एक निगर्वी कलावंत : श्रीधर अंभोरे : अशोक विष्णुपंत थोरात

                                       

सुप्रसिद्घ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचा आणि माझा परिचय खूप उशिरा म्हणजे २००० साली झाला. यशवंतराव चव्हाण  साहित्य प्रतिष्ठान व गंगा लॉज मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार माझ्या घ्वादळातल्या प्रवासातङ या कवितासंग्रहाला  जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी मी गेलो तेव्हा टिळक स्मारक मंदिर खच्चून भरलेले. मंचावर सुशीलकुमार शिंदे, बबनराव पाचपुते,  रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे इ. राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी. प्रेक्षकांतही सारे नामवंत. अतिशय देखणा असा तो  कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर सार्‍यांच्या भेटीगाठी आटोपल्यावर एक कडक इस्त्री केलेली सुती कपडे घातलेली राजकारणी वाटावी  अशी व्यक्ती भेटायला आली. म्हणाली घ्मी श्रीधर अंभोरे. नगरला लवकर पोचायचे आहे, पुन्हा कधीतरी सविस्तर भेटूच. तुमचे अभंग  आणि कविता मात्र अस्वस्थ करून गेल्या.ङ आणि पाहता-पाहता शिरूभाऊ निघूनही गेले. नंतरच्या खाद्य, मद्य, पद्य उत्सवाला न थांबता.  खरं तर पुरस्कार मिळालेल्या माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरूभाऊंचे होते. त्यामुळे माझी नि त्यांची पूर्वओळख असायला हवी होती; पण  नव्हती. पंधरा सोळा वर्षांपुर्वी कवी लोकनाथ यशवंत त्यांच्याजवळ माझ्या कवितेविषयी बोलला. नंतर प्रेमात पडावे अशा सुंदर हस्ताक्षरात  शिरूभाऊंचे लहानसेच पत्र आले. त्यांनी माझ्या कविता अवलोकनार्थ मागितल्या होत्या. मी अर्थात कविता पाठविल्या नाहीत. उलट त्यांना,  मी माझ्या कवितांच्या बाबतीत कसा असमाधानी आणि उदासीन आहे ते कळविले. मी जे काही माझ्या कवितेच्या बाबतीत चिंतन मांडले  त्याला दाद म्हणून लगेचच त्यांचे पत्र आले. पुढे 199 साली नगरला अ. भा. साहित्य संमेलनात मी काव्यसंवर्धन पत्रिकेचा घ्मांडवा  बाहेरच्या कविताङ हा विशेषांक प्रकाशित केला. त्यावेळी त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला; पण भेट होऊ शकली नाही. मी खूप निराश  झालो आणि तेव्हाच निश्चय केला की काहीही झाले तरी जेव्हा केव्हा आपण काव्यसंग्रह प्रकाशित करू तेव्हा मुखपृष्ठ घ्यायचे ते श्रीधर  अंभोरे यांचेच. त्यावेळी ते सतत व्यग्र असायचे. पोस्टातील नोकरी. हंस, साधना,  राजस अशा प्रतिष्ठित दिवाळी अंकांसाठी रेखाटने. अनेक  ग्रंथांसाठी रेखाटने आणि मुखपृष्ठ. असे त्यांचे सुरू असायचे. शिवाय सुप्रसिद्घ अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत घ्आदिमङ हे  अनियतकालिक ते काढायचे. त्यावेळी नगरमध्ये अनुवादाच्या क्षेत्रात विलास गीते, कवी व संपादक अरुण शेवते, शब्दालय प्रकाशनाच्या  सुमती लांडे इत्यादींचे उपक्रम जोरात सुरु होते. शिरूभाऊ या सगळ्या चळवळींमध्ये मागे राहून पुढे असत. होय, पुढेपुढे करणे त्यांना  कधीच जमले नाही. कॅमेर्‍याची ऍलर्जीच जणू त्यांना. थोर नाटककार आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे वडील विजय तेंडुलकर यांनी  त्यांच्या घरी जाऊन, चित्रीकरण करून त्यांच्यावर एक डॉक्यूमेंट्री फिल्म काढली. तेव्हाही ते शांतपणे जमेल तेवढी त्यांना मदत करीत  होते. (नाइलाजाने). स्वत:विषयी ते कधीही कुणाला फारसं काही सांगत नाहीत. अत्यंत संकोची आणि मितभाषी असा त्यांचा स्वभाव आहे;  पण आमच्यासारख्या मोजक्या मित्रांमध्ये ते फारच खुलतात. ते बोलत असतात आणि घरातील लहान-थोर मंडळीत तल्लीन होऊन ऐकत  असतात. आम्ही अनेकदा त्यांना म्हणतो घ्तुम्ही एकपात्री प्रयोग सुरु करा, तुफान चालेल,ङ त्यांच्याकडे सहजसुंदर अशी कथनशैली आहे.  अनुभवाचे समृद्घ रसायन आहे; पण हे सारे खाजगी मैफलीपुरतेच मर्यादित आहे. शिरूभाऊंनी मित्र परिवार वाढू नये याची फार काळजी  घेतली असावी. म्हणून त्यांचे चाहते शेकडो असले तरी मित्र मात्र मोजकेच आहेत. शिरूभाऊंना घर असले तरी कुटुंब नाही. लग्न न  करण्याचे खास असे काही कारण नाही. राहिले, राहून गेले ! पोस्टातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्रभर सारखे फिरत असतात. ते  जिथे रमतात अशी घरे फार थोडकी आहेत. कल्याणचे प्रसिद्घ नाटककार वामन पतके, नगरचे रविंद्र सातपुते, औरंगाबादला डॉ. सतीश  बडवे, जालन्याला वहिनी, पुतणे, अकोल्याला डॉ. श्रीकृष्ण राऊत, अमरावतीला मी आणि यावलीकर, शेवटी नागपूरला लोकनाथ यशवंत असे  त्यांचे शेड्यूल असते. वर्षातून चार-पाच वेळा हे घडत राहते. याला कारण त्यांचे मुळगाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील चिखलगाव. हे प्रसिद्घ  वर्‍हाडी कादंबरीकार बाजीराव पाटील (थोरात) यांचेही गाव. या गावाला ते नियमित भेट देत राहतात. म्हणून आमच्याही भेटी घडतात. ते  दौर्‍यावर आले की, आमच्यापेक्षा आमच्या बायका-मुलांनाच जास्त आनंद होतो. कारण आल्यावर ते पहिल्यांदा किचनवर पूर्ण ताबा  मिळवतात. बायकांना आराम मिळते म्हणून, मुलांना नवलाईचे पदार्थ खायला मिळतात म्हणून सारे आनंदी असतो. मग रात्रभर आमच्या  गप्पा आणि धुराची वलये... जगातले साहित्य, संगीत, चित्रपट, नाट्य यातील सर्वोत्तम काय ते मला लोकनाथ यशवंत यांच्यामुळे कळते  आणि देशातले शिरूभाऊंमुळे. ते गात नसले तरी शास्त्रीय संगीताची त्यांना उत्तम जाण आणि आवड आहे. ते अबोल आणि बुजरे  असल्यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती अफाट आहे. म्हणूनच अनेक व्यक्तींच्या लकबी आणि स्वभाव यांचे सहज दर्शन ते गप्पांच्या ओघात  घडवतात. मात्र, त्यात टिंगलटवाळीचा सूर कुठेही नसतो. स्वच्छतेचे ते फार भोक्ते आहेत. अनेकदा ते छुपे गांधीवादी असल्याचा मला संशय  येतो. ज्यांच्याकडे मुक्कामाला उतरतील तिथले टॉयलेट, बेसिन अगदी लख्ख करून ठेवतील. एकदा या स्वच्छता प्रकारामुळे त्यांच्या  घरमालकाला त्यांचा संशय आला आणि भीतभीतच घरमालकाने त्यांना जात विचारली. समाजाच्या मानसिक स्वच्छतेचीही ते तेवढीच  काळजी वाहतात. म्हणूनच आमच्या गप्पांमध्ये अनेक सामाजिक विषय विविध दृष्टिकोनातून चर्चिले जातात. शिरूभाऊंचे अजून एक  स्वभाववैशिष्ट्य अलीकडे जाणवले ते म्हणजे त्यांची असंग्रही वृत्ती. किमान गरजेपुरत्या वस्तु ते बाळगतात. म्हणूनच अहमदनगच्या  त्यांच्या छोटेखानी फ्लॅटवर सध्यातरी म्हणावी तितकी पुस्तके नाहीत की त्यांनी काढलेली चित्रेही. अगदी पुरस्कार किंवा मानचिन्हेसुद्घा  नाहीत. ‘फाय फाऊंडेशन’ सारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार एकेकाळी त्यांना मिळाला. तोही अजून त्यांनी जपून ठेवला नाही. आता पंचवीस  हजार रुपयांच्या जालना येथील ‘अजिंठा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. बघूया शिरूभाऊंच्या वृत्तीत काही बदल  होतोय का ते.