श्रीधर, परत एकदा उचल पालखी या दिंडीची : विलास शेळके

                                                   

श्रीधर अंभोरे या चित्रकार मित्राचा परिचय मला माझे दुसरे चित्रकार मित्र धनंजय गोवर्धने यांनी आम्ही नाशिकला घ्उद्गारङ  अनितकालिक काढत असू तेव्हा म्हणजे सन १९५५ च्या सुमारास करून दिला. तेव्हापासून गेली सदतीस वर्षे श्रीधरची व माझी मैत्री आहे.  माझ्या नोकरीच्या निमित्ताने आमच्या भेटी वारंवार होत नसल्या तरी जेव्हा होत, तेव्हा मधले दिवस-महिने-वर्षांचे अंतर नाहीसे होत असे.  सन १९९६ ते १९९९ या तीन वर्षांमध्ये माझी बदली नगरला कार्यकारी अभियंता म्हणून झाली होती. त्यावेळी आमच्या भेटी मात्र वारंवार  होत राहिल्या. तेव्हा खर्‍या अर्थने आमची जास्त ओळख झाली आणि मैत्रीचे भावबंध घट्ट विणले गेले. माझ्या नगरच्या वास्तव्यात  श्रीधरने नगरच्या साहित्यिक वर्तुळात नेले व कवी चंद्रकांत पालवे, विलास गीते, संजीवनी खोजे, नरेंद्र काळे यांच्या सोबतची कवि संमेलने  व कवितांवरील चर्चा या माझ्या काव्यसंचिताचा ठेवा बनल्या. याच काळात श्रीधरला इचलकरंजीच्या ‘फाय फाऊंडेशन’ चा प्रतिष्ठेचा  पुरस्कार मिळाला. अगदी तरुण वयात हा पुरस्कार मिळवणारा श्रीधर हा कदाचित पहिलाच कलावंत असावा. त्यावेळी नगरच्या आणि  एकूणच श्रीधरच्या साहित्यिक मित्रांनी त्याचे केलेले कौतुक मला आजही आठवते; पण या ‘फाय’ पुरस्काराने श्रीधर ‘हाय फाय’ झाला  नाही. श्रीधरचे पाय जमिनीवर होते आणि जमिनीवरच राहिले. या पुरस्कारामुळे प्रकाशात आलेला माझा मित्र नंतर अनंत पुरस्काराचा  धनी झाला; पण कोणत्याही मानाचा किंवा धनाचा लोभ न ठेवता त्याने आपली चित्रकलेची सेवा, आपली पोस्टातली रुक्ष नोकरी सांभाळून  चालू ठेवली. याच दरम्यान दूरदर्शनवर दर रविवारी होणार्‍या दिंडी या दर्जेदार कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी विजय तेंडुलकर व प्रिया  तेंडुलकर नगरला आले होते. तेंडुलकरांनी श्रीधरमधल्या चित्रकाराची “प्रतिभा’ ओळखून त्याची एक दीर्घ पण अनौपचारीक मुलाखत  घेतली आणि दूरदर्शनच्या पडद्यावर त्याची ‘प्रतिमा’रसिकांसमोर ठेवली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण त्यांनी श्रीधरच्या सरकारी  क्वार्टरमध्ये, छोट्याशा जागेत केले तर त्याच्या चित्रांच्या संबंधाने थेट गावाबाहेरील बाभूळबनातील घ्वेड्या बाभळीङ मध्ये श्रीधरला  गवसलेल्या रेषांच्या आकृतिबंधासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळींच्या झाडांमध्ये जाऊन केले. मी या चित्रीकरणाच्या प्रसंगाला  उपस्थित होतो. ते तीन दिवस तेंडुलकरांच्या सहवासात आणि प्रसिद्घी माध्यमांच्या झगमगाटात भारावलेले होते. तेंडुलकरांसारख्या दिग्गज  साहित्यिक-कलावंत श्रीधरला, त्याच्यातील कलाकाराला समजून घेत कसा फुलवत होता हे बघणे आणि आनंद सोहळ्याचा आपण एक  भाग बनून जाणे हे आम्हा मित्रांना एका पर्वणीसारखेच होते. नगरच्या वास्तव्यात श्रीधरकडे कोणी साहित्यिक, कवी  मित्र  आले  की तो  हमखास माझ्याकडे घेऊन येई, मग माझ्या घरी मित्रांसोबत साहित्य, त्यातही कवितांची घ्मैफीलङ रात्री उशिरापर्यंत रंगत असे. कवी प्रमोद  मनोहर कोपर्डे, किशोर पाठक, धनंजय गोवर्धने अशी कितीतरी त्यावेळी नवोदित असलेली मंडळी घरी येत. मूळचा वर्‍हाडचा असलेला  श्रीधर नोकरीनिमित्त नगरला आला आणि नगरचाच झाला. मुळात अबोल-शांत स्वभावाचा श्रीधर नगरच्या काहीशा रांगड्या भूमीलाच  आपली कर्मभूमी करून नगरमध्येच घर करून राहिला. नगर शहराने त्याला असंख्य सुहृद दिलेत. कविमनाचा चित्रकार अशी ओळख  दिली. त्यावेळी घ्दिंडीङ, घ्आदिमङ, घ्ओवीङ अशी कवितेला वाहिलेली दर्जेदार अनियतकालिके नगरहून त्याचे कवी मित्र व तो काढत  असत. त्यांचे संपादन, कवितेची निवड, कवितेवरीच रेखाटने, कवितेची मांडणी असे सबकुछ, तो अतिशय कलात्मकतेने करी. कवितांना त्याने  काढलेल्या रेखाटनांमुळे एक वेगळेच कलात्मक दृश्य परिमाण लाभत असे. कविमनाचे, कविता समजणारे किंवा स्वत: कवी असणारे असे  बोटावर मोजण्याजोगे धनंजय गोवर्धने, भ. मा. परसावळे यांच्यापैकीच श्रीधर अंभोरे हा कलावंत आहे. त्यामुळे त्याला चित्रकार-कवी  म्हणावे की कवी-चित्रकार? हाच खरा प्रश्न आहे.
कवितेतील शब्दांना समजून घेत, त्यातील अर्थाला न्याय देत चित्ररूप देणे वाटते तेवढे सोपे नसते. निव्वळ कोणी चित्रकार  असला म्हणजे त्याला हे जमेल असे नाही, त्यासाठी चित्रकाराजवळठ कवीचे काळीज असावे लागते, श्रीधरजवळ ते असल्यामुळे त्याच्या  रेषांमधून, त्याच्या टिंबांमधून एक आशयघन कविताच साकारत असते. रेषांच्या भावविभोर वेटोळ्यांमधून एक धूसर मानवी आकृती, एक  धूसर मानवी चेहरा दृग्गोचर होत जातो. कवितेमधल्या अगोचर भावनांना असे दृश्यरूप देण्याची ताकद त्याच्या चित्रशैलीत आहे.  त्याने स्वत:ची अशी चित्रशैली तयार केली आहे. ती इतर चित्रकारांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. या चित्रशैलीची चित्रमुद्रा त्याने असंख्य  कविता संग्रहांच्या मुखपृष्ठांवर उमटवली आहे. त्याने जणू स्वत:ची अशी वसंत अबाजी डहाके यांना अभिप्रेत असलेली चित्रलिपीच निर्माण  केली आहे. त्यामुळे पाहता क्षणीच हे रेखाटन श्रीधर अंभोरेंचं आहे, हे चित्राखालचे घ्श्रीधरङ हे नाव न वाचतादेखील चोखंदळ रसिकांच्या  सहज लक्षात येते. चित्रकलेचे कोणतेही पारंपारिक शिक्षण न घेता कोणत्याही चित्रशाळेत किंवा आर्ट स्कूलमध्ये न जाता त्याने ही कला  आत्मसात आणि विकसित केली आहे. त्याच्या मनात सतत रंग, रूप, रेषांचे विभ्रम होत असावेत, तेच त्याच्या चित्रांचे ि नर्माते किंवा  गुरू असावेत. यापेक्षा त्याचा या विषयात कोणी वेगळा गुरू नाही. एकलव्याच्या निष्ठेने त्याने एकट्याने स्वत: ही कला शिकली आहे.  त्यामुळेच मला वाटते तो स्वत:ची वेगळी शैली निर्माण करू शकला आहे. त्याच्यावर कोणत्याही समकालीन कलावंताची छाप नाही.  कदाचित त्याचीच छाप नंतरच्या काही चित्रकर्त्यांवर उमटलेली दिसेल. अमूर्तामधून मूर्त स्वरूप घेणारी, अव्यक्तामधून व्यक्त होत जाणारी  अशी त्याची चित्रं, रसिकांना रेखा आणि टिंबामधून सतत आनंद देत आली आहेत. त्याच्या चित्रांच्या चाहत्यांचा एक कलासक्त वर्ग त्याने  निर्माण केला आहे अन्‌ हेच त्याच्या चित्र नैपुण्याचे यश म्हणता येईल. त्यामुळे साहित्य संमेलन असो की कविसंमेलन त्याच्याबरोबर  फिरताना त्याला ओळखणार्‍या असंख्य रसिकांनी त्याला, त्याच्या चित्रांना दिलेली पावती फारच मोलाची म्हणून जपून ठेवावीशी वाटते.  त्याची कलावंत म्हणून सगळीकडे फिरून, जीवनानुभव घेण्याची असोशी खरोखरीच कौतुकास्पद आहे. गप्पांमध्ये श्रीधर फार कमी बोलत  असे; पण त्याचे निरीक्षण मात्र बारकाईने असे, त्यामुळे त्याने मार्मिकपणे केलेली टिप्पणी सगळ्यांचीच दाद घेऊन जात असे. समूहामध्ये  किंवा व्यासपीठावर श्रीधर संकोचून जातो. तसा तो आजही संकोचणारा व मितभाषी आहे; पण खाजगीमध्ये तो एकदा खुलला की अशी  बहार उडवून देतो की, बस्स... त्याच्या तोंडून त्याने अनुभवलेले वर्‍हाडातील लग्नातील किस्से ऐकताना धमाल येते. घ्वर्‍हाड निघालय  लंडनलाङ च्या धर्तीवरच; पण वर्‍हाडातील वर्‍हाडी आणि वर्‍हाडातील लग्नाच्या रीतीभाती सगळ्या तपशिलासह आणि पात्रांसह तो वर्‍हाडी  बोलीमध्ये अशा उभ्या करतो की, सगळी पात्रं आपल्या भोवती फिरताहेत आणि आपल्या जणू त्या लग्न सोहळ्यामध्येच आहोत असा  भास होतो. हा किस्सा त्याने एकदा माझ्या घरी धनंजय गोवर्धने व तो जेवायला आले असता, जेवणावरून विषय निघाला म्हणून सुरु  केला आणि चक्क अर्धा तास माझी बायको, मुले, सुना आम्ही सर्वच ताटावरच कोरड्या हातांनी त्याचा हा एकपात्री प्रयोग बघत राहिलो.  अक्षरश: हसून-हसून आम्हा सर्वांची मुरकुंडी वळाली; पण श्रीधरने कसलेल्या विनोदी नटाप्रमाणे अभिनय करीत, एकेका व्यक्ती आणि  वल्लीचा आवाज काढत आम्हाला जागीच खिळवून ठेवले, वर-वर शांत, अबोल वाटणार्‍या श्रीधरचे गर्दीमध्ये देखील किती सूक्ष्म निरीक्षण  चालू असते, त्याचा प्रत्यय आला तर प्रा. लक्ष्मण देशपांडेंच्या तोडीचा एकपात्री नट त्या दिवशी आम्हाला श्रीधरच्या रूपाने दिसला !  अभिनयाबरोबरच श्रीधर आणखी एका कलेमध्ये निपुण आहे. ती म्हणजे पाककला! श्रीधर चांगला घ्खवय्याङ आहे; पण त्यापेक्षा चांगला  बल्लवाचार्य आहे. तो स्वत:चा स्वयंपाक स्वत:च करीत आला आहे, एखाद्या सुगरणीसारखा ! स्वत: केलेले पदार्थ आवडीने मित्रांना खाऊ  घालणे, हादेखील त्याचा आवडता छंद! त्यामुळे मित्रांना त्याच्या घरी नि:संकोचपणे कितीही दिवस खाता-पिता राहताही येते. श्रीधरही  एकटाच राहत असल्याने त्याला कोणी मित्र त्याच्याकडे कितीही दिवस राहिल्याची अडचण वाटत नाही, उलट त्यांच्या सहवासात तो  त्याची दु:खे विसरत असावा, खरं तर तो एकटा राहण्याचे दु:खी आहे असे कधीच वाटले नाही.
नगरहून माझी बदली पुढे लातुरला झाल्यावर नाशिकला घरी जाताना किंवा नाशिकहून लातूरला जाताना त्याच्या  आग्रहास्तव बर्‍याचदा त्याच्या घरी माझी बायको-मुलांसह जेवायला थांबत असे. सुटीचा दिवस असला की तो स्वत: मसाला वाटून तयार  करी, माझ्या बायकोने स्वयंपाकाला मदत करायचे झाल्यास घ्वहिनी तुम्ही निवांत बसा, मुलांना सांभाळा, बघा मी एका तासात सगळा  स्वयंपाक कसा करतो...’ आणि खरोखरच कुणाच्याही मदतीशिवाय तो काळ्या मसाल्याचे मटन तयार क री, त्यावेळी हिला अपराधी  वाटे; पण जेवताना पहिला घास घेतला की, त्याच्या जेवणाची चव घेताच आपण श्रीधरलाच स्वयंपाक करू देण्याचे योग्य होते असे वाटे.  मात्र, एकदा न राहवून हिने श्रीधरला स्पष्टपणे बजावले की, घ्भावजी यापुढे मी तुमच्या हातचे जेवणार नाही... तुम्ही लग्न करा तरच मी  जेवीन...ङ पण श्रीधरने ही प्रेमाची धमकी मनावर घेतली नाही, त्याला स्वत:च्या हाताने केलेल्या स्वयंपाकाची एवढी चव लागते की  दुसर्‍याच्या हाताच्या चवीलाच जणू नाकारते !
एक कलावंत म्हणून श्रीधर श्रेष्ठ आहेचं; पण एक मित्र म्हणून माणूस म्हणूनही तो तितकाच श्रेष्ठ आहे. कलेच्या प्रांतामध्ये  तो निखळ म्हणूनच जसा जगत आला आहे, तसाच या व्यवहारी जगात देखील निखळ माणूस म्हणून ! त्याने कधी कुणाची बरोबरी  केली नाही कुणाचा हेवा ! तो दुसर्‍यांच्या दु:खात सहभागी झाला तसा आनंदातही. स्वत: अविवाहित राहुन त्याने दुसर्‍यांच्या संसाराची  काळजी वाहिली. कलंदर कलावंत असूनही दुनियादारी पार पाडली. तो माझ्या लग्नाला आला, तसाच माझ्या मुलांच्याही  लग्नाला स्वत:  जातीनं हजर राहिला. धनंजय गोवर्धने या चित्रकार-कवी मित्राचा तर तो कुटुंबाचाच एक झाला. धनंजयच्या घरी तो नाशिकला येतो, तेव्हा  त्याच्या बायको-मुलांमध्ये रमतो. तेव्हा तो कवी किंवा चित्रकार नसतो. सौ. छाया वहिनींचा दीर म्हणून तर मुलांचा आवडता काका  म्हणून तो कित्येक वर्षे त्यांची काळजी घेत आला आहे. त्याच्या कुटुंबाच्या सुखदु:खात तो सहभागी होतो. अडी-अडचणीला हजर राहतो.  मित्रांना मदत करताना तो त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य होऊन जातो. तो कार्यक्रमास व्यासपीठाची जशी सजावट करतो तशी  सतरंजी, पाट उचलण्यालाही हात लावतो. अविवाहित राहून एकटेपणाने कामे करण्याची त्याची सवय, कदाचित स्त्री-पुरुषांमधील कामांची  विभागणी करू देत नाही. त्यामुळे एखाद्या निपुण गृहिणीसारखे तो स्वत:चे घर तर ठेवतोच; पण तत्परतेने दुसर्‍यांना मदत करायला  सरसावतो. जगण्याची लढाई जिंकण्यासाठी श्रीधरने पोस्टाची नोकरी धरली आणि इमाने-इतबारे केलीदेखील; पण वेळ येताच कलेची सेवा  करून स्वत:ला पूर्णपणे व्यक्त होण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ती तितक्याच हिमतीने सोडलीदेखील ! मात्र, गेली काही वर्षे माझा हा मित्र  पाठदुखीच्या आजाराने जायबंदी झाला, या दुखण्याने त्याच्या हातातील पेन, पेन्सिल, ब्रश गळून पडला याचेच दु:ख जास्त झाले; पण  जगण्याचा श्र्वास झालेल्या चित्रांनी त्याला पुन्हा हिंमत दिली, त्याने या दुखण्यावर मात करून परत एकदा पेन्सिल उचलली आहे.  त्याच्या रेषांच्या वलयांकित दुनियेत परत एकदा हरवून जाण्यासाठी... त्याला यापूर्वी असंख्य पुरस्कार मिळाले असले तरी आता या सेकंड  इनिंगच्या सुरुवातीला मिळणार्‍या अशा पुरस्कारांमुळे त्याचे या रेषा-चित्रांच्या सोबतचे नाते आणखी दृढ होईल आणि त्याच्या कलेचे  नवोन्मेष आपल्यासारख्या त्याच्या रसिक मित्रांना कायमच आनंदाचे विधान ठरतील !