माझा मित्र श्रीधर : लहू कानडे

                                          

कलावंत जसा आभाळातून पडत नाही तसाच तो जन्मावा लागतो हेदेखील साफ खोटे आहे. प्रत्येक जीवमात्रामध्ये  कमी-अधिक प्रमाणात बुद्घी असतेच. ज्या परिस्थितीमध्ये माणसाचा जीवनक्रम विकास पावतो, त्या काळातच त्याच्या विविध गुणांचे वा  अवगुणांचे प्रमाण वाढते. ज्याला आपण प्रतिभा म्हणतो ती देखील माणसाचा सृजन आविष्कार करणारा गुणच आहे. तोच अत्युच्च  आविष्कार माणसाला कलावंतांच्या पदापर्यंत पोचवितो. तथापि, माणूस ज्या कालखंडाचे / परिस्थितीचे अपत्य असतो, तिचा  दिर्घकालीन परिणाम त्याच्या जडणघडणीवर होतो. अगदी बालपणापासून त्याला वाढवणारे आई-वडिल, त्याची खेळणारी भावंडं, सवंगडी  तर अगदी शाळेतील शिक्षक वा मित्र यांच्या संवादातून सृजन जन्माला येते. त्याच्या कोडकौतुकाने ते वृद्घिंगत होते. जीवनानुभवाने  कलावंत त्याला आत्मभान देतो. ही जीवनञ्ृष्टीच त्या कलावंताचे तत्त्वज्ञान असते. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही अनेक  कलावंतांनी जगप्रसिद्घ कलाकृती निर्माण केल्या. खरे तर जगातील बहुतेक सर्व संस्कृतीमधील कलेचा पाया-पीडित, शोषित, गरीब वर्गातील  लोकांनीच रचला आहे. मराठीतील लोककला, साहित्य, शिल्पचित्र, वाद्य, संगीत याचे निर्माते बहुजन समाजातील प्रतिभावंत आहेत. त्यांना  परिस्थितीने कलावंत बनवले. माझा मित्र श्रीधरबद्दल असाच काहीसा मी विचार करतोय.
साठोत्तरी मराठी साहित्यामध्ये उद्यमान झाले त्या परिवर्तनवादी साहित्य प्रवाहाचे तारुण्य सत्तरीच्या दशकात आपणास  अनुभवायला मिळाले. नियतकालिकांच्या बहराचे दशक म्हणूनही त्याकडे बघता येते. केवळ पुणे, मुंबईसारखी शहरांपुरतीच ही चळवळ  मर्यादित राहिली नाही तर सर्वदूर महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणाहून अनियतकालिके निघू लागली. दलित बहुजन वर्गातील साक्षर होऊन  नोकरी-धंद्याला लागलेली तरुण पिढी दलित साहित्य आणि अनियतकालिकांच्या चळवळीतून प्रकाशित होणार्‍या साहित्यालेखनाचा वारसा  नसणारी साक्षर पिढी लिहू लागली. अनियतकालिके प्रकाशित करु लागली. अनेक असे तरुण लेखक / कार्यकर्त्यांचे गट विविध शहरांमधून  दिसायला लागले. यामध्ये कविता, कथा, एकांकिका लिहिणारे जसे होते तसेच नाटक करणारे आणि चित्रकारही होते. सर्वांनाच आपापली  अभिव्यक्ती करण्याची प्रचंड ओढ होती आणि आपले वेगळेपण अधोरेखित करण्याची जिद्दही होती. दलित साहित्य चळवळीचा तो अटळ  असा परिणाम होता. दलित आत्मकथनांनी आपले जीवनानुभवही साहित्य विषय आहेत, आपले भोगणे, जगण्याची अभिव्यक्ती कविता होऊ  शकते असा आत्मविश्र्वास खेड्यापाड्यातून, पूर्वी कधीही साहित्य न लिहिलेल्या वर्गातून आलेल्या सुशिक्षित तरुणांमध्ये निर्माण केला.  स्वातंत्र्याकडून खूप अपेक्षा बाळगणार्‍या जनतेचा स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन दशकांतच भ्रमनिरास झाला आणि त्यातुनच प्रस्थापित  व्यवस्थेविरोधात बंडखोरी उदयाला आली. दलित शोषितांमधील पहिल्या-वहिल्या साक्षर पिढीने आपल्या बहुआयामी अभिव्यक्तीद्बारे या  खदखदीला वाट मोकळी करून दिली. सर्वांना सर्वच गोष्टींचे आकलन होत होते असे नाही; पण व्यक्त होण्याचे नवनवीन प्रयोग/पर्याय  सर्वांना खुले झाले होते आणि हे लोक मोठ्या शहरांपासून तालुक्याच्या गावापर्यंत पोहोचले होते.
अहमदनगर तसे ऐतिहासिक असले तरी मोठे गावच म्हणावे असे शहर आहे. घ्ज्ञानोदयङ ची मोठी परंपरा या शहराला आहे;  पण स्वातंत्र्योत्तर काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांनी सक्रिय सहाय्यातून दीर्घकाळ टिकवलेली ही परंपराही खंडित झाली. सत्तरीच्या दशकात  शहरात तीन महाविद्यालये स्थापन झाली. याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नगरची नाट्य चळवळ व अनियतकालिकांची वाङ्मयीन चळवळ  सुरू केली, असे म्हणता येईल. सरकारी नोकरी करणार्‍या कथा, कविता लिहिणार्‍या व चित्रकलेची प्रतिभा लाभलेल्या श्रीधरसारख्या  कलावंताचे या सर्व सांस्कृतिक चळवळीला सक्रिय मदत केली.
श्रीधर विदर्भातला. पोस्टातील नोकरीच्या निमित्ताने याच कालखंडात तो इथे नोकरीसाठी आला आणि आज पस्तीस वर्षे  झाली तो कायमचा नगरकर झाला. नगरमधून प्रारंभी सुरू झालेल्या ‘दिंडी’ मध्ये तो होता. कवी अरुण शेवते हा धडपड्या तरुण यात  आघाडीवर होता. त्यानंतर मात्र सबकुछ श्रीधर अंभोरे असे सर्वांना म्हणणे भाग पडावे असेआदिम’नावाचे अनियतकालिक नगरमधून  सुरू झाले. तेव्हाचे नाट्यकर्मी व प्रसिद्घ कलाकार सदाशिव अमरापूरकर यांच्या सक्रिय सहभागाने आदिम’ लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख  शहरांमध्ये व प्रसिद्घ लेखक-कलावंतांपर्यंत पोहोचले.
‘आदिम’ चे म्हणून खास असे काही वेगळेपण होते. त्याचा आकार सायक्लोस्टाईल पेपरच्या आकाराचा होता. दुसरे ते  पूर्णपणे हाताने टेन्सिल पेपरवर लिहिलेले, टेन्सिल पेपरवरच रेखांकने व चित्रांनी सजविलेल्या सुंदर हस्ताक्षरांतील चक्रमुद्रांकित  अनियतकालिक होते आणि हे सर्व टेन्सिल्स स्वहस्ताक्षराने व रेषांनी वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणारा कलावंत होता श्रीधर अंभोरे. वास्तविक  घ्आदिमङ च्या अंकाचा आकार जाणीवपूर्वक वेगळेपण जपण्यासाठी निवडलेला नव्हता, तर छापखान्यातून अंक छापून घेण्यासाठी मुबलक  पैसा कुणाकडेच नव्हता. मग पोस्टात काम करता करता, टेन्सिल पेपरवर रेघोट्या करून त्याला चक्रमुद्रांकित करण्याची अफलातून  शक्कल श्रीधरने लढवली. कोंड्याचा मांडा बनवण्याची कला त्याने जगण्यातूनच आत्मसात केली असावी. अकोला जिल्ह्यातील एका लहान  गावातील गावगाड्याबाहेरील वस्तीतून श्रीधर आलेला. दारिद्र्य पाचवीलाच पुजलेले. काटेरी बोरी-बाभळीचे बन भोवताली आणि डोक्यावर  कुडवाशाचे छप्परवजा घर. ह्या सार्‍या पारंपारिक साज-रिवाजातच त्याचे बालपण गेलेले. अशातच तो कसाबसा मॅट्रिकपर्यंत शिकला अन्‌  पोटापाण्याच्या गरजेपोटी पोस्टात क्लार्क म्हणून नोकरीला लागला. प्रारंभी, प्रथमच शिक्षण मिळालेल्या बहिष्कृत वर्गातील पहिल्या पिढीचा  मी उल्लेख केला, श्रीधर त्या काळाचा प्रतिनिधी आहे. या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने एक आत्मभान दिले. त्यातही  विदर्भामध्येच दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या धर्मांतराने समग्र दलित समाजामध्ये स्वाभिमान जागृत केला. पिढ्यानपिढ्यांचे देवधर्म फेकून  देऊन दलित समाज धम्माधीन झाला. ह्या क्रांतिकारक चळवळीने या सर्व शिक्षित तरुणांच्या सृजनामध्ये विद्रोह, नकार, विज्ञाननिष्ठा आणि  समतेसाठीचा अविरत संघर्ष उगवला. त्यांच्या कथा, कवितांमधून, स्वकथनांतून, नाटकातून आणि चित्रांतूनही तो प्रतिबिंबित होत राहिला.  श्रीधरची रेखाटने त्याला अपवाद राहिली असती तरच नवल ! श्रीधर खरे तर एका सशक्त रेषेचे नाव आहे. तो जरी त्याला रेघोट्या  म्हणत असला तरी त्याचे एक आत्मभान त्याच्या रेखाटनांमधून आणि चित्रामधून सतत डोकावताना आपल्याला दिसते. त्याच्या  अभ्यासूवृत्तीने कुठल्याही पारंपारिक कला महाविद्यालयात न जाताही त्याची रेषा सशक्त बनलेली आहे. त्याच्या सर्व रेखाटनांमधून चेहरा  हरवलेली, लहान आकाराचे डोके असणारी मानवी आकृती ही खास त्याचीच आहेत. लग्न नाकारून आयुष्यभर कलेचा ध्यास घेतलेला  श्रीधर त्याच्या चित्रातून सहजच लक्ष वेधून घेतो.
या कालखंडात घ्आदिमङ शिवाय महाराष्ट्रातील असंख्य नियतकालिकांमधून श्रीधरची रेखाटने प्रसिद्घ होऊ लागली. अनेक  लेखक, कवींच्या पुस्तकांची मुखपृष्ठे श्रीधरने तयार केली. श्रीधरचे मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकातील अवघा आशय. पुस्तक हातात घेताच  वाचकाला जाणावे असे प्रियांबलच ! घ्माझे क्रांतिपर्वङ अन्‌ घ्टाचा टिभाङ ची मुखपृष्ठे श्रीधरनेच केलेली आहेत. चांभाराच्या आरीला  लागलेला लेखणीचा आकार आणि अनंत अवकाशात झेपावलेले आरीलाच उगवलेले शक्तिशाली पंख केवळ अद्भूत अशीच कल्पना आहे.  श्रीधरने टिंबांचा वापर करून अनेक रंगांत हे मुखपृष्ठ बनवलेले आहे. केवढे कष्ट ! पण चळवळीतील लेखक, कवी मित्रांसाठी श्रीधर  आयुष्यभर हे करीत आलाय . कारण तो स्वत:च कायमस्वरूपी एक चळवळ झालेला आहे.
पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, गंगाधार पानतावणे आदींच्या नजरेत भरलेलया श्रीधरला फाय फौंडेशनसारखा महत्त्वाचा  पुरस्कार मिळाला. तेंडुलकरांनी दूरदर्शनवर ‘दिंडी’ चा एक एपिसोड श्रीधरवर केला. त्याच्या अनेक मुलाखतीही दूरदर्शनवर झाल्या.  तथापि, त्याच्या वागण्या-बोलण्यात काही फरक पडल्याचे मागील तीस-पस्तीस वर्षांच्या आमच्या सहवासामध्ये मला कधी जाणवले नाही.  माझ्या बहुतेक कवितांचा पहिला वाचक तोच असतो त्याची पसंती-नापसंती दर्शविण्याचीही एक मुलखावेगळी रीत आहे. त्याची  साहित्याची समज एवढी उजवी आहे की सहसा तो फारसे कौतुक करण्याच्या भानगडीत पडत नाही. संथपणे हे अधिक चांगले कसे झाले  असते, कुणा लेखकाने काय सकस लिहिले आहे अशा न दुखावता हळुवारपणे गप्पा करीत आपले मत नोंदवतो. आपल्याला जे लिहिले ते  पुन्हा विचारपूर्वक लिहिण्याची संधी श्रीधरने दिलेली असते.
श्रीधर एकटा राहतो, त्याने काही लिहावे असे अनेकदा वाटते; पण त्याचा प्राधान्यक्रम मनाजोगते वाचन, नवनव्या निसर्ग  सान्निध्यातील स्थळांचा प्रवास, मित्रांसोबतच्या सहली आणि मूड जमला तर रेखाटने असाच असावा, असे माझे मत आहे. काढलेली चित्रे  जपून ठेवावीत, प्रदर्शनात मांडावीत असा पझेसिव्हनेसही त्याच्याकडे नाही. नव्याने लिहिणारे मित्र करावेत, फारतर त्यांच्यासाठी रेखाटने  करावीत, माणसं जोडावीत, स्नेहाने जपावीत हाच त्याचा स्वभाव आहे. म्हणून माझ्यासारख्या असंख्य मित्रांच्या कुटुंबातील श्रीधर एक  सदस्य असतो. लहान मुलांचा तो स्टोरीवाला बाबा असतो, तर कसलेही खाण्याचे पदार्थ असू देत तो त्यांचा प्रचंड पंसंशक असतो. त्यामुळे  तो सर्वांनाच हवाहवासा असतो.
स्वातंत्र्यासोबतच जन्माला आलेल्या, साठोत्तारी सांस्कृतिक विभ्रमामध्ये योगदान करणार्‍या आणि समग्र मानवी कल्याणाचा  कलेच्या माध्यमातून ध्यास घेतलेल्या पिढीचा श्रीधर प्रतिनिधी आहे. या पिढीने मैत्र जन्माला घातले. आपल्या सामाजिक बांधिलकीने  आत्मभान सजवले. स्वाभिमानासाठीचा संघर्ष जिवंत ठेवला. नव्या आर्थिक धोरणाने मोडकळीस आलेले कल्याणकारी राज्याचे स्वप्न  उध्वस्त होताना नव्वदनंतर बघण्याचे दुर्भाग्य ह्याच पिढीवर आहे. तथापि, नव्वदोत्तरी साहित्य व्यवहारामध्ये त्याचे पुरेसे प्रतिबिंब  उमटताना दिसत नाही. वास्तविक दीर्घकालीन सामाजिक संघर्षातून लाभलेली संवैधानिक जीवनमूल्ये उद्ध्वस्त होत असताना आणि  भांडवलदारांचा फॅसिझम प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने प्रस्थापित केला जात असताना टक्कर देऊ शकेल असा साहित्यिक/सांस्कृतिक  उठाव जन्माला येत नाही ही खंतही श्रीधरची पिढी अनुभवते आहे. तथापि, हे सर्वच श्रीधर केवळ परिस्थितीचे मूक साक्षीदार होण्याऐवजी  नव्या हायटेक पिढीच्या हातात त्यांनी जपलेला वारसा नव्या स्वरूपात सोपवतील, अशी आशा करूयात, त्यासाठी त्यांना दीर्घायुरोग्य  लाभावे, अशी खबरदारी तर घ्यावीच लागेल. डोक्याची पूर्ण वाढ झालेल्या आणि स्वत:चा चेहरा सापडलेल्या माणसाचे चित्र श्रीधरकडून  अजून काढून व्हायचे आहे. आपण सर्व जण त्यासाठी आतुरलेले आहोत, असे मला वाटते.