संवेदनशील माणसांच्या काळजाचा घड, रेषांचा किमयागार गेला! : श्रीकृष्ण राऊत


 संवेदनशील माणसांच्या काळजाचा घड, रेषांचा किमयागार गेला!

- श्रीकृष्ण राऊत

प्रसिद्ध कवी आणि गझलकार

.

श्रीधर अंभोरे चित्रकार, कलावंत होते. त्यापेक्षाही त्यांचा भला मोठा गोतावळा होता. त्यांच्या रेषेवर जीव ओवाळून टाकावा, अशी किमया त्यांच्या बोटात होती.


श्रीधर अंभोरे नावाचा जिवाभावाचा मित्र गेला.. ते चित्रकार होते. कलावंत होते. त्यापेक्षाही त्यांचा एक भला मोठा गोतावळा होता. त्यांनी महाराष्ट्रभर शेकडो मित्र जोडले. त्या सर्व मित्रांच्या कुटुंबाचा ते 'घरचा माणूस' झाले होते. त्यांच्या रेषेवर जीव ओवाळून टाकावा अशी किमया त्यांच्या बोटात होती. पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे अशी थोर मंडळी त्यांच्या रेषेच्या प्रेमात पडली.


मुंबई दूरदर्शनवरील 'दिंडी' मालिकेत विजय तेंडुलकरांनी त्यांच्या चित्रावर एक एपिसोड केला होता. आर. के. लक्ष्मण, जी.ए. कुलकर्णी, जयंत नारळीकर अशा दिग्गजांसोबत मे १९८३ मध्ये त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा फाय फाउंडेशन पुरस्कार मिळाला, तेव्हा हा चित्रकार अख्ख्या महाराष्ट्राला सुपरिचित झाला. त्यालाही त्रेचाळीस वर्षे झालीत. मधल्या काळात अनेक मित्र गेले, पण श्रीधरचं जाणं माझ्यासारख्या त्यांच्या अनेक मित्रांना चांगलंच जिव्हारी लागलं. अशा मित्रांचं जाणं आपल्या काळजाचा एक तुकडा हिरावून नेणारं असतं. त्याला कारण श्रीधरचा निरहंकारी आणि ऋजु स्वभाव. त्यांचं माझं मैत्र अर्ध शतकाचं होतं. श्रीधरची आणि माझी पहिली भेट १९७६ साली झाली. त्यावेळी ते 'आदिम' हे सायक्लोस्टाईल अनियतकालिक काढायचे.


टॅग लावण्यासाठी कागदांना छिद्र पाडण्यासाठी जो टोच्या वापरतात, त्या टोच्याच्या मदतीनं सायक्लोस्टाईलच्या पातळ पेपरवर अंकासाठी आलेल्या कविता, कथा ते लिहून काढायचे. अर्थात त्या सोबत रेखाचित्रेही असायची. हे प्रचंड ढोर मेहनतीचं काम ते आनंदाने करायचे. अंकाच्या संपादन कार्यात अहमदनगरची (अहिल्यानगर) मित्रमंडळी त्यांच्या सोबत असे. त्यात सदाशिव अमरापूरकरही होते. नंतरचे काही अंक त्यांनी छापूनही प्रकाशित केले होते. कागदावर काढलेल्या रेखाचित्रात मोकळा अवकाश महत्त्वाचा असतो. ज्यामुळे रेखाचित्र कलात्मक उंचीवर पोचतं, अभिजात

होतं. हे त्यांनी अनेकदा प्रात्यक्षिकासह आम्हाला सांगितलं होतं. अगदी छपाईतला कोणता फॉन्ट डोळ्यांना छान वाटतो, चित्रात रंग असतील तर त्यातील रंग आपल्या अंगावर येता कामा नयेत, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. साधे स्केचपेन वापरून स्टिपलिंग पद्धतीने त्यांनी काही अप्रतिम चित्रे काढली होती. हे सर्व ते अनुभवातून शिकले होते. चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं. श्रीधर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातल्या चिखलगावसारख्या लहानशा खेड्यात २१ मार्च १९४७ चा. घराच्या शेणामातीने सारवलेल्या भिंतीवर लहानपणी कोळशानं रेघोट्या काढणं, हा त्यांचा आवडता छंद. ही त्यांच्या चित्रकलेची गंगोत्री. एकोणऐंशी वर्षाच्या समृद्ध आयुष्यात त्यांनी

चित्रकलेत घेतलेली भरारी स्तिमित करणारी आहे.

अमेरिकेतील बर्नार्ड कॉलेज (कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क) येथे दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१९ ला पहिला दलित चित्रपट व सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला. त्या महोत्सवात भरलेल्या चित्रप्रदर्शनात श्रीधर अंभोरे यांच्या निवडक चित्रांचा समावेश होता. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते.


श्रीधरची पंचाहत्तरी साजरी झाली, तेव्हा महावीर जोंधळे यांनी लिहिलेले 'श्रीधररेषा' हे पुस्तक 'शब्दशिवार' प्रकाशनाने प्रकाशित केले. चित्रकलेतील अंभोरेशैलीची वैशिष्ट्ये उलगडताना महावीर जोंधळे यांनी लालित्यपूर्ण भाष्य केले आहे. झाडे, प्राणी, पशु, पक्षी, दगड असे फॉर्म वापरून श्रीधरने स्वतःची स्वतंत्र चित्रशैली निर्माण केली. त्यांच्या विविध चित्रांतून मानवी स्वभाव, विकृती, दुर्गुण आकार धारण करतात. शोषित माणसांच्या चेहरे नसलेल्या आकृत्या ही त्याच्या चित्रशैलीची खासियत. संवेदनशील माणसांच्या काळजाचा घड असलेला हा गुणी कलावंत मित्रांच्या मैफलीतून उठून गेला. मागे उरल्यात जिवाला चटका लावणाऱ्या असंख्य आठवणी आणि अनेक वाङ्‌मयीन नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक, कवितासंग्रह. कथासंग्रह, कादंबऱ्यांची त्यांनी किमया केलेली शेकडो मुखपृष्ठे..

.

दै. लोकमत / दि. ११ ऑगस्ट २० २६

मा. संपादकांचे हार्दिक आभार.