'अनुष्टुभ', 'युगवाणी' हे अंक महाविद्यालयीन वाचनालयांपासून ते साहित्यप्रेमींच्या घरापर्यंत कुठेही सहज आढळत अशा काळात १९८० च्या दशकात या दोन्ही अंकांमध्ये श्रीधर अंभोरे यांची चित्रे दिसत. नियतकालिकांमध्ये रेखाटने छापली जाणे आणि ती लक्षवेधी असणे - त्या रेखाटनांमुळे 'वाचका' वर 'प्रेक्षक' पणाचाही संस्कार होणे, हे मराठीत नवे नाही. दीनानाथ दलालांपासून ते बाळ ठाकूर, वसंत सरवटे, प्रभाशंकर कवडी अशा अनेकांनी केवळ रेषेच्या वापराने आणि मराठी नियतकालिकांना येणाऱ्या छपाईच्या मर्यादा पाळून रेखाटने केली ! पण या सर्वांची रेखाटने कोणत्या ना कोणत्या प्रकारे शाब्दिक मजकुराशी संबंधित; तर अंभोरे यांची रेखाचित्रे स्वायत्त. ती मजकुराला खुलवण्यासाठी काढलेली नसत. पानपूरक म्हणून, किंवा 'अस्मितादर्श' सारख्या नियतकालिकात एखाद्या मजकुराला साजेशी आहेत म्हणून ती छापली जात. मजकूर वाचून, त्याचा आशय चित्ररूपाने मांडणाऱ्यांपैकी अंभोरे नव्हते; पण तेही एका अर्थाने निराळा मजकूर वाचत होतेच... आजवर बहिष्कृत मानल्या गेलेल्या कष्टकऱ्यांच्या जगण्याचा हा मजकूर होता. माणूस, प्राणीपक्षी आणि झाडे-पाने यांच्यामधल्या दुव्यांची सम्यक जाणीव त्यात होती.
रेषेतूनच अंभोरे व्यक्त झाले. त्यांना ओळखणारे सांगतात की, ती रेषा बालपणी मातीच्या भिंतीवर कोळशाने उमटू लागली, पुढे बाभळीच्या डहाळीचा बोरू त्यांनी वापरला. हा प्रवास पेनांपर्यंत जाऊनही रेषेची गती, तिची लय शाश्वत राहिली. अंभोरे यांची अनेक रेखाचित्रे एकच रेषा पुढे-पुढे नेणारी, तिची वळणे दाखवणारी आहेत. ती वळणे शोभेसाठी नसून कशाच्यातरी शोधासाठी आहेत, हे प्रेक्षकांनाही
जाणवले. कारण प्रेक्षकही अंभोरे यांनी रेषेच्या मनाप्रमाणे (जणू ते मन चित्रकाराचे नसून रेषेचेच) सोडून दिलेल्या भागाचा, एकंदर रेखाचित्राच्या प्रत्ययाचा शोध घेऊ लागतील, अशी ताकद या चित्रांमध्ये होती. अंभोरे आता स्मृतिशेष झाल्याने ती रेषा थांबली. पण यापुढेही त्यांची चित्रे दिसत राहिल्यास तो प्रत्यय पुन्हा येत राहीलच.
तेंडुलकरांनी या चित्रकाराची दीर्घ मुलाखत 'दूरदर्शन' वरून प्रसृत केली, पुलंनी जाहीर कौतुक केले आणि नागराज मंजुळे यांच्यापासूनच्या पिढीने अंभोरे यांचा आदर केला. अ. भा. मराठी नाट्य संमेलनाची कार्यक्रम-पत्रिका 'मान्यवरांच्या फोटोंनी सजवण्या' ऐवजी बॅकस्टेज वर्कर्सची चित्रे त्यांनी केली. त्यांनी बुद्धचित्रांची नवी लयदार शैली रुळवली. दलित जाणिवेच्या कवितेतली स्त्री आणि अंभोरे यांची स्त्रीचित्रे यांत अनेकांना साम्य दिसले. हे सारे, चित्रकार म्हणून स्वतःची स्वायत्तता अंभोरे यांनी टिकवल्यानेच शक्य झाले. त्यांच्या कलेचे मूल्यमापन करताना 'आर्ट ब्रूट' व 'प्रिमिटिव्हिझम' या पाश्चात्त्य कलेतिहासातल्या संकल्पनांचा अधार घेतला जाईल. अनलंकृत कलाकृती त्यांनी केल्या, किंवा भीमबेटकाच्या गुहाचित्रांना ते प्रेरणास्थान मानत हे ठीक; पण तेवढ्याने पाश्चात्त्य संकल्पना पूर्णतः लागू होतीलच असे नाही. त्यासाठी शोषितांच्या कलानिर्मितीची शेदीडशे वर्षांची परंपरा शोधावी लागेल. त्यात युरोपीय ज्याँ डयूबफे असतील, आफ्रिकी वंशाचे ख्रिस ओफीली असतील आणि श्रीधर अंभोरेही असतील ! अंभोरे यांची चित्रे मोठ्या आकाराची नाहीत, त्यामुळे या कला-ठेव्याची जपणूक अणि मूल्यवर्धन करण्याचे आव्हान त्यांच्या जाण्यानंतर वाढणार आहे.
