कलावंत आणि मैत्री : धनंजय गोवर्धने

                                                 
सुमारे चाळीस वर्षापुर्वी मराठी साहित्यात एक साचलेपण आलं होतं. हळूहळू शिक्षणाचा प्रसार वाढला, शिक्षण कोणा एका  विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिली नव्हती, अन्य समाजाचे लोक शिकू लागले होते, लिहू-वाचू लागले होते आणि त्यामुळंच तत्कालीन मराठी  साहित्यात व्यक्त होणारी वेदना ही त्यांना सहवेदना वाटत नव्हती, आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचं साहित्य जगाचं लक्ष वेधून घेत होतं, मराठी  साहित्यात नामदेव ढसाळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दलित साहित्याच्या वेगळेपणाची जाणीव करून दिली होती.  मध्यमवर्गीय  जाणिवांना हे सारं नवं आणि असह्य होतं. घ्सत्यकथाङ ही वेगळी वाट निर्माण करता-करता नि एक चाकोरीबाहेरची नवी चाकोरी निर्माण  झाली होती. त्यावेळी घ्सत्यकथेतङ साहित्य छापून आलं म्हणजे स्वत:ला कृतकृत्य मानणारे अनेक होते. नवीन अनुभव आणि  वास्तवातली दाहकता यामुळं ते व्यक्त करणारी नवी परिभाषा निर्माण होऊ लागली. ती तत्कालीन वाङमयीन मासिकांना सहन होत  नव्हती. ती त्यांच्या पचनी पडत नव्हती, तेव्हा आजच्यासारखा वर्तमानपत्रांच्या साहित्य, शास्त्र, कला, विनोद यांच्या पुरवण्या निघत  नव्हत्या. त्यामुळं हे नवीन उन्मेष व्यक्त होण्यासाठी अनियतकालिकांची गरज भासू लागली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून  अनितकालिकांच्या चळवळी चालू झाल्या. त्यात आजच्या आघाडीच्या प्रथितयश अनेक लेखक, कवी, चित्रकारांचा सहभाग होता. कारण  तत्कालीन मासिक/दिवाळी अंक यात छापलेल्या साहित्याचं चित्र असे, त्या साहित्याला आपल्या रंगरेषांतून व्यक्त करण्यासाठी चित्रकारांनी  प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत.
त्या सुमारास सुभाष अवचट यांनी कथा, कविता यांच्या रेखाटनांत वेगळे प्रयोग केले. आशयाला पकडण्याचा प्रयत्न केला.  कधी-कधी ते लेखाला, कवितेला वेगळी उंची देऊन गेले आणि त्यातूनच त्यांची एक वेगळी शैली निर्माण झाली. सुभाष अवचट हे मराठी  साहित्याचा (इलेस्ट्रेशनची) बोधचित्रांची चौकट मांडणार्‍यांपैकी एक महत्त्वाचे चित्रकार आहेत. मराठी अनियतकालिकात अहमदनगरहून  श्रीधर अंभोरे, चंद्रकांत पालवे, सदाशिव अमरापूरकर, अरुण शेवते आणि त्यांचे सहकारी मिळून ‘आदिम’काढीत असत, नंतर ‘दिंडी’,  ‘दृष्टी’ असे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्याच वेळी नाशिकमधून आम्ही घ्सहकारी उद्गारङ नावाचं अनियतकालिक काढत असू. ठाण्याहून  प्रा. रमेश पानसे हे घ्ऋचाङ काढीत असत अशोक शहाणे, मनोहर ओक आदी अनेक जण अनियतकालिके काढत असत; पण त्या सर्वांत  लक्ष वेधून घेत असत ती श्रीधर अंभोरेंची चित्रं.
श्रीधर अंभोरेंचा आणि माझा परिचय या अशा अनियतकालिकांच्याच चळवळीतून सुमारे ४० वर्षांपुर्वी झाला. या पार्श्वभूमीवर  श्रीधरच्या चित्रांचा अभ्यास करणं मला महत्त्वाचं वाटलं. श्रीधरचा जन्म चिखलगाव (जि. अकोला) इथं झाला. तत्कालीन व्यवस्थेनुसार तो  वाढला, सभोवतालच्या परिस्थितीचा संस्कार त्याच्यावर झाला; परंतु वडिलांची शिकवण, त्यामुळं तो शिकला, लहानपणी तो कोळशानंच  घराच्या भिंतीवर रेघोट्या काढून स्वत:ला व्यक्त करू लागला होता. पुढं जाणता झाल्यावर वाचू लागला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम  बुद्घ, कबीर, ओशो यांच्या वाचनामुळं त्याच्या विचारात एक प्रगल्भता येऊ लागली होती. पोस्टात नोकरी करीत असताना दररोज  वेगवेगळ्या माणसांशी संपर्क येत गेला. प्रकृती तितक्या विकृती, अनेक ठिकाणच्या बदल्या. त्यामुळं तो सतत माणसात वावरत राहिला.  माणसं वाचत राहिला आणि स्वत:ला चित्रातून व्यक्त करीत राहिला.
श्रीधरनं चित्रकलेचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. त्यामुळं त्यांच्या चित्रांत एक अनागरी सौंदर्य आणि लहान मुलाची  निरागसता आहे. त्याला स्वत:ला फिरण्याचा छंद आहे. त्यामुळं तो भरपूर फिरतो, निसर्गात रमतो आणि निसर्गातून मिळालेला आनंद तो  त्याच्या चित्रातून आपणाला देत असतो. त्याच्या चित्रात हा निसर्ग त्याचा असतो, त्याच्या चित्रात बाभळीची झाडं जास्त असतात. ती  त्याच्या सभोवती होती. त्या बाभळीच्या झाडांत, फांद्यात पाखरं अडकू लागली, पानं कमी, पाखरं जास्त होऊ लागली. बाभळीच्या  झाडांऐवजी देहाची झाडं कधी झाली कळलं नाही. आम्ही भेटलो की भरपूर बोलतो, फिरायला जातो, बोलताना कोणताही विषय वर्ज्य  नसतो, संगीत, चित्र, शिल्प, सिनेमा, साहित्य, कला, माणसं, स्वयंपाक अशा अनेक विषयांवर आम्ही कधी - कधी रात्रभरही बोलतो.
श्रीधर बोलका आहे. तो पटकन संवाद साधू शकतो. महाराष्ट्रात अशी अनेक घरं आहेत तिथं तो केव्हाही जातो आणि त्या  घरचा होतो. विशेषत: लहान मुलांशी त्याचं छान जमतं, तो आला की आमच्याकडे पावभाजीचा/पुलावाचा खास कार्यक्रम असतो. तो नकला  चांगल्या करतो. त्याला गाणं चांगलं कळतं. त्यानं बरंच चांगलं वाचलेलं आहे. अनेक मासिकं त्याच्याकडे येत असतात. दलित चळवळीच्या  कार्यकर्त्यांना तो हक्काचा वाटतो. प्रवासात नगरला त्याच्याकडे मुक्काम करून पुढं जाणारे अनेक लेखक, कवी, चित्रकार, कार्यकर्ते  महाराष्ट्रात आहेत. त्यात अनेक मान्यवरांचा समावेश आहे. या सार्‍यामुळं त्याचं व्यक्तिमत्व समृद्घ होत असतं आणि ते त्याच्या चित्रातून  जाणवत राहतं. अनियतकालिकाच्या अंकाला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा त्यानं एक पांगुळगाडा मुखपृष्ठावर काढला होता. त्यावेळी चित्र  छापणं हे खर्चिक काम होतं. त्यासाठी ब्लॉक करावा लागत असे. यावर उपाय म्हणून सायक्लोस्टाईलच्या मशीनवर त्यांनी अंक काढला  आणि स्टेन्सिल पेपरवर चित्र काढून ती छापली. हे अतिशय जिकरीचं, जोखमीचं काम होतं. दिवाळी अंकासाठीसुद्घा बटर पेपरवर चित्र  काढून ती छापली जायची, या पद्घतीत चित्राची दुरुस्ती करणं शक्य नसायचं, त्यावेळी श्रीरामपुरहून सुमती लांडे या घ्शब्दालयङ नावाचा  दिवाळी अंक काढीत असत, त्यासाठी त्यानं अशा पद्घतीची अनेक चित्रं काढली, घ्हसंङ च्या दिवाळी अंकात अनेक वर्षांपासून श्रीधर अंभोरे  आणि भ. म. परसवाळे यांची चित्रं येतात. सुमारे वीस वर्षांपुर्वी पडल्यामुळं माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आणि नाशिकच्या  सार्वजनिक वाचनालयाच्या दिवाळी अंकाचं काम चालू होतं. आम्ही श्रीधरला बोलावून घेतलं. तो लगेच आला आणि डाव्या हातानं काही  चित्रं काढली आणि श्रीधरनं चित्रं काढून तो अंक आम्ही पूर्ण केला. श्रीधरनं रंगीत चित्रं फार कमी काढली आहेत. काही वर्षांपुर्वी रंगीत  पेनच्या साह्यानं बिंदू पद्घतीची काही चित्रं त्यानं काढली होती; परंतु त्याची बहुसंख्य चित्रं ही काळ्या शाईनं काढलेली आहेत. त्याच्या  जगण्यातला एकटेपणा त्याच्या चित्रात जाणवतो. त्याच्या चित्रातल्या माणसांना चेहरेच नसतात. त्याबाबत त्याला एकदा विचारलं तर तो  म्हणाला की, ही माणसं समाजात वावरताना मला दिसतात. त्यांना चेहराच नसतो. मला त्यांची वेदना/ भावना जाणवते. श्रीधरच्या  चित्रातल्या माणसांना चेहरा नसतो; पण त्यांच्या देहबोलीतून ती जास्त व्यक्त होतात.  त्यातले काही परिस्थितीनं हतबल, अगतिक तर  काही हे सारे झुगारून देऊन उभे राहणारे, त्याच्या चित्रातला मोठा भाग हा स्त्री देहात व्यापलेला असतो. त्यात स्त्रीची अनेक रूपं बघायला  मिळतात. घ्आदिमङ च्या एका अंकावर त्यानं डोक्यावर गवताचा भलामोठा भारा घेऊन चालणार्‍या पाठमोर्‍या स्त्रिया काढल्या होत्या.  त्यांच्या डोक्यावर गवताचा भलामोठा गवताचा भारा असल्यानं डोकं दिसत नव्हतं; परंतु गवताचा भार त्यांच्या नितंबांवर जाणवत होता.  त्यांच्या कमरेला अडकवलेला विळा. त्याची बारीक निरीक्षणशक्ती दर्शविते, एका अंकावर अनेक कुत्रे पाठमोरे चाललेले आहेत. त्यांच्या  शेपट्या उंचावलेल्या आहेत, त्यांच्या वासना/भावना त्याच्या चित्रातून व्यक्त होत राहतात. त्याच्या चित्रातून मातृत्वाची भावना जाणवते.  त्याच्या अनेक चित्रात आई आणि मूल, कधी-कधी मूल तिच्या देहकार्याचा एक भाग होते, तर कधी स्तनपान करताना तिचं वात्सल्य  अनावर होतं. कधी त्याच्या चित्रात स्त्रीदेहाचा उत्सव मांडलेला दिसतो, तर कधी स्त्री देहाची दुखरी ठसठसणारी वेदना जाणवते. त्याच्या  चित्रात अनेकदा सिंहाचं, स्त्रियांचं अनावृत्त दर्शन असतं; पण ती उत्तान न वाटता गोठलेली वाटतात. त्यानं मुखपृष्ठासाठी काढलेल्या चित्रातून  मात्र परिस्थितीशी दोन हात करून प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याचा त्याचा आवेश कायम दिसत असतो. अनेक मुखपृष्ठांतून त्यानं  तळागाळातल्या दलितांचा नेमका आवाज आणि अवस्था चित्रात मांडलेली दिसते. त्याची रंगसंगतीही वेगळी असते. त्याच्या रंगसंगतीवर  वेगळा अभ्यास करून लिहायला हवं.
श्रीधर एक चांगला माणूस, चांगला मित्र, चांगला चित्रकार आहे. अनेक वर्षांपासून त्याचं चित्रं काढणं थांबलं आहे. त्याचा मित्र  म्हणून आणि चित्रकार म्हणून ही गोष्ट मला फार यातना देणारी आहे. त्यानं चित्रं काढावीत म्हणून मी त्याला अनेकदा विनंती केली,  बोललो, चिडलो; पण तो आत गोठल्यासारखा वाटतो, त्यानं चित्र काढावीत ही माझी निसर्गाकडे प्रार्थना आहे.