श्रीधर अंभोरे हा कलंदर प्रतिभावंत गेला. १० ऑगस्ट २०२६ रोजी ही विद्रोही चित्रप्रतिभा काळाच्या जळत्या कॅनव्हासवर स्वतःच महाचित्र रेखाटून शांत झाली. रेषांची एक वादळभरती काळाच्या पडद्याआड गेली.
•••
श्रीधर अंभोरे अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चिखलगावचे. सरकारी वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पोस्टात नोकरी करताना रेषांसोबत फिरण्याचा नाद त्यांना लागला. या रेषांच्या कविताच त्यांच्या निर्मितीत वेल्हाळताना दिसतात. ते मनाचं तुटलेपण घेऊन शांतपणे तंद्रीत जात आणि मग रेषाच त्यांची जुळवाजुळव करीत. जीवनातील असंख्य जखमांचा अभ्यास करणारे श्रीधर अंभोरे अविवाहित होते; पण आयुष्यभर त्यांनी त्यांच्या रेषांचे विवाह अपूर्व संवेदनशीलतेशी उत्कटपणे लावून दिले.
अंभोरेंना जंगलाची भाषा उमगत होती. ते झाडांसोबत, वेंलींसोबत, त्यांच्या फुलांसोबत आणि फुलांमधून अजूनही बाहेर न आलेल्या सुगंधासोबतही बोलत. ते थांबलेलेही आणि वाहतेही पाणी वाचत असत. आदिवासींच्या घरांमधील अंधारही ते ऐकत असत आणि त्यांच्या मनांमधील उजेडाची गाणीही आपल्या रेषांना शिकवीत. ते अनन्य कलंदर होते आणि अनोखे बंडखोरही होते. त्यांनी स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे पाठ फिरवून रेषांना नव्या तहान-भुकेची स्वप्नं चारली. म्हणूनच त्यांच्या रेषा जगभर भरारत गेल्या आणि तिकडील चित्राभिरुचीला त्यांनी नवे पंख दिले. त्यांच्या रेषा रेषांच्या जागतिक ऑलिम्पिकमध्ये रंग वाटत फिरत आहेत. या श्रीधररेषा आता जगाच्या सन्माननीय नायकरेषा झाल्या आहेत. या अविवाहित वाऱ्याशी मग त्यांच्या या सौंदर्यरषांनीच लाखो, हजारो विवाह केले.
त्यांच्या रेषांना मी आदिवासी मुलींप्रमाणे बेभान नाचताना बघितलं आहे. श्रीधर अंभोरेंमुळे जगात अनेक नव्या रेषा निर्माण झाल्या. अशा असंख्य रेषांवर श्रीधर अंभोरे हे नाव खुद्द काळानंच खोदलेलं आहे. ज्यांमधून या नवलरेषा बाहेर आल्या त्या गुहेचं नाव श्रीधर अंभोरे हेच आहे. ज्या क्षितिजांमधून रेषांचे पूर्वी कधी न उगवलेले दिवस उगवले त्या क्षितिजांचं नावही श्रीधर अंभोरे हेच आहे.
श्रीधर अंभोरेंच्या डोक्यात अजिंठ्याची चित्रे काढणारा एक रेषांचा अर्हंत होता. त्याच्या स्पर्शाने काळाच्या दगडाला नक्षत्रांचा मोहर येत असे. मूर्तिमंत होण्यासाठी देखणं अमूर्त त्यांना रेषांचं आर्जव मागत असे. रेषा ही श्रीधर अंभोरेंची मातृभाषा होती. हे अनेकांना माहीतच नाही, पण श्रीधर अंभोरेंचं आयुष्य रेषांनी बोललं. रेषांनी चाललं आणि रेषांमधील लालित्याचा सुगंध होऊन उमललं.
बुद्ध युद्धावर औषध शोधण्यासाठी वनात गेले आणि श्रीधर अंभोरे स्वतःच्या पेटलेपणाला समजावण्यासाठी रेषांच्या आणि त्यांच्या निबीड संबंधांच्या वनात गेले. त्यामुळे त्यांचा सौंदर्यवृक्ष अपूर्व रेषांनी आयुष्यभर गदगदत राहिला. बाबासाहेबांच्या मनातील ज्वाळांनी सगळ्यांना शांतवणाऱ्या सलोख्याचा गगनवृक्ष जन्माला घातला. श्रीधर अंभोरे यांनी त्या गगनवृक्षाच्या स्पंदनांचे चवदार तळे रेषांमधून पिसारात ठेवले.
खूपदा फोनवरून आम्ही बोललो. दोन-तीनदा माझ्या घरीही हा रेषांचा सौंदर्यसोहळा आला. आमच्या या चर्चेत अजिंठाच उमलत होता. या भेटींमध्ये त्यांच्या रेषांच्या हसण्यामागची आसवंहि मी वाचली. जखमांना पराभूत करणारं त्यांचं फुलणंही मी बघितलं. हा कलावंत मृत्यूचा पराभव करीत जगला आणि जिवंतपणाचं लावण्य गगनभेदी करीत राहिला.
श्रीधर अंभोरे यांची ही सौंदर्यविद्या त्यांच्या जाण्यानं कधीही अस्ताला जाणार नाही. त्यांच्या रेषा आता अधिकच जोमानं उगवत आणि नव्या रेषांना ऊर्जा देत विस्तारत राहतील.
रेषांच्या पलीकडे जाणाऱ्या रेषांची एक गगनगहनता असते. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमध्ये स्वतःला नाकारत सतत नवे होत राहण्याची क्षमता आहे. अंभोरेंनी रेषांना गायला शिकवलं. रेषांच्या तारांची मोहमयी सारंगी त्यांनी तयार केली. त्यांनी चिवचिवणाऱ्या रेषा लिहिल्या. किलबिलणाऱ्या रेषांची झाडं त्यांनी कागदावर मांडून ठेवली. त्यांच्या रेषा बोलतात आणि बोलण्यापलीकडची मर्मं आपल्या मनात भिरभिरत असल्याचा अनुभव आपल्याला देतात. श्रीधर अंभोरे हे रेषांचे महाकवी आहेत. या महाकवीने रेषांचं महाकाव्य लिहिलं. श्रीधर अंभोरे या किमयागारानं रेषांची एक नवीच भाषा निर्माण केली. रेषांची नवी संस्कृतीच या प्रतिभावंताच्या पोटी जन्माला आली.
श्रीधर अंभोरेंचं मन म्हणजे विद्युतरेषांचं निबीड जंगल. या जंगलातील मूठभर विजा ते कागदावर पिसारून ठेवतात. त्यातील अनोखं लयलावण्यच आपल्या अभिरुचीमध्ये मुक्कामीच येतं. हा रेषानायक रेषांचीच काव्यभाषा बोलतो. या भाषेचाच मोर श्रीधर अंभोरेंच्या रेषांमधून वेल्हाळत राहतो. श्रीधर अंभोरेंच्या अस्तित्वाला असा अन्वर्थकतेचा मर्मार्थ प्राप्त होतो. आपलाही जीव या रेषासम्राटाच्या रेषालावण्यात गुंतून राहतो. आपल्याही काळजावर या रेषांचा पाऊस रिमझिमत राहतो. या रेषांच्या उत्सवात भिजताना आपणही या रेषाविश्वाचे नागरिक कधी झालो ते आपल्यालाही कळत नाही. रेषांच्या या महाकवीला वंदन.
•••
नागपूर (दैनिक सकाळ मधून साभार)
