.
सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांचा आणि माझा परिचय खूप उशिरा म्हणजे २००१ साली झाला. यशवंतराव चव्हाण साहित्य प्रतिष्ठान व गंगा लॉज मित्र मंडळ, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार माझ्या ‘वादळातल्या प्रवासात’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला होता. तो स्वीकारण्यासाठी मी गेलो होतो, तेव्हा टिळक स्मारक मंदिर खच्चून भरलेले होते. मंचावर सुशीलकुमार शिंदे, बबनराव पाचपुते, रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे इत्यादी राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी होती. प्रेक्षकांतही सारे नामवंत उपस्थित होते. अतिशय देखणा असा तो कार्यक्रम होता.
कार्यक्रम संपल्यानंतर साऱ्यांच्या भेटीगाठी आटोपल्यावर कडक इस्त्री केलेले सुती कपडे घातलेली, राजकारणी वाटावी अशी एक व्यक्ती भेटायला आली. ती म्हणाली, "मी श्रीधर अंभोरे. नगरला लवकर पोहोचायचे आहे. पुन्हा कधीतरी सविस्तर भेटूच. तुमचे अभंग आणि कविता मात्र अस्वस्थ करून गेल्या." आणि पाहता पाहता शिरूभाऊ निघूनही गेले—नंतरच्या खाद्य, मद्य आणि पद्य उत्सवाला न थांबता.
खरं तर पुरस्कार मिळालेल्या माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरूभाऊंचेच होते. त्यामुळे माझी नी त्यांची पूर्वओळख असायला हवी होती, पण नव्हती. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी कवी लोकनाथ यशवंत त्यांच्याजवळ माझ्या कवितेविषयी बोलले होते. त्यानंतर प्रेमात पडावे अशा सुंदर हस्ताक्षरात शिरूभाऊंचे एक लहानसे पत्र आले. त्यांनी माझ्या कविता अवलोकनार्थ मागितल्या होत्या. मी अर्थात कविता पाठवल्या नाहीतच; उलट मी माझ्या कवितांच्या बाबतीत कसा असमाधानी आणि उदासीन आहे, हे त्यांना कळवले. मी माझ्या कवितेच्या बाबतीत जे काही चिंतन मांडले, त्याला दाद म्हणून लगेचच त्यांचे पुन्हा पत्र आले.
पुढे १९९७ साली नगर येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात मी ‘काव्यसंवर्धन पत्रिकेचा’ ‘मांडवाबाहेरच्या कविता’ हा विशेषांक प्रकाशित केला. त्यावेळी त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही. मी खूप निराश झालो आणि तेव्हाच निश्चय केला की, काहीही झाले तरी जेव्हा केव्हा आपण काव्यसंग्रह प्रकाशित करू, तेव्हा मुखपृष्ठ घ्यायचे ते श्रीधर अंभोरे यांचेच!
त्यावेळी ते सतत व्यग्र असायचे. पोस्टातील नोकरी, तसेच हंस, साधना, राजस अशा प्रतिष्ठित दिवाळी अंकांसाठी रेखाटने; अनेक ग्रंथांसाठी रेखाटने आणि मुखपृष्ठे—असे त्यांचे काम सुरू असायचे. शिवाय सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि कवयित्री संजीवनी खोजे यांच्यासोबत ‘दिंडी’ हे अनियतकालिकही ते काढायचे.
त्यावेळी नगरमध्ये अनुवादाच्या क्षेत्रात विलास गीते, कवी व संपादक अरुण शेवते आणि शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे इत्यादींचे उपक्रम जोरात सुरू होते. शिरूभाऊ या सगळ्या चळवळींमध्ये मागे राहून पुढे असत. होय, पुढे-पुढे करणे त्यांना कधीच जमले नाही; कॅमेऱ्याची अलर्जीच होती जणू त्यांना! थोर नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या घरी जाऊन, चित्रीकरण करून त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री फिल्म काढली. तेव्हाही ते शांतपणे जमेल तेवढी त्यांना मदत करत होते (नाइलाजाने).
स्वतःविषयी ते कधीही कोणाला फारसे काही सांगत नाहीत. अत्यंत संकोची आणि मितभाषी असा त्यांचा स्वभाव आहे. पण आमच्यासारख्या मोजक्या मित्रांमध्ये ते फारच खुलतात. ते अखंडपणे बोलत असतात आणि घरातील लहान-थोर मंडळी तल्लीन होऊन ऐकत असतात. आम्ही अनेकदा त्यांना म्हणतो, "तुम्ही एकपात्री प्रयोग सुरू करा, तुफान चालेल!" त्यांच्याकडे सहज-सुंदर अशी कथनशैली आणि अनुभवाचे समृद्ध रसायन आहे; पण हे सारे खाजगी मैफलीपुरतेच मर्यादित आहे.
शिरूभाऊंनी मित्रपरिवार वाढू नये याची फार काळजी घेतली असावी. म्हणूनच त्यांचे चाहते शेकडो असले, तरी मित्र मात्र मोजकेच आहेत. शिरूभाऊंना घर असले तरी कुटुंब नाही. लग्न न करण्याचे खास असे काही कारण नाही—राहून गेले, एवढेच!
पोस्टातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्रभर ते सारखे फिरत असतात. ते जिथे रमतात अशी घरे फार थोडकी आहेत. कल्याणचे प्रसिद्ध नाटककार वामन पतके, नगरचे रवींद्र सातपुते, छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) डॉ. सतीश बडवे, जालन्याला वहिनी व पुतणे, अकोल्याला डॉ. श्रीकृष्ण राऊत, अमरावतीला मी आणि यावलीकर, व शेवटी नागपूरला लोकनाथ यशवंत... असा त्यांचा दिनक्रम असतो. वर्षातून चार-पाच वेळा हे घडत राहते.
याला कारण त्यांचे मूळ गाव—अकोला जिल्ह्यातील चिखलगाव. हे प्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार बाजीराव पाटील (थोरात) यांचेही गाव! या गावाला ते नियमित भेट देत राहतात, म्हणूनच आमच्याही भेटी घडतात. ते दौऱ्यावर आले की आमच्यापेक्षा आमच्या बायका- मुलांनाच जास्त आनंद होतो; कारण आल्यावर प्रथम ते स्वयंपाकघरावर पूर्ण ताबा मिळवतात. बायकांना आराम मिळतो म्हणून, मुलांना नवलाईचे पदार्थ खायला मिळतात म्हणून आणि आम्हाला त्यांच्या निमित्ताने प्यायला मिळते म्हणून सारेच आनंदी असतात. मग रात्रभर आमच्या गप्पा आणि धुरांची वलये...
