ललाट रेषा : शशिकांत शिंदे

                                                       
मी नुकताच नव्यानं लिहू लागलो होतो. पांढर्‍यावर काळं करणं हीच सुरुवातीची अवस्था होती. १९९३-९४ चा तो काळ होता.  त्याच वर्षी चित्रकार श्रीधर अंभोरे यांना इचलकरंजी इथून देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा फाय फाऊंडेशन पुरस्कार मिळाला.  वर्तमानपत्रातून त्यांच्याविषयी वाचत होतो. तोपर्यंत त्यांना बघितलेलंही नव्हतं. त्यांच्याशी परिचय व्हावा असं मात्र मनापासून वाटत होतं  आणि तो योग लवकरच जुळून आला.
कोरगावला डॉ. सतीश मेहता नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. ते आता या जगात नाहीत. कवितेचे निस्सीम चाहते होते.  चांगल्या कवितेसाठी, कवींसाठी जीव टाकणारा हा गृहस्थ, दरवर्षी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ एका कविसंमेलनाचं आयोजन करायचा.  महाराष्ट्रातून कवींची मांदियाळी उपस्थित व्हायची. एका साध्या पोस्ट कार्डवर निमंत्रण जायच. तेवढं पुरेसं असायचं. तोपर्यंत कवी एवढे  महाग आणि व्यावहारिक झालेले नव्हते. आळंदीला, पंढरपूरला जावं अशा श्रद्घेनं कवी रसिक हजर व्हायचे. अहमदनगरहून नित्यनेमानं एक  ग्रुप यायचा. त्यांच्यात अंभोरे असायचे. मी पहिल्यांदा अंभोरेंना पाहिलं ते तिथं. परीटघडीचा पांढराशुभ्र पोशाख, ठसठसीत काळा वर्ण,  चेहर्‍यावर मंद हास्य, जणू अजिंठ्यातलं एखादं शिल्प जिवंत होऊन इथं चालत आलं की काय? त्यावर्षी मी त्यांना दुरून दुरूनच न्याहाळत  राहिलो. मी सादर केलेल्या कवितेला संमिश्र दाद मिळाली. माझ्या प्रयत्नांकडे अंभोरे कौतुकभरल्या नजरेनं पाहताहेत ही गोष्ट मला त्या  वर्षीच्या कविसंमेलनात दिलासादायक वाटली. तेवढं व्हिटॅमिन माझ्यासाठी पुरेसं होतं. ती ऊर्जा घेऊन मी कोरे कागद अधिकाधिक काळे  करायला लागलो. त्यादरम्यान शिक्षण चालू होतं. अभ्यास करता-करता थोडंबहुत लिहीत होतो. अंभोरेंच्या कौतुकभरल्या नजरेच्या प्रेरणेचा  दिवा माझ्या उशाला अखंडपणे तेवत होता. फार कुठली कविसंमेलनं वाट्याला येत नसल्यामुळं डॉ. मेहतांच्या मैफलीची मी आवर्जून वाट  बघायचो. अंभोरे आणि नगरच्या ग्रुपच्या भेटीसाठी मी आसुसलेला असायचो. त्यावर्षी कवयित्री अरुणा ढेरे आलेल्या होत्या. कविसंमेलनाला  चांगलीच रंगत आलेली होती. चित्रकार म्हणून, रसिक म्हणून आलेले अंभोरे मन:पूर्वक कविता ऐकत होते. कुणीतरी त्यांनाच कविता सादर  करण्याचा आग्रह केला. याबाबतीत मागं-मागं राहणारे अंभोरे अजूनच मागं सरकले. शेवटी अरुणा ढेरेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनी त्यांची  घ्साजन ओला ओलाङ ही कविता गाऊन सादर केली. अंभोरे कविताही लिहितात हा नवाच शोध मला लागला. त्यांच्या धीरगंभीर, नादपूर्ण  आवाजानं माझ्या अंत:करणात जाऊन बसला. पुढं वारंवार अंभोरेंच्या भेटी घडत गेल्या. ओळखीचं गाढ स्नेहात रूपांतर झालं. ते  अविवाहित असले तरी त्यांचा परिचय महाराष्ट्रभर पसरलेला आहे. जिथं जातील तिथं ते आनंदाचीच रुजुवात करतात. जाहीर कार्यक्रमात  तोंडाला कुलूप घालून  बसलेले अंभोरे खाजगी मैफलीत फुलून येतात. भेटलेल्या माणसांविषयी, घडलेल्या प्रसंगाविषयी त्यांची एकपात्री सुरु  होते. सोबत वर्‍हाडी भाषेचा चविष्ट ठेचा असतो. समोरच्यांचं हसून-हसून पोट दुखायला लागतं. अंभोरे लौकिक अर्थनं फार शिकलेले नाहीत;  परंतु त्यांचा गृहपाठ पक्का आहे. त्यांचं निरीक्षण दांडगं आहे. समोरच्याच्या मनातल्या भावना त्यांना चटकन समजातात. मनकवडे  आहेत. इथून तिथून वर्‍हाडी असणारे अंभोरे नोकरीच्या निमित्तानं नगरमध्ये आले. नगरच्या मातीत एवढे घट्ट रुजले की ते नगरचेच  झाले. नगरमधल्या साहित्य चळवळींचे ते प्रेरणास्त्रोत आहेत. पोस्ट म्हटलं की मला स्टॅम्प, शिक्के, डिंक आणि पत्र या गोष्टी नजरेसमोर  येतात. या अरुंद खिडकीतून कुठलीही शंका व प्रश्नावर खेकसणारा कर्मचारी भेटत राहतो. अंभोरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांना तिथं  भेटायला जाताना हे सगळं मनात यायचं. काम हातावेगळं केलं की कोरे कागद पुढ्यात ओढून अंभोरेंचं खरं काम सुरू व्हायचं. त्यांच्या  कितीतरी रेखाचित्रांनी पोस्टात जन्म घेतलेला आहे.
कुठल्याही कलावंताला कलेचं अदृश्य असं सहावं बोट असतं. त्यांची कला दिसामासांनी वाढत जाते. परिपक्व होते. कवीला  त्याची शब्दकळा सापडते. गायकाला स्वर प्राप्त होतात. चित्रकाराला त्याची रेषा गवसते. अंभोरेंना त्यांची अशी स्वतंत्र रेषा गवसलेली आहे.  अमर्याद पसरलेली जमीन, अथांग सागर, वरचं निळंभोर आकाश हा त्यांचा कॅन्व्हास आहे. त्यांच्या रेषेला कुठलचं असं बंधन नाही. ती  मनमुक्त आहे. स्त्रीच्या देहाचा घाट रेखावा तर तो अंभोरेंनीच. बघत राहावा असा. नजर हटत नाही. त्यांनी सजवलेले दिवाळी अंक,  पुस्तकांची मुखपृष्ठं याची साक्ष देतात. त्यांनी ज्या-ज्या गोष्टींना हात लावला त्या गोष्टींचं सोनं झालेलं आहे. घ्निशाणी डावा अंगठाङ चे  लेखक रमेश इंगळे उत्रादकर, ‘शब्दवेध’ चे संपादक दा. गो. काळे, अंभोरे आणि मी असे आम्ही गप्पा मारत बसलो होतो. विषय चित्रांवर  आला. उत्रादकर अंभोरेंच्या रेषेवर तासभर बोलत होते. त्यांनी चितारलेली झाडं, प्राणी, पक्षी, स्त्रिया आणि अवघा निसर्ग मूक असूनही  बोलायला लागतो. ही त्यांच्या रेषेची ताकद आहे. ती श्वास घेते. तिच्या बोलीत बोलते. ती आदिम आहे. ती प्रासंगिक नाही. चिरकाल  टिकणारी आहे. माणूसपणाचं तत्त्व घेऊन ती अखंडपणे धावते आहे. तिची चेतना, तिची सळसळ यावर अंभोरेंची घट्ट पकड आहे.
अंभोरे चित्रकार म्हणून जेवढे श्रेष्ठ आहेत तेवढेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहेत. याचा अनुभव मी वारंवार घेतला आहे.  सुरुवातीला पोस्टानं दिलेल्या क्वार्टरमध्ये ते राहायचे. कविसंमेलन उशिरा संपलं आणि परतीच्या गाड्या निघून गेलेल्या असल्या की  आम्ही कवी मित्र हक्कानं अंभोरेंच्या घरी जायचो. मग उशिरापर्यंत गप्पांचा अड्डा जमायचा. विषयांची कमी नसायची. सकाळी उठून  आवरेपर्यंत अंभोरेंचा चहा तयार असायचा. चहाचा आस्वाद घेऊन मग आम्ही पांगायचो, अंभोरे माणसांचे भुकेले आहेत. त्यांना माणसं  जोडायला आवडतात. त्यांच्या म्हणून काही सवयी आहेत. त्यांना स्वच्छता आवडते. नीटनेटकेपणा आवडतो. एकदा मी माझ्या एका  मित्राला बरोबर घेऊन त्यांना भेटायला गेलो. मित्रानं तंबाखूचा बार भरलेला होता. त्यांनी मला बाहेर जाऊन प्रथम थुंकून यायला सांगितलं  आणि मग त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. तो मित्रही नंतर भारावून गेला. अंभोरेंना अशा वाईट सवयींचा तिटकारा आहे. पोस्टात  असताना काऊंटरलाच डिंकाची बोटं पुसणार्‍यांना ते सौम्य भाषेत समजावून सांगत. नंतर त्यांनी तशा सूचनेचा बोर्ड करून तिथं लटकावला  होता. अजूनही ते तेवढेच शिस्तप्रिय आहत. त्यामुळं कित्येकांना ते कडक शिस्तीचे, कर्मठ वाटतात. त्यांचा स्वभाव शहाळ्यासारखा आहे.  वरून कठीण, आतून कोमल. ज्यांनी त्यांच्या अंतरंगात डोकावलंय त्यांना त्याची प्रचीती आलेली आहे. आता पुस्तक यावं असं वाटू  लागल्यावर मी कवितांचं बाड अंभोरेंकडे सुपूर्द केलं. ते म्हटले आपण याचं प्रकट वाचन करू. प्रा. डॉ. सतीश बडवे, लियाकत अली  सय्यद, रवींद्र सातपुते, संजय कळमकर यांना घेऊन आम्ही बसलो. फ्लॅट अंभोरेंचाच होता. कवितांच्या जोडीला छान खाणंपिणं झालं.  निवडलेल्या कवितांवर कवी खलील मोमीन यांनी शेवटचा हात फिरवला. अंभोरेंच्या मनात तोवर मुखपृष्ठानं आकार घ्यायला सुरुवात केली  होती. चित्रही उत्कृष्ट तयार झालं. कागद, छपाई, मांडणी सगळं त्यांनीच केलं. कवितांच्या निवडीपासून पुस्तक हातात पडेपर्यंत अंभोरे धावत  होते. ज्या-ज्या मान्यवरांना पुस्तक धाडलं त्यांनी कवितांसोबत अंभोरेंच्या मुखपृष्ठाचा, मांडणीचा आवर्जून उल्लेख केला. मी भरून पावलो.  एक दिवस त्यांनी सांगितलं की पुस्तकाच्या दोन प्रती सुनील यावलीकरांच्या पत्त्यावर पाठवून दे. मी पाठवल्या. त्यांचा कुठलाच अभिप्राय  मिळाला नाही. सावकाशीनं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं पत्रं आलं आणि त्यांनी पुस्तकात कविता स्वीकारल्याचं समजलं. निवड मंडळावर  विठ्ठल वाघांसोबत, सुनील यावलीकर होते. सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. या सगळ्या योजनेमागं अंभोरे होते. आत्मस्तुतीचा दोष  पत्करून हे सांगण्याचं कारण एवढचं की या सगळ्या प्रवासात अंभोरेच साक्षीदार होते, मार्गदर्शक होते, जवळचे मित्र होते. य अशा  अनोख्या जादूमुळे ते माझ्यासाठी जादूगार आहेत.

आता संध्येच्या प्रवाही
बुडताना डोलकाठी
किती वाटते निर्मम
सोडताना सार्‍या गाठी

या ओळी त्यांच्याकडे पाहूनच सुचलेल्या आहेत. त्यांना मध्यंतरी शारीरिक दुखण्यानं त्रस्त केलं. हातपायांना कंप जाणवायला  लागला. त्यांनी घरातली सगळी पुस्तकं कुठल्याशा वाचनालयाला सप्रेम भेट देऊन टाकली. काही दुर्मिळ अंक, काही पुराणवस्तू ऐतिहासिक  वस्तुसंग्रहालयाला देऊन टाकल्या. मिळालेल्या पुरस्कारांच्या बाहुल्याही योग्य ठिकाणी सुपूर्द केल्या. चित्रंही देऊन टाकली आणि निर्मम  झाले. हे जीवनाला समजून घेणं आहे. त्यांना अधिकचा हव्यास नाही. जे आहे त्यात ते आनंदी आहेत. चित्रकलेचं कुठलंही पारंपारिक  शिक्षण नसताना त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. लहानपणी त्यांच्या घरासमोर असलेल्या बाभूळबनाकडे  पाहत त्यांनी चित्रकलेचे धडे घेतलेले आहेत. चित्राची भाषा त्यांना अवगत झालेली आहे. माझ्या अभ्यासिकेत युवा चित्रकार कुणाल  पैठणकर यानं काढलेलं डॉ. सलीम अली यांचं रेखाचित्र मी डकवलेलं आहे. चित्राचं अंभोरेंनी केलेलं तोंडभरून कौतुक मी जेव्हा कुणालला  कळवलं तेव्हा त्याच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. इतरांच्या कलाकृतीकडे बघण्याची निर्व्याज दृष्टी त्यांना प्राप्त झालेली आहे. ते  या बाबतीत संतपदाला पोहोचलेले आहेत.
त्यांच्या एका कवितेत रेषमयी मी झाले, तो रेषांचा राजा झाला, अशी एक ओळ आहे. कविता, रेषा, जगणं जेव्हा एकमेकांत  मिसळतं तेव्हाच अशा ओळी लिहून होतात. जीवनाचा परिपाक झाल्याशिवाय अशी उत्कटता अनुभवता येत नाही. त्यांची रेष  त्यांच्यासमोर जिवंत होऊन उभी आहे आणि तिनं रेषांचा राजा हा किताब त्यांना बहाल केलेला आहे. या सोहळ्याचे तुम्ही-आम्ही सगळेच  साक्षीदार आहोत. हे आपलं केवढे भाग्य!