स्मरणरेषा श्रीधराची : इंद्रजीत भालेराव

 





काल दिनांक १० ऑगष्ट २०२६ रोजी थोर चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे देहावसान झाले. त्यांचे हे देहावसान इतके अचानक होते की, त्याची कधी कल्पनाही केलेली नव्हती. ना ते कधी थकल्यासारखे वाटले, ना वृद्ध वाटले. अगदी दोनच महिन्यापूर्वी जालन्याला शिवाजीराव कायंदे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो तेव्हा त्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रम संपल्यावर भेटून बोलले. माझ्या बोलण्याचं कौतुक केलं आणि नेहमीसारखं निवांत जालन्याला मुक्कामी घरी येण्याचं निमंत्रणही त्यांनी मला दिलं. गेल्या अनेक दिवसापासून ते सारखं म्हणत होते की, जालन्याला मुक्कामी या, आपण छान गप्पा मारूयात. पण ते काही जमलं नाही. माझा मुलगा चंद्रगुप्त चित्रकार आहे. त्याला पाठवून द्या, असंही ते अनेकदा म्हणाले. तो जास्त व्यस्त असेल तर मी त्याच्याकडे जातो, त्याला कल्पना द्या, असंही ते म्हणाले. पण तेही जुळून आलं नाही. चंद्रगुप्तची आणि त्यांची भेट झाली असती तर चित्रकलेच्या क्षेत्रातल्या चार हितगोष्टी आणि रेषांचे अनुभव माझ्या मुलाच्या कानावर पडले असते आणि त्याला त्याच्या चित्रकलेच्या विकासात काही मदतही झाली असती. पण आता ते कायमचं राहून गेलं.


तसे ते मूळचे अकोला जिल्ह्यातले. तिथल्या पातुर तालुक्यातील चिखलगावचे. त्यांचं सगळं शिक्षण सरकारी वस्तीगृहात राहून झालं. पुढे पोस्टात नोकरी करत, अनेक गावे फिरत ते अहिल्यानगरमध्ये स्थायिक झाले. ते जन्मभर अविवाहित राहिले. त्यामुळे त्यांना ना आगा होता ना पिछा. त्यांच्या मागेपुढे अस्तित्व होते ते केवळ रेषेचे. ही रेषा त्यांच्या आयुष्याला पुरून उरली. खरोखरच त्यांच्या मागे आता केवळ रेषाच उरली आहे, आणि त्या रेषेतून ते स्वतःही जिवंत आहेत.


ते असे सडेफटिंग असल्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी कुणाकडेही आणि कितीही दिवस राहू शकायचे. कुणी काम घेऊन जाणारा त्यांच्याकडे मुक्काम ठोकू शकायचा. त्यांनी आपले सर्वस्व रेषेला अर्पण केले होते. प्रतिभावंतांचे शब्द आणि त्यांची रेषा यांचा संसार त्यांनी आयुष्यभर मांडला आणि हा संसार त्यांनी इतक्या निरपेक्षपणे निभावला की, त्यात कुठेही, कसलीही कुरकुर आडवी आली नाही. शेवटच्या काळात त्यांनी अहिल्यानगर सोडून जालन्याला आपल्या पुतण्याकडे मायेचा आधार शोधला. कोरोना काळासापासून ते जालन्याला मुक्कामी राहू लागलेले होते.


श्रीधर अंभोरे यांची चित्रे मला फार फार आवडायची. आमच्या भ. मा. परसवाळे यांच्यानंतर त्यांची रेषा ग्रामवास्तवाला थेट भिडली होती आणि कुठल्याही रंगांशिवाय ती सर्व रंग धारण करू शकायची. त्यामुळे मला ती कायमच आवडत आलेली आहे. अहिल्यानगरला १९९७ ला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पत्रिकेपासून स्मरणिकेपर्यंत सर्व गोष्टींची सजावट त्यांनी केलेली होती. तिथपासून त्यांची रेषा ओळखीची झाली होती. नंतर अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठ आणि सजावटीचे काम त्यांनी केले. 


गेल्या काही वर्षांपासून ते आमचा मित्र इंद्रजीत घुले याच्या शब्दशिवार दिवाळी अंकाची सजावट करायचे. त्यामुळे तो दिवाळी अंक खूपच उंचीवर गेला. एकदा मंगळवेढ्यालाच इंद्रजीतमुळे त्यांची सविस्तर भेट झाली. दिवाळी अंकाच्या कामासाठी ते इंद्रजीतकडे अनेक दिवस ते येऊन थांबायचे आणि त्याला दिवाळी अंकाचे सगळं काम करून द्यायचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजूबाजूला कुणी महत्त्वाचं काही काम करतो आहे असं पाहिलं की अंभोरे सर त्याला आवर्जून मदतीला जायचे. मुळीच भाव खायचे नाहीत. त्याच्या घरी जशी परिस्थिती आहे त्याच्यात सहभागी होऊन तिथे मुक्काम करायचे. तसेच ते इंद्रजीतकडे येऊन त्याच्या घरी सगळ्या गैरसोयी सहन करून थांबायचे आणि रात्रंदिवस त्याला अंकाचे काम करून द्यायचे. इंद्रजीतने आ. ह. साळुंखे सरांच्यावर जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर केला त्याच्या सजावटीत श्रीधर अंभोरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आणि आ. ह. साळुंखे सरांच्या गौरवग्रंथाला एक उंची प्राप्त करून दिली.


इंद्रजितनेच मग त्यांच्या चित्रकलेवर आणि रेखाचित्रांवर आधारित महावीर जोंधळे यांनी लिहिलेल्या दीर्घ मजकुराचा महत्त्वाच्या चित्रांसह 'श्रीधररेषा' हा ग्रंथ प्रकाशित केला. तो ग्रंथ मला इतका आवडला की, मी तो लगोलग नुसता वाचलाच नाही तर त्यावर एक सविस्तर टिपणही लिहिले आणि समाजमाध्यमावर ते मी प्रकाशितही केले. ते त्यांच्यापर्यंत पोहोचले का नाही याचा मला अंदाज नव्हता. पण मग त्यांचाच फोन आला की, विदर्भातल्या कुठल्यातरी कार्यक्रमात व्यासपीठावर बसल्या बसल्या यशवंत मनोहर यांनी त्यांना माझी पोस्ट दाखवली आणि वाचायला दिली. त्यानंतर ते मला अधून मधून फोन करू लागले.


एकदा कोल्हापूरकडून परभणीला येण्यासाठी सोलापूरकडे निघालो होतो. जेवण कुठं करावं हा विचार करत करत मंगळवेढा आलं आणि मंगळवेढ्याच्या पुढे सुगरण नावाचं एक चांगलं हॉटेल दिसलं. त्या हॉटेलजवळ थांबलो. जेवणाची ऑर्डर दिली आणि मंगळवेढा जवळच असल्यामुळे तिथला इंद्रजित घुले हा माझा कवीमित्र घरी असेल तर त्याला बोलवूयात, गप्पाटप्पा करता येतील, म्हणून त्याला सहज फोन केला, मी सुगरणवर थांबलोय, येतोस का ? तो म्हणाला, आलोच सर. तो आला आणि सोबत श्रीधर अंभोरे सरांनाही घेऊन आला. कारण दिवाळी अंकाच्या तयारीचे दिवस होते आणि ती तयारी करून देण्यासाठी अंभोरे सर त्याच्याकडे येऊन थांबलेले होते. सहाच महिन्यापूर्वी मी त्यांच्या श्रीधररेषांवर लिहिलेलं होतं. पण सरांची सविस्तर भेट कधी झाली नव्हती. एक दोनदा धावती भेट फक्त झालेली होती. माझे काही भलेबुरे वाचून त्यांनी फोनवर काही बोलले होते, तेवढेच. अकल्पितपणे सर आल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला. आम्ही सोबत जेवलो. त्यादरम्यान खूप खूप बोललो. साहित्यावर, संस्कृतीवर, चित्रकलेवर आमची खूप छान आणि समृद्ध चर्चा झाली. इंद्रजितचे मी लाख लाख आभार मानले !


सर अधून मधून रंगीत चित्रे काढत असले तरी प्रामुख्याने काळ्या रेषांमध्ये काढलेली त्यांची चित्रे जास्त प्रमाणात असायची आणि ती जास्त चांगलीही दिसायची. जणू काळ्या रंगाचे त्यांना वेडच होते. जसा त्यांचा स्वतःचा रंग तोच होता. पण सर कपडे मात्र शुभ्र पांढरे घालत असत. त्यांना मी रंगीत कपड्यात कधीही पाहिलेलं नाही. काळ्या सावळ्या वर्णाचे सर शुभ्र पांढरे कपडे घालायचे तेव्हा ती रंगसंगती खूपच शोभून दिसायची. त्या शुभ्रधवल कपड्यांमुळे त्यांचे मनही कसे तसेच शुभ्रधवल आहे हे त्यांच्याशी बोलताना आणि त्यांना अनुभवताना आपल्या सहज लक्षात यायचे.


मागच्या काही वर्षात दिवाळी अंकातून मी लिहिलेला आत्मकथनात्मक मजकूर वाचून ते अधून मधून मला फोन करायचे. या सगळ्या लेखांचे पुस्तक होईल तेव्हा आपण त्याची सुंदर सजावट करू, असं म्हणायचे. माझ्या लेखनासाठी मला तो पुरस्काराच वाटला. मी ठरवले होते की, या ग्रंथाची सगळी जुळवाजुळव करायची आणि जालन्याला सरांकडे जाऊन काम पूर्ण होईपर्यंत मुक्काम ठोकायचा. नाहीतर सरांना परभणीला माझ्या घरी बोलावून घ्यायचं आणि निवांत काम करायचं. पण आता ते कायमचं राहून गेलं. इच्छा असूनही माझ्या कुठल्याच पुस्तकाला मला त्यांची रेषा वापरता आली नाही. पण माझं सुदैव असं की १९८९ साली माझ्या पहिल्या पुस्तकाला मिळालेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्टच्या पुरस्काराच्या सन्मानपत्रावर सगळी सजावट श्रीधर अंभोरे यांनी केलेली होती. मला हे फार आवडलं. माझ्या कविता संग्रहाचा सगळा आशय वर चित्रात आणि खाली थोडक्यात मानपत्र, त्यामुळे माझी कविता सन्मानित झाली, असंच मला वाटलं. 


💐