मुखपृष्ठकार तो आदिमतेचा : सुनील लोणकर


 

/

गर्कच राहिले सर्व,

व्यर्थच ठरला सगळ्यांचा  I;

ओळखीचा चेहरा

सापडलाच नाही कुणाला.


श्रीधरांच्या रेषेतून

साकारलेल्या आकृतीबंधाला

चेहराच नव्हता—

कारण माणसाची खरी ओळख

व्हायला आयुष्यही कमी पडतं,

कदाचित

हेच उमगलं असेल त्यांना.


शरीराच्या नसानसातून,

अगदी पेशी-पेशीतून

एक चैतन्याची सळसळ

भिरभिरायची त्यांच्या चित्रलिपीतून;

चित्राला त्यांच्या

कुठलीच चौकट नव्हती.


विश्वाच्या कपाळावर

गोंदली जी नक्षी त्यांनी,

रंगांचे ओघळ

आभाळभर पसरविले त्यांनी;

आत्मकल्लोळाला

सैरभैर न होऊ देता

ते जगत राहिले

एका आदिम शांततेत.


सामान्यही असतो आदिम,

असतो पुरातन,

शांत बुद्धासारखा—

दुःख म्हणजे

एक चंद्रफूल असतं,

हे उमगलं होतं त्यांना.


आयुष्यभर अविवाहित,

कलासक्त राहिले ते;

विधवा होऊ दिलं नाही

आयुष्याला—

कलेशीच नातं जपलं त्यांनी.


आणि अखेर

मृत्यूला अगदी शरण गेले ते.


आईपेक्षा आजी आठवावी,

असंच काहीसं होतं आज—

त्यांच्या कायमच्या जाण्यानं

मनाच्या एखाद्या कोपऱ्यात

एक जुनी नक्षी

पुन्हा उमटली आहे.


चित्र राहिलं,

रेषा राहिल्या,

रंग राहिले;

पण

मुखपृष्ठकार तो आदिमतेचा

कायमचा निघून गेला..

सुनील लोणकर