठले पण पत्रावळ मात्र उचलली नाही. पंगतीतील चित्र-विचित्र चेहर्‍यांपासून स्वत:ला  चुकवीत ते दूर निघून गेले.
याच वयातील आणखी एक प्रसंग घ्घ्तलवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठङङ या विषयावर शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. अशा स्पर्धेत  भाग घेण्याची अंभोरे यांची ती पहिलीच वेळ. त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यावर ते व्यासपीठाकडं जाऊ लागले. अंभोरे बोलणार हे मुलांना  अनपेक्षित असावं. हुल्लडबाजी व टिंगलटवाळी सहन करीत ते माईकसमोर उभे राहिले. सभोवार पाहिलं. शेकडो मुलं व वीस-पंचवीस  शिक्षकांच्या नजरा त्याच्याकडं लागल्या होत्या. त्या चेहर्‍यांवरील कुतूहलमिश्रित टवाळी व तिरस्काराच्या भावदर्शनानं अंभोरेंच्या जाणिवा  बधिर झाल्या. काहीच सुचेना घ्घ्मी ब्लँक झालो होतोङ असं अंभोरे स्वत:च्या त्या विलक्षण स्थितीचं वर्णन करतात. अशावेळी समूह  चेकाळल्यागत होतो, चेहरे क्रूर होतात. सर्वांगास थरथर सुटलेले अंभोरे मूकपणे जागेवर जाऊन बसले. शिक्षकांपैकी कोणी त्यांची  पाठराखण केली नाही.
अंभोरेंच्या आजीच्या कपाळावर मध्यभागी जखमेचा चंद्रकोरीसारखा व्रण होता. शे-पन्नास वर्षांपुर्वी खेड्यांमध्ये अनेक विचित्र  रिवाज होते. पाटील व तत्सम मुखंडासमोरून जाताना स्त्रियांना नाकापर्यंत पदर घेऊन चालावं लागे. नजर व मान झुकलेली ठेवून तिनं  आदब राखून चाललं पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्त्रीनं वहाण वापरू नये व असलीच तिच्या वहाण, तर तिनं ती वेशीतून गावात  शिरताना पायातून काढून डोक्यावर घ्यावी. अंभोरेंची आजी कसल्याशा घाईत होती. तिनं पदर घेऊन आदब पाळली; पण वहाण डोक्यावर  घ्यायला विसरली. एक बाई अशी उद्दामपणानं वागते ! त्यात ती दलित बाई ! वेशीच्या देवढीत असलेल्या पाटलाच्या मिशा थरथरल्या.  डोळ्‌यात अंगार भरला. क्रोधानं पेटलेल्या पाटलाच्या अंगात क्रौर्य संचारलं. त्यानं रस्त्यावर येऊन पायातला जोडा काढला व चवड्याची  बाजू धरून त्याची टाच अंभोरेंच्या आजीच्या कपाळावर घासली. टाचेवरची नाल खोल जखम करून गेली. आजीचा चेहरा रक्तानं माखला.  तिच्या कपाळावरील ठसठसीत कुंकवाच्या बाजूनं त्या जखमेचा व्रण कायमस्वरूपी वैष्णवी टिळ्यासारखा राहिला. थोडीशी जाण आल्यावर  आजीच्या कुशीत शिरणार्‍या श्रीधर अंभोरेंनी तिच्या सुरकुतल्या चेहर्‍यावर आपली बोटं फिरवीत बालसुलभतेनं विचारलं होतं, ‘आजेss  तुझ्या कपाळावर काय लागलं होतं?’
कपाळावर पाटलाच्या वहाणेच्या नालेचा व्रण घेऊन वावरणारी आजी शेवटपर्यंत व्यवस्था व देव यांना शिव्या देतच जगली.  देव व उपासना याबाबतीत तिनं रूढी व परंपरा यांच्याशी फारकत घेतली होती. तिनं मुखवटे घातलेल्या, चेहरे सजवलेल्या गोंडस देवतांना  व त्यांच्या राउळांना नाकारलं होतं. रानात जाऊन ती ओबडधोबड व आकारहीन अशा दगडी गोट्यांना शेंदूर लावून त्यांची व बाभूळ, हिवर  अशा काटेरी झाडांची पूजा करीत असे. आजीनं जीवनाच्या रखरखीत वास्तवाची पूजा मांडली होती. आजीच्या भेगाळलेल्या पावलांचे ठसे  श्रीधरनं आपल्या तळहातांवर घेतले. तिच्या पूजाविधीच्या अमूर्त शैलीनं त्याच्या बोटांना झपाटलं. या बोटांनी चौकट नाकारली. मानवी  अवयवांची रेखिवता व त्यांचं गारूड नाकारलं. परंपरा नाकारल्या. स्वीकारली ती फक्त रेषा. ही केवळ अंभोरेंच्या तालानं नाचणारी, त्यांच्या  लयीनं सळसळणारी आणि त्यांच्याच गतीन धावणारी.
अंभोरेंच्या चित्रांमधून माणसांचे चेहरे हद्दपार झाले आहेत. चित्रकार म्हणून अंभोरे यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यातील  हे सर्वांत महत्वाचे. मानवकृतीत त्याचा चेहरा सर्वाधिक महत्त्वाचा हा प्राथमिक चित्रकलेचा धडा आहे. अशा स्थितीत अंभोरे मात्र चेहरा  नाकारतात. याचे मूळ त्यांच्या बालपणातील, विद्यार्थीदशेतील काही घटनांमध्ये  शोधावे लागते. त्यांना भर पंगतीतून अपमानास्पद रीतीने  उठावे लागल्यानंतर त्यांचा पाठलाग करणारे वक्तृत्व चेहरे, स्पर्धेत त्यांच्याकडे हेटाळणीच्या नजरांनी पाहणारे चेहरे व कपाळावर  पाटलाच्या चपलेच्या नालेचा व्रण घेऊन वावरणारी आजी. उमलत्या वयातील या भोगवट्यांमुळे अंभोरेंच्या मनात माणसाच्या चेहर्‍याविषयी  घृणा निर्माण झाली व या मनोविकारातून त्यांनी चेहरा नाकारला असे म्हणावे का? निष्कर्ष होकारात्मक येतो. मात्र, विकार म्हणजे  आजार नव्हे, विकार म्हणजे विकृती नव्हे हे ध्यानात घेतले पाहिजे. ओल्या मातीवरले ठसे म्हणजे विकार, जे अनेकदा संस्कारांशी नाते  सांगतात. अंभोरेंच्या चित्रातील चेहर्‍याचा अभाव ही त्यांच्या जीवनातील काही कटू प्रसंगांमुळे त्यांच्या अंतर्मनावर झालेल्या संस्कारांची  ञ्ृश्य प्रतिक्रिया आहे.
माणूस एकटा असो वा त्याचा समूह, अंभोरेंची बोटे माणसाच्या घडावर आकारहीन वाटावे असे विस्कटलेले वर्तुळ तेवढे  रेखाटतात. त्यांच्या चित्रातील माणसांना चेहर्‍यावरचे भाव दाखवण्याची संधी त्यांच्या रेषा देत नाहीत. चेहर्‍यांचे चित्र करताना त्यांची बोटे  आखडतात व रेषा आक्रसते. तरीही नावापुरते डोके व चेहरा घेऊन वावरणारी अंभोरेंच्या चित्रातील माणसे निव्वळ कबंधासारखी भेसूर व  भुतांसारखी भयाण मात्र वाटत नाहीत!
अभिनयामध्ये चेहर्‍यावरील उत्कट भावदर्शनास मोठेच महत्त्व. भावनांची अभिव्यक्ती नि:शब्दपणे होते ती मानवी शरीराच्या  संवेदनशीलतेमुळे. डोळे व चेहरा शिरोभाग व चेहरा या गोष्टी शिल्पकार व चित्रकार यांच्या कौशल्याचा कस पाहणार्‍या आहेत.  लेण्या-मंदिरांमधील, चेहरा व शिरोभाग फोडलेली अनेक शिल्पे आपली उत्कटता हरवून बसली आहेत. तारुण्यात जीव जडतो, तो चेहर्‍यावर.  एवढा महत्त्वपूर्ण हा मानवी चेहरा !
या पार्श्र्वभूमीवर चित्रांमधून माणसांचा चेहरा नाकारण्याचा धाडसी प्रयोग अंभोरेंनी केला. तो कमालीचा यशस्वीही झाला.  इतकेच नव्हे तर चेहर्‍याचा अभाव हे त्यांच्या चित्रांचे बलस्थान ठरले. ती गोष्ट अंभोरेंची Identity ठरली. त्यास कारण असे की हा प्रयोग  बुध्दयाच केलेला, काहीतरी वेगळे करण्याच्या जाणिवेतून, खटपटीने केलेला नाही. त्यामागे घ्घ्घटं भिंद्यात, पटं छिंद्यात...ङङ ची वृत्ती नाही.  हे स्वाभाविकतेने, सहजवृत्ती व सहजस्फूर्तीने घडले आहे.
गेली चाळीस वर्षे रेषांशी खेळणार्‍या अंभोरे यांनी त्यांच्या चित्रांमध्ये चेहरा नाकारूनही त्याचा अभाव जाणवू दिलेला नाही.  त्यांची चेहराविहीन माणसे पूर्णत्वाने प्रगट होतात. त्यांची अभिव्यक्ती नि:शेषत्वाने मना-अंत:करणास भिडते. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे  खास अशी घ्घ्अंभोरे शैलीङङ विकसित झाली आहे.
श्रीधर अंभोरे यांचे वडील शेतकरी होते. पोटापुरती जिरायत जमीन होती. शेतकर्‍याची सहनशीलता व आहे त्यात समाधानी  राहण्याची वृत्ती अंगी असणारा हा माणूस धार्मिक होता. वाचनाची आवड होती. त्यामुळे वाचनकला शाळेत न जाताही अवगत करून  घेतली होती. रामायण, महाभारत या ग्रंथांच्या वाचनाबरोबरीनं हरीविजय, पांडव प्रताप यासारख्या पोथ्यांचं पारायणही बाप करीत असे.  अंभोरे सांगतात की बाप कबीर पंथी होता. एकतारीवर कबीरांची भजनं गायचा. कबीरपंथी विचारांवर माझा पिंड पोसलेला आहे असं  म्हणणारे अंभोरे नंतर बुध्दाच्या तत्त्वज्ञानानं व आंबेडकरांच्या विचारांनी भारावले. आई, आजी, वडील आणि कबीर, बुद्घ व आंबेडकर अशी  ही अंभोरेंच्या चिंतनाची सांगड आहे.
गावी चौथीपर्यंत मजल मारल्यावर अंभोरे अकोला या जिल्ह्याच्या गावी शिक्षणासाठी आले. सातवी-आठवीपासून बोटांना  चित्रांचा चाळा लागला. आपण नेमकं काय करतोय हे समजत व उमजत नव्हतं. मिळेल त्या कागदावर, शाळे च्या वह्यांवर रेखाटनं होऊ  लागली. निर्मितीचा आनंद होत होता. नेमकी काही दिशा नव्हती, कोणी पाहावं, कौतुक करावं अशी अपेक्षाही नव्हती. आसपासचं वातावरण  कलेसाठी पूरक, अनुकूल असण्याचा प्रश्नच नव्हता. फावल्या वेळात सतत रेखाटनांमध्ये रमलेले अंभोरे काय करताहेत  यात मित्रांना तसंच  शिक्षकांनाही स्वारस्य नव्हतं.
१९६५ ला एस. एस. सी. झाल्यावर जबलपूरला पॉलिटेक्निमध्ये प्रवेश मिळाला. चांगल्या शिक्षणाच्या उमेदीनं गेलेल्या अंभोरेंचं  मन लवकरच गळाठलं. तिथल्या अंगावर येणार्‍या अस्पृश्यतेचे चटके असह्य झाले. शेवटी घ्घ्गड्या आपुला गाव बराङङ म्हणण्याची पाळी  आली. परतण्याच्या विचारात असताना एका मित्रानं सुचवलं की खजुराहो पाहून जाऊ. खजुराहोहून भीमबेटका इथं जाण्याचं ठरलं. तेथील  गुहांच्या प्रस्तरावरील रेखाचित्रांविषयी कुठंतरी ऐकलं-वाचलेलं होतं. अंभोरेंना त्या गुफांमध्ये घबाड गवसलं. ‘कोsहं’ हा माणसाच्या  मनात उद्भवणारा प्रश्न सनातन असला तरी बहुतेकांना त्याची जन्मभर जाणीवच होत नाही. ज्या मुठभर अस्वस्थ  जिवांना हा प्रश्न छळत  असतो. त्यांच्यापैकी बहुतेकांची त्याच्या उत्तराशी गाठभेट होत नाही. भीमबेटकाच्या गुहेत अंभोरेंना त्यांच्या रेषेचा अर्थ व तिचा ऋणानुबंध  समजला. आदिम माणसानं त्या गुहेत कोरलेल्या रेखाचित्रांशी आपलं जन्मांतरीचं नातं असल्याची जाणीव झाली. स्वत:च्या  रेखाचित्राविषयी मनात गर्दी करणार्‍या अनेक शंका-कुशंकांचं मळभ दूर झालं. आपण आपल्या रेषेसह या भीमबेटकाचे पाईक आहोत याची  सार्‍या देहा-मनाला प्रसन्न करणारी व आत्म्याला बळ देणारी जाणीव झाली. भीमबेटकाच्या आदिम कलावंतांनी अंभोरेंचा हात हाती  घेतला. कच्च मांस भाजून खायला शिकलेल्या, हिंस्त्र श्र्वापदांच्या सहवासात राहणार्‍या त्या कोमलहृदयी संवेदनाक्षम माणसानं अंभोरेंना  आपल्या केसाळ छातीशी कवटाळलं. इथ-तिथं नाकारल्या गेल्याच्या अनेक वेदना निमाल्या. अंभोरेंच्या रेषांना नवनिर्मितीचे डोहाळे लागले.  क्षितिजापल्याड भरारी घेण्याची त्या स्वप्नं पाहू लागल्या.
या प्रसंगानंतर बावीस वर्षांनी विजय तेंडुलकरांशी अंभोरेंची गाठभेट झाली. त्यावेळी मराठी दूरदर्शनच्या तेंडुलकरांच्या घ्दिंडीङ  हा कार्यक्रम गाजत होता. प्रसिद्घ व्यक्ती-कलावंतांच्या साधनेचं व व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारा तो मुलाखतीच्या स्वरूपाचा कार्यक्रम  रसिकप्रिय झाला होता. आजच्या भाषेत सांगायचे, तर त्याची टीआरपी खूप चांगली होती. तेंडुलकरांनी अंभोरेंची त्या कार्यक्रमासाठी  मुलाखत घेतली. त्यासाठी दूरदर्शनच्या टीमसह दोन-चार दिवस नगरला येऊन राहिले. सोलापूर रस्त्यावरील एका बाभूळबनात, तसेच  त्यावेळी अंभोरे काम करीत होते त्या लक्ष्मीकारंजा येथील पोस्ट ऑफिस येथे अशा काही ठिकाणी चित्रण झाले. त्यावेळी अंभोरेंशी  बोलताना तेंडुलकर म्हणाले की, श्रीधर तुझी रेषा आदिम आहे, तिचं भीमबेटकाशी नातं आहे. स्वयंविश्लेषण, स्व-प्रतिमेची निर्मिती या गोष्टी  अनेकदा आभासात्मक व भ्रमाच्या पातळीवर विहरणार्‍या असू शकतात. अवास्तव स्वरूपाला गोंजारताना त्याची अतिसंवेदनशीलतेनं  पाठराखण करताना अनेक कलावंत जमिनीवर राहत नाहीत. यासाठी आपण निर्माण केलेली स्व-प्रतिमा अन्य जाणकारांनी जशीच्या तशी;  परंतु त्रयस्थपणे स्वीकारणे यास अधिक मोठं मोल असतं. त्यामुळेच तेंडुलकरांशी ती प्रतिक्रिया हा घ्दिंडीङ कार्यक्रमाच्या निमित्ताने पदरात  पडलेला सर्वात मोठा लाभ असे अंभोरे मानतात.
भीमबेटकाच्या गुहाचित्रांशी स्वत:च्या रेषेचे नाते असल्याची जाणीव १९६५ साली ज्या प्रकारे झाली तिला त्याच पद्घतीने  तेंडुलकरांनी १९८३ साली दुजोरा दिला. यामुळे अंभोरे विलक्षण सुखावले होते.
टागोरांनी घर सोड ल्यावर त्यांची चित्रं बदलली, अधिक परिपक्व झाली. घराबाहेर पडल्यावर आकाश विस्तारतं, अनेक  अनुभव येतात. जीवनाशी खरी ओळख होते. माणसांमध्ये परिवर्तन होतं, कलाकारांच्या दृष्टीनं हे परिवर्तन अधिक खोल व व्यापक असतं.  अंभोरे म्हणतात, घर सोडल्यावर मी बदललो. खूप माणसं भेटली. कलावंत साहित्यिकांशी स्नेह जुळून आला. जाणकार-दर्दी व गुणग्राहक  माणसांच्या सहवासामुळं मला माझी ओळख पटली. समाजात माझी अशी खास घ्ओळखङ व घ्प्रतिमाङ निर्माण झाली. त्यामुळं उमेद  वाढली, माझी कला बहरली, फुलली व विकसित झाली. नाव झालं, प्रसिद्घी मिळाली तरी माझी मूळवृत्ती बदलली नाही. माझा स्वभाव  तडजोडीचा नाही. त्यामुळं माझ्या मूळ अभिरुची व अभिव्यक्तीशी असलेलं माझं इमान ढळलं नाही. माझ्या बोटांनी चौकट नाकारली,  निसर्गचित्रण, भौतिक रचना व स्थिरचित्रण नाकारलं. नक्षीदार-कलाकुसरीच्या शोभिवंत व पारंपारिक पद्घती व शैली यांच्याशी माझं कधी  नातं जुळलं नाही. माझी शैली, तिच्या प्राथमिक अवस्थेतही माझी स्वत:ची अशी व खास वैशिष्ट्यपूर्ण होती, ती तशीच राहिली. मात्र,  बदलत गेलेला माझा भोवताल व परिसर यामुळं मी परिपक्व होत गेलो. मी गणपतीची चित्रं केली; पण त्यांचं व्यावसायिक-व्यापारी  सादरीकरण करण्याची कल्पनाही माझ्या मनात आली नाही. गॅलर्‍यांचं आकर्षण मला नाही. आपली चित्रं हारीनं मांडावीत, त्यांची प्रदर्शनं  भरवावीत, माध्यमांचं व्यवस्थापन करून त्यांच्या विक्रीचा खटाटोप करावा, असं माझ्या मनी कधी आलं नाही...
अंभोरेंना ऐन तारुण्यात, वयाच्या पस्तीशीत, 1983 साली, मानाचा घ्फाय फाऊंडेशनङ पुरस्कार लाभला. त्या वर्षातील  पुरस्कारांच्या यादीत जयंत नारळीकर, जी. ए. कुलकर्णी, आर. के. लक्ष्मण, खाशाबा जाधव यांच्या बरोबरीने श्रीधर अंभोरे यांचे नाव होते.  त्या कार्यक्रमात ओळख झालेल्या खाशाबा जाधव यांच्याशी अंभोरेंचे सूर चांगलेच जूळून आले होते.
त्यानंतर २००९ साली अंभोरेंना पद्मश्री विखे पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले आणि आता २०१२ ला जालना येथील  संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कारासारखे स्वरूप असलेला घ्अजिंठा पुरस्कारङ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ही मोठीच सुखद  घटना आहे.