चेहरा नसलेल्या माणसांची चित्रं रेखाटणारा चित्रकार श्रीधर अंभोरे : सुरेश साबळे

 



       
       बहुश्रुत वाचन, बहुश्रुत चर्चा. चर्चेमध्ये कुठल्याच विषयाचे बंधन नसलेला चित्रकार श्रीधर अंभोरे अचानक आपल्यातून निघून गेला.  १० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचं अचानक निघून जाणे  साहित्य,सांस्कृतिक आणि चित्रकलेच्या क्षेत्रातल्या अनेकांना अचंबीत  करणारं ठरलं आहे. गोतावळ्यात राहिलेला परंतु संन्यस्थ वृत्तीने,फकीरी आयुष्य जगलेले श्रीधर अंभोरे कायम मित्रांमध्ये आजातशत्रू म्हणून वावरले. त्यांनी गुणदोषासह मित्रत्व स्वीकारताना कायम सकारात्मक संवाद ठेवला. हा संवाद ठेवताना श्रीधर आंभोरे हे मायेच्या ओलाव्याने संवाद साधत असत आणि निरागस बालमन घेऊन संपूर्ण आयुष्य त्यांनी परिघावरच्या माणसांशी जुळुन घेतले. आपल्या चित्रांद्वारे त्यांनी बिन चेहऱ्याची रेषेद्वारे माणसांना ओळख देत मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम केलं.
            माझी आणि त्यांची पहिली भेट ही अस्मितादर्श या नियतकालिकाच्या चित्रांमधून झालेली, त्यांची अनेक मुखपृष्ठ, ग्रंथाद्वारे दिवाळी अंकात तसेच नियतकालिकातून पाहायला मिळत होती. प्रत्यक्ष भेट अस्मितादर्शकार पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या श्रावस्ती या निवासस्थानी १९९२ मध्ये झालेली.
     *१९९२ मध्ये अस्मितादर्शला २५ वर्ष* पूर्ण झाल्यानिमित्ताने *रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन* आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या *अध्यक्षपदी अमेरिकेच्या विदुषी डॉ एलिनार झेलियट तर उद्घाटक म्हणून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर* होते. यानिमित्ताने  त्यावेळी अस्मितादर्श या आंबेडकरी चळवळीच्या वाड्मयीन नियतकालिकाच्या कार्याविषयी चर्चा करणारा मी दिर्घ लेख लिहिला होता. त्यावेळी औरंगाबाद येतील देवगिरी तरुण भारत या मराठी दैनिकाचे संपादक अहमदनगर येथुन आलेले मनोहर कुलकर्णी होते. ते सुध्दा अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीत होते. माझा लेख आदरणीय डॉ गंगाधर पानतावणे सर यांनी श्रीधर आंभोरे यांना वाचायला दिला आणि सांगितले की, हा लेख कोणात्या पेपरला पाठविता येईल. वाचल्यानंतर आंभोरे यांनी हा लेख मनोहर कुलकर्णी यांना द्यावा ते छापतील. २५ डिसेंबर १९९२ च्या देवगिरी तरुण भारतच्या साहित्य संमेलन विशेष अंकामध्ये तीनच दिर्घ लेख प्रकाशित झाले होते. त्यात माझ्या लेखाचाही समावेश होता. यानिमित्ताने आमची भेट झाली आणि त्यातून आमच्या मैत्रीचा सिलसिला सुरू झाला. यानंतर अनुवादक तथा कवी स्मृतीशेष भगवान ठग आणि मी अहमदनगर येथे श्रीधर अंभोरे यांच्या मिल्ट्रीच्या छावणी परिसरातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटलो तेथे त्यांच्या *अभिषेक अपार्टमेंट,पानसंबळ दवाखान्या- शेजारी, सावेडी रोड, अहमदनगर* या निवासस्थानी अनेक चर्चा झाल्या आणि त्यानंतर आमची मैत्री सारखी वाढत गेली. श्रीधर आंभोरे यांची जेव्हा जेव्हा भेट होत असे, तेव्हा तेव्हा त्यांचं ते निर्लस हसणं आणि वऱ्हाडी हेल देऊन बोलणं हे माणसाला मोहित करणारं असे, इतकेच नव्हे तर माणसं त्यांच्या प्रेमात पडत असत. एकदा त्यांना जुळलेला माणूस त्यांच्याकडून कधीच तुटत नव्हता.भेटलेल्या माणसाला श्रीधर आंभोरे यांच्या भेटीची आस लागून राहत असे. चित्रकार श्रीधर आंभोरे  यांची खरी ओळख म्हणजे त्यांचे चित्र काढण्याची शैली आणि पद्धत अतिशय लक्षवेधी. त्यांची चित्रं ही कष्ट करणारी माणसं आणि चेहरा नसलेले सामान्यजन. समाजातला उपेक्षित, वंचित आणि सर्वहारा घटक. ग्रामीण शोषित पीडित गांजलेल्या महिला  चित्रांमधून श्रीधर आंभोरे मुख्य प्रवाहातील समाजाच्या पुढ्यात ठेवत असत. त्या जिवंत महिला, समाज सामुहिक समूहाचे प्रतिनिधित्व करणारी चित्रं प्रवाहाच्या मुख्य प्रवाहातील लोकांशी संवाद साधतात.मानवी स्वभाव आणि निसर्गाचे अतूट असं नातं ते आपल्या चित्रातून मांडत असत.   1983/84 साली सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी श्रीधर आंभोरे यांच्या एकूण प्रवासावर आधारित दूरदर्शनवर *दिंडी* या नावाचा माहिती चित्रपट बनवला होता. त्यासाठी तेंडुलकर यांनी अहमदनगर मध्ये येऊन सात दिवस मुक्काम करून श्रीधर आंभोरे यांचेशी संवाद साधला होता.याशिवाय *श्रीधर आंभोरे यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने* सुप्रसिद्ध संपादक तथा लेखक महावीर जोंधळे यांनी श्रीधर अंभोरे यांच्या एकूण जीवन चरित्रावर आणि चित्रशैलीवर चर्चा करणारा शब्दशिवार प्रकाशनाचा अप्रतिम असा *श्रीधर रेषा* या नावाचा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य प्रांताला दिलेला आहे. यापूर्वी जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या संपादनाखाली *उर्मी* या नियतकालिकाने श्रीधर अंभोरे यांच्या एकूण जीवन कार्य आणि कर्तृत्व यावर चर्चा करणारा स्वतंत्र विशेषांक प्रकाशित केलेला होता.श्रीधर अंभोरे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच सामान्यांशी सुद्धा संबंध होते.त्यामध्ये अनेक  सन्माननियांचा विचार तर करता येईलच त्यात प्रामुख्याने जे लोक भूमिका घेऊन काम करतात.भूमिका असलेल्या माणसांशी त्यांचा सतत संवाद होता. याशिवाय जसा माणूस भेटेल तसा संवाद साधण्यात श्रीधर आंभोरे यांची ख्याती होती. ते लहानांशी लहानासारखे आणि प्रौढांशी प्रौढांइतके आणि विचारवंतांशी विचारवंतांसारखे तर अध्यात्माच्या क्षेत्रातील अध्यात्माच्या पातळीवर चर्चा करत असत. त्यांना कुठल्याच विषयाचं चर्चेत बंधन नसे. श्रीधर अंभोरे यांनी केवळ चित्रच काढले नाही तर समाजाचं सखोल सामाजिक सांस्कृतिक निरीक्षण केलं. याशिवाय देशाच्या विविध जंगलात जाऊन महिना महिना ,दीड-दीड महिना प्रवास करून जंगलाचे आदिम विश्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कातळ शिल्प, लेण्या, काष्ट शिल्प, घनदाट जंगलं, डोंगरदऱ्या,नद्या यांचा अभ्यास केला. त्यातून व्यक्तीचा आदिमतेशी मानवी संबंध आपल्या रेषेंद्वरा  चित्रांचा आकार दिला.या चित्राला आकार देताना त्यांनी साहित्य संस्कृती आणि ऐतिहासिक अशा ठळक घडामोडी चित्रीत करतांना आपल्या चित्रांद्वारे परिघाबाहेरील जगाचे दुःख,वेदना,सल आणि समूहाचे प्रतिनिधित्व समाजातील मुख्य प्रवाहाच्या समोर उजागर केले आहे. त्यातून उद्याच्या समाजाची स्वप्न पेरण्याचं काम त्यांनी आपल्या चित्राद्वारे केले. श्रीधर अंभोरे हे केवळ व्यक्ती नव्हती तर ती चित्रकलेची एक चळवळ होती. त्यांच्यासोबत मला अनेकदा मान्यवरांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. जाणीवपूर्वक उल्लेख येईल, की प्रा डॉ चित्रकार दिलीप बडे यांच्या निवासस्थानी आम्ही जवळ जवळ दोन दिवस होतो. सांगलीचे प्रा गौतमीपुत्र कांबळे आणि श्रीधर आंभोरे व इतर काही सहकारी मित्र यांच्या सहकाऱ्याने अजिंठा लेणी येथे चित्रकलेची कार्यशाळा आयोजित केली होती. याशिवाय शब्दशिवार प्रकाशनाचे कवी इंद्रजीत घुले आयोजित विचारवंत विद्रोही लेखक आदरणीय आ.ह.साळुंखे सर यांच्या *आ. ह.एक विचार वारी* या तीन दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तीन दिवस मंगळवेढा येथे मुक्कामी थांबून अनेक मान्यवरांशी चर्चा केल्या. अनेक विषय चर्चेत आले. मान्यवरांच्या गाठीभेटी झाल्या.
        श्रीधर आंभोरे यांनी 1980 च्या दशकामध्ये  'आदिम' आणि 'दिंडी' यासारख्या नियतकालिकाची उभारणी तर केलीच शिवाय यशस्वीपणे संपादनही केले. हा अंक त्यांनी पूर्णतः हस्तलिखित आणि  सायकलोस्टाईल या पद्धतीने काढलेला होता. त्यामध्ये आजच्या नामांकित कवी,लेखक,विचारवंत,अभ्यासकांचा लेखक कवी म्हणून समावेश राहिला होता. सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर श्रीधर आंभोरे यांचे त्याकाळात साथीदार होते. ते केवळ चित्रकार नव्हते तर श्रीधर आंभोरे हे चळवळीचा चालता बोलता इन्सायक्लोपिडिया होते. त्यांनी काही ललित लेख आणि कविताही लिहिलेल्या आहेत. अविवाहित असूनही श्रीधर आंभोरे कुटुंबवत्सल आयुष्य जगले.                           श्रीधर आंभोरेच्या चित्रशैलीची वैशिष्ट्ये विषद करतांना खास उल्लेख करता येईल ते म्हणजे मानवी स्वभाव, विकृती, दुर्गुण यांचा आकार त्यांची चित्रं धारण करतात. शोषित वंचिताची चेहरे नसलेले चित्रं. डोंगरदऱ्या, झाडं,पशू,पक्षी, जनावरं, मोठ मोठे पहाड, दगड अशा स्वरूपात ते समाजाला माणसाकडे चित्रांद्वारे बघायला लावतात. अशा बहुश्रुत आणि बहुआयामी कार्य करणाऱ्या कृष्णधवल रेषेच्या जादूगार जेष्ठ स्नेही श्रीधर आंभोरे यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना फाय फाऊंडेशनचा पुरस्कार विखे पाटील पुरस्कार अस्मितादर्श पुरस्कार डॉ गंगाधर पानतावणे जीवन गौरव पुरस्कार  याशिवाय इतरही अनेक संस्थानी त्यांचा गौरव केला आहे. आता महाराष्ट्र सरकारने त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा आणि त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करावा असे आवाहन करावेसे वाटते. श्रीधर आंभोरेच्या यांच्या जाण्याने साहित्य सांस्कृतिक चळवळीच्या क्षेत्रात कायम पोकळी निर्माण झाली आहे,ती पोकळी कशानेही भरून निघणार नाही. त्यांच्या निधनानिमित्ताने भावपूर्ण अभिवादन !