रंगरेषांचा धनी : रविंद्र सातपुते

                                                            
आपल्या सुप्त कल्पना, विचार, सुख-दु:खे, कष्ट, यातना आणि भावना प्रकट करणारा प्रभावी मार्ग म्हणजे ‘कला’ ही कला  समृद्घपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत:चे अनुभव कलेद्बारे अभिव्यक्त करणारा कलावंत म्हणजे ‘श्रीधर अंभोरे.’
नगरच्या कला आणि साहित्य क्षेत्रात ज्यांचे-ज्यांचे म्हणून योगदान आहे. त्या यादीतील वरचे नाव म्हणजे ‘श्रीधर अंभोरे.’ त्यांच्या या योगदानामुळे त्यांचे मूळ गाव कोणते हे न सांगता येणारे. उलट अंभोरे हे नगरचेच असे छातीठोकपणे सांगणारे नगरकर  आपणास भेटतात. इतके ते नगरच्या मातीशी एकरूप झालेत.
तसे त्यांचे मूळगाव विदर्भातील अकोला जिल्ह्यातील चिखलगाव. अत्यंत दुर्गम खेड्यातून नोकरीच्या निमित्ताने नगरला ३०-३५ वर्षांपूर्वी आलेले. पोस्टातील नोकरी अनेक वर्षे करूनदेखील पोस्टातील ‘त्या’ वातावरणाशी त्यांची नाळ मात्र जुळली नाही; परंतु त्या  ठिकाणी इमाने-इतबारे नोकरी करताना त्यांनी आतील आणि खिडकीबाहेरील माणसे न्याहाळली, वाचली, अनुभवली इतकेच नव्हे तर ती  त्यांनी स्मरणात ठेवली की मित्रांच्या किंवा कौटुंबिक मैफिलीत त्यांना भेटलेल्या माणसांची ते एवढे हुबेहुब नक्कल करतात की,  हसून-हसून आपले पोट दुखायला लागते. त्यांच्यातली ही कला बर्‍याच जणांना माहीत नाही. उलट बरेच जण त्यांना पाहिल्यावर ते फार  रागीट दिसतात, अशी प्रतिक्रिया देतात. असो.
त्यांनी रेखाटलेली आजपर्यंतची रेखाटनं आपण जर नीट न्याहाळली तर आपणास त्यांच्या रेखाटनांत आजूबाजूची झाडे,  पक्षी, वेली, पानझड झालेली झाडे, उघडी-बोडखी झाडांची खोडे, त्यांचे विचित्र आकार आणि चेहरेविरहित माणसे पहावयास मिळतात.  विशेषत: त्यांनी रेखाटलेली घ्बाभूळबनाङ ची चित्रे खासच. त्यांचे चित्रकलेविषयाचे कुठलेही चौकटीतील शिक्षण झालेले नसताना त्यांची  रेखाटने मात्र मौनाला वाचा फोडणारी आहेत, असे म्हणतात ते खरेच आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी लेखन करणार्‍या तमाम  साहित्यिकांच्या पुस्तकात अंभोरे यांची रेखाटने नाहीत, असे दिसत नाही. उलट काही पुस्तकांची उंची त्यांच्या रेखाटनांमुळे वाढलेली  दिसते. कलेच्या निर्मितीच्या बाबतीत ते स्वत: म्हणतात की, तसा चित्रकलेचा वारसा वगैरे काही मला मिळालेला नाही; पण वडिलांचे  हस्ताक्षर सुबक होते. मोडीचेही वळण पाहण्यासारखे होते. त्यामुळे माझे अक्षर चांगले म्हणण्याइतपत बरे आहे. चित्रकलेतील माझा ख्  ारा गुरू निसर्ग. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचे कार्य त्यानेच केले. माझ्या खेडेगावातील घरासमोरील बाभूळबनात वारा आणि झाडे लहान  मुलासारखी एकत्र खेळताना मी पाहिलीत. वारा इकडून तिकडे धावला की झाडांचा आकार वेगवेगळा व्हायचा. खूप छान दृश्य दिसायचे.  हे सारे आकार डोळ्यात मावेनासे झाले की, मी आई जेथे राखेने भांडी घासत बसे, तेथून कोळसा घ्यायचो अन्‌ घराच्या भिंतीवर पाहिलेले  दृश्य  रेखाटत असे. मला आनंद व्हायचा; पण भिंती खराब केल्या म्हणून ज्याच्या हाती मी सापडत असे तो मला मारत असे. मात्र,  त्याचे काहीच वाटत नसे. उलट चित्र मनात मुरत जायचं. इतकं की पाठीत खाल्लेला मार डोळ्यात साठलेल्या चित्राला पक्का करीत  जायचा.
माझ्या हातात ‘रेषे’ ची पेर खर्‍या अर्थाने बाभूळबनाने केली. वेशीबाहेर ठेवलेला माणूस आणि गावाबाहेर जन्मलेले बाभूळबन  हे मला सारखेच वाटायचे. त्यामुळे बाभळीचे झाड माझे झाले. त्याची वेगवेगळी रूपे अजूनही मनात ताजी आहेत. इतकी की एकटेपणात  ती सतत मायेचा सहवास देतात. गर्दीत एका अन्‌ एकट्यात हे सुफी फकिरासारखे बाभूळबन...
अंभोरे यांचे टीकाकार नेहमीच टीका करताना म्हणतात की, त्यांच्या रेखाटनाला प्रमाणबद्घता नाही; परंतु या कलाकाराला  आपण अनुभवले तर आपल्या लक्षात येईल की, अंभोरे यांचे एक स्वत:चे आकाश आहे. त्यामुळे त्यांच्या रेखाटनांत नियमबद्घता असूच  शकत नाही. कारण आकार हा स्वतंत्र असतो, त्याचे स्वत:चे म्हणून एक अस्तित्व असते, स्वत:चा एक अर्थ असतो. तरी आकार हा  अर्थाच्या अधीन नसतो. त्यावर बंधन नसते. म्हणून त्यांच्या रेखाटनांमधील आकार हे मुक्तपणे वावरताना आपणास दिसतात. त्यामुळे  त्यांनी रेखाटलेले आकार हे अर्थाला ओलांडून पलीकडे जातात. तरीही अंभोरे यांनी आपल्या टीकाकारांच्या टीकेबद्दल कधीही प्रतिक्रिया  दिलेली मला आठवत नाही. त्याचे कारण असे की, मान, अपमान, ईर्ष्या, जिद्द, आशा, महत्वाकांक्षा, गर्व, लोभ, असूया हे मानवी मनाचे  कंगोरे असले तरी अंभोरे यांच्यामध्ये असलेली सृजनता ही या सर्व भावनांच्या पलीकडे आहे म्हणून त्यांच्यात ‘मी’नाही.
फाय फाऊंडेशन अवॉर्ड, विखे पुरस्कार, अजंठा पुरस्कार एवढे मोठे पुरस्कार मिळूनदेखील त्याचे त्यांना काही नाही. विजय  तेंडुलकरांनी दूरदर्शनसाठी डॉक्यूमेंट्री फिल्म स्वत: नगरमध्ये येऊन त्यांच्यावर शूट केली. एवढेच काय नगरमधील कोणतीही व्यक्ती पु. ल.  देशपांडे यांना भेटायला पुण्याला गेली तर त्याची विचारपूस करण्याआधी श्रीधरचे काय चाललेय असे आवर्जून विचारीत. पु. लं. नी अनेक  पत्रे त्यांना लिहिली. त्यांच्यावर मुलासारखे प्रेम केले; परंतु त्यांनी कधीही बढाया मारल्याचे आठवत नाही.
१९७०-८० च्या दशकात ‘दिंडी’, ‘आदिम’, ‘ओवी’ या नावाने चक्रमुद्रांकित अनियतकालिक त्यांनी मित्रांच्या सहकार्याने  काढली. स्टेन्सिल पेपरवर टोकदार टोच्याच्या साहाय्याने ते लिहीत व रेखांकन करीत. खूप कष्टाचे व त्रासाचे ते काम होते; परंतु जिद्दीने व  आनंदाने ते करीत. त्यासाठी त्यांना हजारो रेखाटने काढावी लागली. एक वेगळा प्रयोग म्हणून दिग्गज साहित्यिक आणि कलावंतांनी  दिंडी’, ‘आदिम’चे कौतुक केलं; पण कधी ते हुरळून गेले नाहीत. त्यांच्या संवेदनशील मनामध्ये असलेली स्मृती अनुभव यामधून  रेखाचित्रांची झालेली निर्मिती थेट आपल्या हृदयाशी भिडते व ती रेखाटने आपणासमोर प्रत्यक्ष उभी राहतात. मनात दडलेल्या मोरपंखी  सौंदर्यामुळे कला दुनियेतील स्त्री सौंदर्याच्या कोणत्याही मापदंडात न बसणारी तरीही पुन: पुन्हा पाहत राहावी असी स्त्री देहाची असंख्य  रेखाटने त्यांनी रेखाटली असली तरी स्त्रियांचे मन, विश्व, स्त्री म्हणून तिचा एकांगी विचार न करता समाजातील विविध नात्यांमधून  उलगडत जाणारे स्त्रित्वाचे पदर आणि समाज यांची एकमेकांसमवेत असलेली पूरकता याचे समग्र चित्रण समर्थपणे रेखाटनांच्या  माध्यमातून आपणासमोर येतात. इतकेच काय त्यांनी रेखाटलेली अनेक कष्टकरी स्त्रियांची रेखाटने आपले काळीज हेलावतात, डोळ्याच्या  कडा ओल्या करतात. एकमात्र निश्चित की सोशीत स्त्रियांच्या रेखाटनांमधून ते स्त्रीदु:खाचे प्रदर्शन करीत नाहीत तर दर्शन घडवितात.
थोडक्यात, त्यांनी अनुभवलेले प्रसंग, त्यावर केलेले चिंतन, चिंतनातून आलेली कविता आणि कवितेतून आलेली रेखाटने  प्रभावीपणे आपणासमोर येतात. इथेच ते थांबत नाहीत तर समाजव्यवस्थेने नाकारलेली सर्वच प्रकारची माणसे, त्यांची दु:खवेदना  असह्यपणे त्यांच्या मनात कोरली गेलेली आहेत. त्यातून येणारी रेषा आक्रमक व अधिक गहिरी होते. ते त्यांच्याच एका कवितेत  म्हणतात-


‘अमानवी प्रकार तसे 
पूर्वीचेच (आदिम मानवापासून)
तेव्हा तू आत
मध्ये फक्त पडदा
काळाचा
आम्ही दिला आमचा हिरवा साज
तुमच्या मेंदूला... माणूस म्हणून
आता तक्रार तरी, न्यावी कुणाकडे
तरीही आम्ही मौन पाळत आहोत
कारण आम्ही धूळ अंगावर झेलली आहे.
आता फक्त
एवढंच नशिबात उरलं
गुमान शिस्तीनं उभं राहावं... पाहावं
मूळ चरित्र झाकायला
अंगावर धूळ झेलीत, 
किंवा
फूल झिजवीत आहे आपली हयात
दगडातील देवपण शोधण्यात
अखेर जातात फेकली चव्हाट्यावर
विरक्त विधवेगत
लतीफमियाँच्या मटण शॉपमध्ये सोलून
टांगलेल्या
बोकडागत ते फुलांचे हार पाहिलेत अन्‌ 
मुकाट सत्य समोर आलं.’

असे विदारक सत्य ते काव्याच्या माध्यमातून आपणासमोर ठेवतात. असा हा उंची लाभलेला माणूस चित्रकार किंवा  कवीपेक्षाही माणूस म्हणून खूप-खूप उंच आहे. त्यांची ही स्तुती मी त्यांचा जवळचा मित्र म्हणून करतोय असे नाही आणि ती त्यांना  भावनारही नाही; पण स्वत: ऐन भरात असताना, स्वप्रसिद्घीची सर्व आयुधे हातात असताना माझ्यासारख्या अनोळखी (त्यावेळेस)  चित्रकाराची रेखाटने स्वत:हून प्रसिद्घीस देणार्‍या कलाकाराबद्दल तुम्ही दुसरे काय म्हणणार आहात?
एक प्रसंग तुम्हा सांगतो. माझी मोठी मुलगी प्राजक्ता आपल्या पाच वर्षांच्या मुलाला (अर्जून) घेऊन दोन दिवसांकरिता  आमच्याकडे आली. घरातील बहुतेक आपापल्या कामात व्यस्त असतानाच दारावरील बेल वाजली. घरात फक्त अर्जुन रिकामा. अरे अर्जुन  दरवाजा उघड? कोण आलं बघ? अर्जुनने दरवाजा उघडला. कोण आलंय रे ! असे त्याच्या मम्मीने पुन्हा विचारले असता अर्जुनने उत्तर  दिले. ‘अंभोर्‍या’? हे उत्तर ऐकल्याबरोबर प्राजक्ता दरवाजाजवळ धावतच गेली आणि मोठ्याने ओरडतच म्हणाली, ‘अरे अर्जुन मोठ्या  माणसाला असं बोलतात काय? अन्‌ मारायला धावली. तेव्हढ्यात अंभोरे यांनी अर्जुनला पकडले व प्राजक्ताला शांत करीत म्हणाले, घ्अगं  त्यास मारू नकोस ! शांत हो! मी त्याला विचारतो? आणि लगेचच अर्जुनला विचारले, घ्अरे अर्जुन मोठ्या माणसाला उद्धटपणे असं  बोलायचं नसतं, त्यावर तो लगेचच न घाबरता म्हणाला, घ्तो कुठंय मोठा माणूस? तो तर माझा मित्र आहे ! त्याच्या उत्तरावर प्राजक्ताने  कपाळावर हात मारून घेतला. मी सकाळी-सकाळी  अंभोर्‍यांना साष्टांग दंडवत घातला. आजही तो त्यांना घ्अंभोर्‍या बाबाङ म्हणतो.  तात्पर्य, वयाचा विचार न करता लहानांमध्ये लहान अन्‌ मोठ्यांमध्ये मोठा होणारा श्रीधर इतरांपेक्षा निश्चितच वेगळा आहे.
अंभोरे विदर्भातील असल्यामुळे त्यांचे नेहमीच येणे-जाणे असते. तिकडे मोहाच्या फुलापासून बनविलेल्या अनेक गोष्टी  मिळतात, अशी माझी माहिती. ते तिकडून यातले काही तरी घेऊन येतील या आशेपोटी आम्ही काही मित्र लहान मुलासारखी त्यां च्या  येण्याची वाट बघतो; पण त्या मोहात हा माणूस आजपर्यंत पडला नाही; पण गावाकडून येताना ते एक गोष्ट करण्यासाठी कुठल्या तरी  वनस्पतीच्या घ्मुळ्याङ त्यांचं नाव मला आजपर्यंत कळलं नाही; परंतु त्यापासून त्यांच्या हातांनी बनविलेल्या चहाची चव मात्र काही  औरच. ते गावाकडून आले असे कळाल्यावर मी सकाळीच तोंड न धुताच चहा पिण्यासाठी त्यांच्याकडे जातो. असो. सध्याच्या व्यक्तिकेंद्रित  आणि आपमतलबी दुनियेत स्वत:ची सृजनशीलता कायम ठेवत माझ्या या मित्राने घनघोर अंधारात इतरांना वाट दाखविण्याचे आपले व्रत  कायम ठेवावे आणि त्याचा स्नेह मला नेहमीच लाभावा हीच अपेक्षा सरतेशेवटी इतकेच म्हणेन की,

`कुछ लोग सितारों की तरह होते है, जो दुर से चमकते है लेकिन पास नहीं आते,
कुछ लोग निगाहों की तरह होते है, जो पास रहते है तो अंधेरे में भी रस्ते मिलते है'