अस्तित्वाच्या रेषा : दा. गो. काळे

                                           

श्रीधर व माझी पहिली भेट नाशिकला झाली. निमित्त होतं, दिनकर मनवर यांच्या roots या रेखाचित्रांच्या पुस्तिकेचं प्रकाशन  आणि प्रदर्शन, अरुण काळे आणि लोकांनी कुलकर्णी चित्र दालनाची रात्रभर साचलेली धूळ उडवून आकारास आणलेलं. आमचे उद्घाटक  होते, जळगावचे पेंटर श्रीमान गुलजार गवळी आणि प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीधर अंभोरे. त्यावेळी ‘शब्दवेध’मध्ये नुकतीच त्याची  रेखाटनं प्रसिद्घ झाली होती. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण लयबद्घ अक्षरांची जादू मला भावली होती. त्यापेक्षाही ज्या पत्त्याच्या आड त्याचं  मलामय व्यक्तिमत्व लपलेलं होतं, तो ‘आनंदी बाजार पोस्ट ऑफिसङ अहमदनगर’ असा पत्ता. आज तो निवृत्त झाला असला तरी, त्या  कोंदणातच मला त्याची जाणीव होते. त्याच्या नावाबरोबरच मला आताही आनंदी बाजारच आठवतो.
नुसत्या ‘शब्दवेध’ च्या नावावर तोही शेगावला आला होता; परंतु मला त्याला शोधता आलं नाही. संपादक घ्शब्दवेधङ च्या  नावावर शेगावात ‘दा.गो’ ला कोण ओळखत असावं? नंतर कुठल्या तरी साहित्य संमेलनामध्ये त्याची व माझी भेट झाली, तो पहिल्यांदा  माझ्यावर जरा रागावलाच. काय यार... काही गल्ली, बोळ, एखादा रस्ता पत्त्यामध्ये असावा की नाही? दिवसभर ‘शब्दवेध’ चा पत्ता  शेगावात शोधत राहिलो, कंटाळून निघून गेलो. तोपर्यंत त्याला मी शेगावातील पोस्टात नोकरीला असल्याचं माहीत नव्हतं, त्यानंतर मात्र  त्याचं आणि माझं संवेदन विश्व उमगायला फारसा वेळ लागला नाही.
त्यानंतर मात्र त्याच्या आणि माझ्या काही मोजक्या पण चांगल्या म्हणाव्या अशा भेटी मला आठवतात, मी खामगावला  असताना तो आवर्जून मला भेटून पुढं अकोल्यासाठी निघायचा. आम्ही खामगावच्या रस्त्यावरून कलेविषयी भरभरून बोललेलो आहोत.  त्याच्या पाठीच्या दुखण्याविषयी त्याला एकाजागी स्वस्थ बसता येईना म्हणून तो त्याचं अस्वस्थपण घेऊन फिरतो, असंच नेहमी मला  वाटत राहतं. त्याची कलात्मक जाणिवेची अस्वस्थता थेट सामाजिक बांधिलकीपर्यंत भिडताना, शारीरिक अगतिकतेला मनापासून  विसरल्याचं मी त्याला पाहिलं आहे. गेल्या दोन वर्षांआधी माझे कथाकार मित्र व चांगले चर्चक श्री ल. वा. गोळे यांच्या मुलाच्या  लग्नाच्या निमित्तानं तो शेगावला माझ्या घरीही येऊन गेला आहे. कलेच्या स्पर्शाची छोटी भेट का असेना, एका संपादकाच्या घरावर  स्वत:ची मोहोर त्यानं उमटविली आहे. ‘फाय फाऊंडेशन’ मिळालेल्या व्यक्तीचा स्पर्श या घरानं अनुभवला आहे. नाही तरी चार भिंतीचं घर  तरी काय? माझ्या दृष्टीनं आयुष्यभराच्या संहितेला आडोसा म्हणून उभे केलेले डगमगते कॅन्व्हास, त्यामधली तगमग आणि अस्वस्थता  मनाला उभारी देणारी माणसं... एकमेकांना समृद्घ करीत जातात, जगण्यात लय निर्माण करीत जातात. त्या आडोशाला एवढंही पुरं आहे.  अजून तरी काय असावी आयुष्याची इतिकर्तव्यता.
‘फाय फाऊंडेशन’ पर्यंत गेलेल्या त्याच्या प्रतिभेचं वैभव घरालगतच्या बाभूळबनात लपलेलं होतं. रात्रंदिवस सतत त्या बनाची  स्थित्यंतरं डोळ्याखालुन आरपार शरीर धर्मातून, दारुण गरीबीच्या धगीतून, अवकाशाला आकार देण्यासाठी त्याला मिळालेलं  पहिलं  साधन होतं... घराच्या भिंतीचा उघडावाघडा मुक्त असा मोठ्ठा कॅन्व्हास आणि नेणिवेतील बाभुळबनाला साकार करण्यासाठी  ‘कोळसा’ हे  माध्यम निवडावं लागलं होतं. निर्मितीसाठी मनात निर्माण झालेली धग साधनांसाठी थांबत नाही. उपलब्ध असलेल्या अवकाशातूनच  कलावंत साधनांची प्रतिनिर्मिती करीत असतो. घ्भीमबेटकाङ तील प्रस्तरावरील चित्रांची अनावरता साधनांसाठी थांबली नाही. कलावंताच्या  निर्मिती अवस्थेमध्ये हा विचारही अभिप्रेत असतोच. कलावंताचा अहंकार आणि त्यानं घेतलेलं स्वातंत्र्य कलेला मुक्त करीत जातं.  अनुकृत्तीचा अवकाश साकारला जात असला तरी तो स्थानबद्घतेतून आपल्याला आवडलेला परिसर,  स्थळ-स्थित्यंतरं मुक्त सृष्टीची नजाकत,  सुखदु:खाच्या सर्वांगपूर्ण जाणिवा, संवेदनांना मुक्त करीत जात असतो. अनेक बंधनं त्याला तोडायची असतात. आपल्या असण्याचा,  अस्तित्वाचा कुठला तरी अर्थ त्याला मांडायचा असतो.
श्रीधरच्या दृष्टिक्षेपात सतत असाणारं, सगळं आयुष्य वेढलेलं बाभूळबन त्याच्या निर्मितीसाठी ‘कोळसा’ आणि सोबत  करणार्‍या दारिद्र्याचा  अर्थ आयुष्यभर त्याला लागला का? त्याच्या मनात, वसतीला असलेल्या बाभूळबनाचा अंधार कधी फिटला का?  खरं तर कलामाध्यम हे शोध-सातत्य आहे. कलावंत मांडत असतो सतत, सभोवारचं दु:ख, बाभूळबनात दूर गावकुसाबाहेर शोधतोय फुलं  उगवून देणारी कुसं, मी त्याचं बहरलेलं झाड अजून पाहिलं नाही. आशेचे पक्षी मात्र उडताना पाहिले, येताना पाहिले एवढं मात्र खरं.
श्रीधरच्या रेषेला मुक्त असे असतेपण आहे. त्यानं साकारलेली माणसं खेडूत आहेत. कष्टकरी वर्गातील आहेत. ते ओझेकरी  असले तरी त्यांच्यातून ओसंडणारा कमालीचा मुक्तपणा-अगतिकतेला जवळ येऊ देत नाही. त्यानं आपल्या रेषांमधून प्रवाहित केलेला  पृष्ठपणा स्वाभिमानी दृष्टिकोनातून पुढं येताना दिसतो. तो आपली जीवनदृष्टी कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत असतो. त्याचा  विस्तार करताना स्वत:सह निर्मितीतून स्वातंत्र्याचं टोक पकडून व्यवस्थेकडे निर्देश करीत असतो.
त्यानं वाचलेल्या आणि साकारलेल्या निसर्गचित्रणामध्ये मिंधेपणाचा सूर दिसत नाही. रेखाटलेल्या पशू-पक्ष्यांचं विश्र्व मुक्तपणे  समोर येताना सतत आकाशासी आपलं नातं सांगताना माणूसपणाचा धागा विसरत नाही. माणसाच्या मातीपणाशी रुतलेला घट्टपणा  तोडण्याची अमानुष वृत्ती त्यांनी जागतिकीकरणाचे पार्श्वभूमीवरही सोडलेली दिसत नाही. एवढे त्याचे प्रतीक-धर्मी वास्तव अजूनही शाबूत  आहे. त्याने घेतलेलं कलेबद्दलचं स्वातंत्र्य स्वाभिमानाचं बोट धरून सतत सोबत चालत असतं - हेच त्याच्या कला-साधनाचं महत्तम असं  टोक आहे.
त्यानं स्वीकारलेली आणि गिरवलेली प्रत्येक रेषा तिचं स्वतंत्र असं अस्तित्व घेऊनच अवतरत असते. पूर्णत्वाच्या  ‘अस्वस्थतेपोटी’ सतत झटत असलेली अपूर्णावस्था जरी तिच्या अंगात असली तरी... सौंदर्याच्या/सत्याच्या शोधासाठी ती सतत पुढं  सरकत असते. तिचं पुढं जाणं. मानवी अस्तित्वाच्या उन्नयनासाठीची पृष्ठभूमी तयार करणं असतं.
कलेच्या, निर्मितीच्या विश्वाला पूर्णत्वाची अवस्था नाही, स्थितिशील अशी प्रतिबद्घता तिच्यामध्ये नाही, ध्यास आणि सततची  वाटचाल हा सुंदरतेकडे जाणारा तिचा राजमार्ग आहे. सत्य हा तिचा प्राण. कलावंत प्रत्येक कालधर्माच्या अवकाशामध्ये त्या-त्या  समाजाची-चराचराची स्थित्यंतरं ‘चित्रलिपी’ बद्घ करीत असतो. पुढं ठेवत असतो. मुक्त असं सुत्र कलाकृतीला देत, नव्या मुक्त जाणिवांचं  पोषण पुढच्या समाजमनासाठी उपलब्ध करीत असतो. श्रीधरनं आपल्या कलेतून ठेवलेलं वास्तव अवस्थांतराकडेच आपल्याला घेऊन जात  असतं.
खर्‍या अर्थानं त्याला अकोला शहरानं भरारीसाठी आपले पंख दिले. भोवतालचा सगळा पसारा स्वागतासाठी सिद्घ होता.  अकोल्यातील बाबुजी वाचनालय त्याचं एकमेव ठिकाण. आजही तो वाचनालयाला भेट दिल्याशिवाय पुढचा प्रवास मुक्रर करीत नाही.  अजूनही त्या घटितांमधील ताजेपणा त्यानं संपविला नाही. आमच्या प्रत्येक भेटीदरम्यान बाबूजी वाचनालयाचा संदर्भ कधी टळला नाही.
‘धर्मयुग’ नावाच्या हिंदी पाक्षिकानं त्याला अनाहुतपणे कलेचा अवकाश प्राप्त करून दिला होता. त्याला बाबूजी वाचनालयाशी  निरंतर असलेले त्याचे संबंध कारणीभूत आहेत. घ्धर्मयुगङ नं आयोजित केलेल्या एका स्पर्धेतून
M. F. Hussain, Mr. Kinkar या  असामान्य कलावंतांच्या पंक्तीत आणून बसविलं होतं. या लोकांबद्दलची समज, त्यांच्या मोठेपणाची वार्ताही त्याच्या गावी नव्हती.  आपल्याप्रमाणेच सामान्य सरळपींशी ते असतील. असेच त्याला पहिल्यांदा वाटले असेल. नवव्या इयत्तेत शिकणार्‍या मुलाचं  भावविश्र्व  अजून कोणता विचार करू शकेल?
श्रीधरला अजूनही अकोल्यातील एक अव्यक्त असा परिसर खुणावत असतो. तो म्हणजे ख्रिश्चनांची घ्अलायन्स चर्चङ लायब्ररी.  हल्ली ती कुलुपबंद असलेली पाहिली आहे. ते नुसते आता अलायन्स चर्च आहे. लायब्ररी म्हणून तिचं अस्तित्व केव्हाच पुसट झालं  आहे. त्या परिसरातील नीरव शांतता, त्यातील पुस्तकांच्या वैभवाची निरनिराळ्या पाश्चात्य जर्नल्सशी आपलं नातं सांगत असतील. त्या  लायब्ररीमध्ये नियमित जाणारा ख्रिश्चन वर्गमित्र त्याच्या कलात्मक घडणीचा जीवनातील महत्वाचा दुवा ठरतो. कारण त्याच्या संबंधानं  मिळालेला प्रवेश आयुष्यातील रेषा स्पष्ट करणारा ठरला होता. तिथं कला-संस्कृतीच्या बदलांचे वारे निरनिराळ्या पाश्चात्य English  Journals मधून वाचता आले. नजरेनं अनुभवता आले. अवलोकनाची एक दृष्टी त्याला मिळाली, उदयास येणारा एक चकचकाट मुक्तमनानं  मनसोक्त अनुभवता आला होता. ह्या सगळ्या कलापूर्ण धुंदीमध्ये एका मोठ्या कलावंताची रेषा त्याला जवळून पाहता आली. त्यामुळं  आतून घडत असलेला बदल प्रथम त्याला जाणवला, अस्तित्वाच्या रेषांची जाणीवही त्याला झालेली असावी. ती बीजं पेरणारा कलावंत  होता ‘पिकासो’ ही अनमोल उपलब्ध ‘अलायन्स चर्च’ या लायब्ररीनं त्याला मिळवून दिली होती.
आजच्या परिस्थितीला ज्या व्यवस्थेमध्ये तो वावरतोय त्या सगळ्या घटितांना रेषांचं परिणाम देऊन आयुष्य सुसह्य करून  घेतलं. स्वत:ची एक मुद्रा कलेच्या माध्यमातून ठेवली. त्याबद्दलही त्याला काही वाटत नाही. कोणताही अभिनिवेश नाही. तो आजही  सगळ्या प्रवाहांना समजून घेतो, आपलं आनंदाचं झाड घेऊन भटकत असतो. मित्रांच्या सान्निध्यात आपल्या आयुष्याचा तोल सांभाळत  असतो.
शेवटी कोणतीही कलाकृती ही संचित घेऊन अवतरत असते. सुभाष अवचटांचं एक अवतरण इथं उद्घृत करतो. ‘सुख-दु:ख  पचवून निर्मिती आपापलं रूप घेऊन येते. तिथे आनंद असतो. सुख-दु:खाच्या यात्रेचा हिशोब ती ठेवत नाही. त्यामुळे बुद्घ बुद्घ असतो,  व्हिन्सेंट व्हिन्सेंट आणि त्यांना सोडून कलाकृती ही कलाकृती उरते. जशी वाणी तुकारामाची असते आणि गाथा ही तुक्याची असते.’
हं, श्रीधरच्या आणि माझ्या काही भेटींचं मला उमगलेलं थोडंसं भावविश्र्व माझ्याजवळ होतं, ते मी मांडलं. अजून काय...  घ्अजिंठाङ पुरस्काराबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो. देणार्‍यांचा मोठेपणाही स्वागतशील आहेच.